विक्रांत पाटील (संपादक,जनशक्ती,जळगाव) यांची नवी पोस्ट

कुणाला विक्रांत पाटीलला विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवायचेय तर कुणाला ‘जनशक्ति’च्या रिपोर्टरला चाकू मारायचाय ...
पल–पल जिंदगी बहुत कुछ सिखा रही है...
धीरे धीरे हर चेहरे से नकाब हटा रही है!!!
पत्रकारितेतील लोक किती घाणेरडे आणि कोत्या मनोवृत्तीचे आहेत त्याचे दर्शन गेल्या 4 दिवसात होत आहे... हेमंत पाटील माझा जिवाभावाचा सहकारी होता... त्याच्या मृत्यूचे कारण कार्पोरेट हरासमेंट हेच आहे 100% ... त्याचे बीट बदलणे आणि त्याला ट्रेनी रिपोर्टरची दुय्यम, दारोदार भटकण्याची जबाबदारी देणे; हे नैराश्य होतेच होते!!! हेमंतचे घरचे लोक गरीब आहेत... त्यांना माहिती नाही की DB कॉर्पची जी मदत मिळायची ती मिळेलच.. हेमंतबाबत ज्या काही पोस्टस मी लिहिल्या त्या सर्व आतून आल्या... त्याचं काही खंडण करायचे तर युनिट हेड करतील... मात्र, काही प्याद्यांना हवा भरली जातेय.. ही प्यादीच जास्त भुणभुणताहेत....
यापूर्वीही सोहम जोशी प्रकरणाचा फुगा फुगविला गेला... महिना झालाय; पानेच्या पाने लिहून झालेत... काय आले तथ्य बाहेर? खोदा पहाड आणि निकला चुहा अशी गत आहे... नेहमीच समूह धावेल तसे धावायचे नसते; तुम्ही जे योग्य आहे त्यासोबत राहा, भलेही प्रवाहाच्या विरोधात एकटेच पडाल काही काळ!!! आज दिसतंय की सोहम छळ प्रकरण फुस्स आहे, ढूस्स आहे!! तो चांगरे काही माझा नातेवाईक नव्हता; पण तो दहशतवादी अथवा मुलांना व्यसनी लावणारा सावकारही नाही... आपल्या हाती मीडियाची ताकद आहे म्हणून कुणाला किती वाट्टेल तसे प्रच्छन्न बदनाम करायचे? रामानंद पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक सादरे.... ठीक आहे थोडी सिंघम, दबंग स्टाईल असेलही पण परिसर कसा गुन्हेगारीमुक्त होता... ते जाताच लगेच झाले ना राजीवगांधी नगरात लफडे!! त्यांना “अडकविले” गेले हे सारेच जाणून आहेत... का ते ही सर्वाना माहिती आहे.. मग? आम्ही चांगल्या लोकांच्या पाठी उभे राहायचे नाही का? या समूहाच्या मागे धावत सुटायचं? सर्व छापतात तसे छापायचे?
कांच को आईना बनाने के लिए 
उसके पीछे “पारा” चढाया जाता है...
तभी तो जिसको “आईना” दिखाओ,
उसका “पारा” चढ जाता है....
आता पोलिसांचे छापले तर आमच्या काही पत्रकार मित्रांनाच पोटदुखी झाली... पोलिसांचे प्रवक्ते बनून ते ‘जनशक्ति’च्या रिपोर्टरला शिवीगाळ करू लागले; दमदाटी करू लागले! यापुढे हेमंत पाटीलच्या पोस्ट आल्या, पोलिसांच्या-पत्रकारांच्या भानगडीच्या पोस्ट आल्या तर चाकू खुपसू, रक्त काढू .... ही असली भाषा! पत्रकारितेतच अशी भाषा आली तर मग गुंड हवेत कशाला? कुणाच्या प्रारब्धात असेल तर ते काही टळणार नाही.... कुणाचे तळवे चाटत मरण्यापेक्षा चांगली पत्रकारिता करताना काही झालं तर ते भोग लाचारीपेक्षा उत्तमच!! पत्रकारितेत ही अशी “सकाळ” उगवावी, हे “दिव्य”ही पाहणे नशिबी होते...
कुणाला आमच्या वार्ताहराला भोसकावेसे वाटते तर कुणाला मैत्रीण मागे लावून विक्रांत पाटीलला विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवायचेय... छान आहे!!! प्रवाहाविरुद्ध पोहताना ही परिक्षा होणारच... वाईट इतकंच वाटतंय की या ज्या शहरात आपण जन्मलो तिथं काहीतरी करावं, ही उर्मी यामुळे संपतेय... पत्रकारितेतील टोळकी आणि झुंडशाही या शहरात गुंडांच्या टोळीसारखी उन्मंत होवू पाहत आहे... हे कसलं असं सुसंस्कृत शहर? तुम्ही कुणालाही बदनाम करणार; तुमची हौस भागविण्यासाठी आणि “खाज” मिटविण्यासाठी? तुम्ही छापत नाहीत .... तुमचे असतील “लागेबांधे”; तुम्हाला लखलाभ!!! आम्ही छापले तर तुम्हाला का इंगळ्या डसाव्यात?
आम्हीही तुमच्यासारखे लाचार होवून मिळमिळीत, गप्प बसावे का? पोलिसांचा भ्रष्टाचार उघड झाल्यावर पत्रकारांना इतक्या मिरच्या झोंबाव्यात? इथल्या समूहासारखी पत्रकारिता करा नाही तर मग विनायभंगात अडका... जितकं काम इथे केलं तितकं पुण्या-मुंबईत केलं तर इथल्या 3-4 पट आर्थिक लाभ लाभतात आणि उच्च प्रतीचं जगणं ... ते सोडून ‘आपलं शहर’ म्हणून का राबावं या शहरात की जिथे “आपल्या” झुंडीलाच आपण नकोसे झालोत.... तुम्ही लोकांच्या बदनामीच्या ठेके घ्याल, त्यांच्या उण्या-दुऱ्या काढाल, त्यांना नैतिकता शिकवाल... आणि कुणी पत्रकारितेतील अपप्रवृत्तीवर बोट ठेवले की तुम्ही झुंडशाही करणार, गुंडांची भाषा बोलू लागणार....
याचा अर्थ सरळ आहे की एकतर हे शहर आम्हाला मानवणारं नाही किंवा या शहराला आम्ही मानवणारं नाही... एखाद्या समूहाला त्यांच्या कुवतीनुसार राजा मिळत असतो... तसंच आहे इथेही ... परवाच मला कुणीतरी विचारलं, की तुम्ही असं बिनधास्त छापता, बोलता; तुम्हाला भीती नाही का वाटत? तेव्हा “नाही” म्हटलो होतो ... आता म्हणेन, “हो वाटते, पण ज्यांच्याविरुद्ध बातम्या लिहितो त्यांची किंवा गुंडांची नाही तर पत्रकारितेतील गुंडांची भीती वाटतेय...!!!”
इस शहर में जिने के अंदाज निराले है 
होंटो पे लतीफे, आवाज में छाले है
माझे मित्र शैलेंद्र चव्हाण नेहमी सांगतात की, यार ही लोकांची धुणी धुणं बंद कर... शांत आयुष्य जग, निवांत!!! ‘तरुण भारत’चे मुख्य संपादक दिलीप तिवारी हेही जग पाहिल्यानंतर असाच सल्ला देतात... त्यांनी यापूर्वी प्रचंड आक्रमक पत्रकारिता केली आहे. आजच्या घडीला जळगावच्या कोणत्याही आघाडीच्या वृत्तपत्रात त्यांच्याइतका लायक संपादक नाही.... मग ते ‘दिव्य’ असो लोकमत की मटा... तिवारीजींना मी शब्दही दिला होता... आमचे स्नेही, हितचिंतक असलेले “साईमत’चे कार्यकारी संपादक शेखर पाटील हेही आजच्या घडीला राज्यातील अव्वल टेक आणि प्रगल्भ पत्रकार... तेही नेहमी ही सर्व उर्जा ‘पॉझिटिव्ह’ली कुठेतरी वापरा, असे प्रेमाने सांगत असतात... या तिघांचाही मी ऋणी आहे...
पत्रकारितेतील अस्वस्थ करणारी गुंडगिरी एकतर आता यापुढे जळगावात माझी पत्रकारिता मिळमिळीत करेल किंवा या शहरात राहण्यात फारसा रामही उरलेला नाही, म्हणून या शहराला रामराम करून एक्झिट तरी घेईल! जळगावच्या पत्रकारितेचे दुर्दैव असे आहे की तिची अब्रू मातीत मिळवायला पूर्वी भुरटे, लंगोटीछाप होते... आता मुख्य प्रवाहातील लोकच ते काम करीत आहेत... पुढच्या काळात पत्रकारितेतील लोकांनी सुपाऱ्या घेवून कुणाची सामूहिक बदनामी, कुणाला विनयभंगात अडकविणे किंवा पोलीस-गुंडांसाठी हफ्तेवसुली ... असं सारं सुरू केलं तर आश्चर्य वाटायला नको...
घोषित केलंय म्हणून, आहे ही शेवटची पोलीस भ्रष्टाचाराची बातमी चालवून झाली की, हे शहर तुमचं तुम्हाला लखलाभ असो आणि तुमची झुंडशाहीची पत्रकारिताही!!!
इस बार बरस जाये ‘ईमान’ की बारिश...
हमारे लोगो कें ‘जमीर’पर धुल बहुत है!
................
 by
विक्रांत पाटील (संपादक,जनशक्ती,जळगाव)