ज्येष्ठ पत्रकार जीवनधर शहरकर यांना अरविंद आत्माराम वैद्य पुरस्कार

औरंगाबाद - लातूर येथील स्वातंत्र्यसैनिक तथा ज्येष्ठ पत्रकार जीवनधर शहरकर यांना अरविंद आत्माराम वैद्य पुरस्कार जाहीर करण्यात आला. एकवीस हजार रुपये रोख, मानपत्र आणि शालश्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अरविंद आत्माराम वैद्य यांचा 29 मार्च हा स्मृतीदिन आहे. दरवर्षी 29 मार्च रोजीच या पुरस्कार वितरण समारंभ होतो. यावर्षी पहिल्यांदाचा 27 मार्चला लातूर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी ज्येष्ठ पत्रकार वि.वि. करमरकर, निळू दामले, शांताराम बापू जोशी आणि विद्याभाऊ सदावर्ते यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
श्री. शहरकर (वय 87) यांचा जन्म शिरूर अनंतपाळ येथे झाला. त्यांनी बी.ए, आणि एसटीसीचे शिक्षण हैदराबाद, अमरावती आणि लातूर येथे केले. त्यांचे हैदराबाद मुक्‍तिसंग्रामात मोठे योगदान आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विचारांनी प्रभावित होऊन मुक्‍तिसंग्राम लढ्यात सहभाग घेतला होता गुंजोटी आणि बार्शी कॅम्पवर शस्त्रे आणि दारुगोळा पुरविण्याचे काम गुप्तपणे करीत असे. पोलिसांना ही माहिती कळाल्यानंतर त्यांना तीन वर्षे भूमिगत व्हावे लागले होते. त्यानंतर त्यांनी लोकप्रबोधनासाठी पत्रकारितेचे वृत्त स्वीकारले. सुमारे 25 वर्षे त्यांनी साधना मासिकाचे काम पाहिले. दैनिक सकाळ, मराठवाडा, लोकसत्ता, केसरी, अजिंठा, विश्‍वसमाचार, प्रवाह आणि पुढारी यांसारख्या वर्तमानपत्रांसाठी त्यांनी पत्रकारिता केली. सकारात्मक पद्धतीने लोकांना माहिती देणे आणि वैचारिक मंथन घडवून आणण्याचे काम निरंतर केले. त्यांच्यावर सानेगुरुजी आणि एस.एम. जोशी यांचा प्रभाव राहिला. ज्या काळात संपर्काची साधने नव्हती, तरीसुद्धा त्यांनी मुंबई आणि पुण्याच्या दैनिकांना बातम्या पुरविण्याचे काम केले. जुन्यांसह नव्या पिढीशींही त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. आरोग्यासाठी उपकारक शिवांबू चिकित्सा पद्धती आणि महात्मा गांधींच्या चरख्याचा वापर करून सूत कातण्याचे काम सुरुच आहे. गांधीजीच्या खादीचे व्रत आजतागाय त्यांनी कसोशीने पाळलेले आहे. वयाच्या 87वर्षी ते दररोज पायी चालण्याचा व्यायाम करतात. यापूर्वी 1989मध्ये त्यांना अखिल भारतीय मराठी वृत्तपत्रकार परिषदेने नागोजीराव दुधगावकर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यासह लातूर फेस्टिवल, लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघानेही त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.