‘देशदूत’च्या संपादक संचालकपदी विश्‍वास देवकर

नाशिक : देशदूत वृत्तपत्र समुहाच्या संपादक संचालकपदी ज्येष्ठ पत्रकार विश्‍वास देवकर यांची नियुक्ती सारडाशेठने केली आहे. दुसरीकडे, नगर ‘सार्वमत’च्या प्रेसलाईनमध्ये अखेर 1 मार्चपासून अनंत पाटील यांचे कार्यकारी संपादक म्हणून नावही सारडाशेठने टाकले आहे. या बाबत ‘बेरक्या’ने पाटील यांची भावनिक कोंडी चव्हाट्यावर आणली होती.
दैनिक गांवकरीमध्ये विश्‍वास देवकर हे संपादक संचालक म्हणून काम करत असताना, त्यांचा फारसा फायदा गांवकरीला झाला नव्हता. सद्या नाशिकमध्ये गांवकरी अन् देशदूत दोन्ही वृत्तपत्र शेवटची घटका मोजत आहेत. सकाळ वृत्तपत्र समुहात काम केलेले देवकर यांचा फायदा होईल, असे गांवकरीचे मालक-संपादक वंदनराव पोतनीस यांना वाटले होते. परंतु, संपादन, व्यवसाय व अंकवाढीसाठी देवकर यांचा गांवकरीला काहीही फायदा झाला नाही. आता हेच देवकर देशदूत वृत्तपत्र समुहात त्याच पदावर आणि थोडा जास्त पगार घेऊन ज्वॉईन झाले आहेत.
देशदूतचे संचालक विक्रम सारडा आणि वंदनराव पोतनीस हे वर्गमित्र आणि व्यवसायबंधू आहेत. तरीही या दोघांचे हाडवैर सर्वश्रुत आहे. त्याचा अचूक फायदा देवकर यांनी उचलून आपले इप्सित साध्य केले असले तरी, घसरलेल्या देशदूतला त्यांचा फारसा फायदा होईल, अशी परिस्थिती नाही.
दुसरीकडे, अनंत पाटील यांचे नाव या एक तारखेपासून सार्वमतच्या प्रेसलाईनमध्ये कार्यकारी संपादक म्हणून आले आहे. तसेच विश्‍वास देवकर यांचेही नाव प्रेसलाईनमध्ये आहे. सार्वमत पहिल्यांदाच बालेकिल्ला असलेल्या उत्तरेत घसरणीला लागल्याचे दुर्देवी चित्र आहे. नगर आणि नाशिकमध्ये व्यवसाय कसा टिकवावा, अंकाची घसरण कशी रोखावी, ही चिंता सद्या सारडाशेठला सतावत आहे.