> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, २३ जून, २०१६

'व्हाइस' मीडिया भारतात, 'टाइम्स'शी करार

मुंबई - जगभरातील सुमारे ३० देशांत दबदबा असलेल्या 'व्हाइस मीडिया' कंपनीनं विस्ताराच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पाऊल टाकत भारतातील सर्वात मोठी मीडिया कंपनी असलेल्या 'टाइम्स' समूहाशी सहकार्य करार केला आहे. या भागीदारीमुळं 'व्हाइस'चा भारतासारख्या जगातील एका मोठ्या मीडिया मार्केटमध्ये उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
'टाइम्स'शी झालेल्या भागीदारी करारानुसार, 'व्हाइस मीडिया' मुंबईत निर्मिती केंद्र सुरू करणार असून टेलिव्हिजन, मोबाइल, डिजिटल मीडिया क्षेत्रात संयुक्तपणे काम करणार आहे. त्याचबरोबर, 'व्हाइसलँड' हे पेड टीव्ही नेटवर्कही सुरू करणार आहे. या करारामुळं 'व्हाइस'ला मीडियातील विस्तारासाठी टाइम्स ब्रँडची मोठी मदत मिळणार आहे. भारतीय बाजाराची इत्यंभूत माहिती, प्रेक्षकवर्गही आपोआपच उपलब्ध होणार आहे. या कराराअंतर्गत व्हाइस मीडिया देशात ठिकठिकाणी स्टुडिओ उभारणार असून त्याद्वारे दैनंदिन घडामोडींसह लाइफस्टाइलशी संबंधित विविध कार्यक्रम २४ तास प्रसारित करणार आहे. अनुभवी पत्रकार व चित्रपट निर्मात्यांचीही त्यासाठी मदत घेतली जाणार आहे.
जगभरातील डिजिटल कंपन्यांना भारतीय बाजारात विस्तारासाठी सहकार्य करणाऱ्या 'टाइम्स ग्लोबल पार्टनर्स'साठी हा करार अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यापूर्वी, 'टाइम्स ग्लोबल पार्टनर्स'ने उबर, एअरबीएनबी यांच्यासह अन्य काही डिजिटल उद्योगांशी भागीदारी केली आहे.
टाइम्स समूहाशी भागीदारीबाबत बोलताना 'व्हाइस'चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शेन स्मिथ म्हणाले, 'टाइम्स'शी हात मिळवताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. 'टाइम्स'च्या सहकार्यामुळं आम्हाला भारतासारख्या मोठ्या देशात सर्वदूर पोहोचता येईलच, शिवाय येथील समृद्ध संस्कृती जगभरात नेता येईल.'
'व्हाइस'शी झालेल्या भागीदारीबद्दल टाइम्स समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विनीत जैन यांनीही आनंद व्यक्त केला. 'धाडसी आणि थेट वार्तांकनाचा इतिहास असलेल्या 'व्हाइस'शी भागीदारी हा आमच्याबरोबरच भारतीयांसाठीही एक वेगळा अनुभव असेल. भारतीय प्रेक्षकांना प्रत्येक घटनेची सखोल माहिती देण्याचा तसंच, विविध घटनांच्या सामाजिक परिणामांचा सर्वंकष आढावा घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. भारतातील अधिकाधिक प्रेक्षकवर्गाला आमच्यासोबत जोडून घेण्यात आम्हाला यश मिळेल असा विश्वास आहे.'

फेसबुक वर शेअर करा

Facebook