पुढारीला अखेर मुहूर्त सापडला...


औरंगाबाद - लांडगा आला रे,लांडगा आला... या म्हणीची प्रचिती देणार्‍या पुढारीला अखेर मुहूर्त सापडला आहे.येत्या दर्पण दिनी म्हणजे 6 जानेवारी रोजी पुढारी बाजारात येणार असून,प्रकाशन सोहळा मात्र नंतर करण्यात येणार आहे.
गेल्या दहा वर्षात दोनदा प्रयोग फसल्यानंतर यंदा कसल्याही परिस्थितीत पुढारी औरंगाबादेत सुरू करण्याचा चंग पद्मश्रीने बांधला होता,परंतु नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्ने या म्हणीप्रमाणे अनेक अडचणी येत होत्या.
गेल्या तीन महिन्यापासून सर्व तयारी झाली असताना नोटाबंदीमुळे पुढारीला मुहूर्त पुढे ढकलावा लागला होता.त्यामुळे रोज डमी अंक काढून कंटाळलेले कर्मचारी वैतागले होते तर वाचक निराश झाले होते.वितरकामधील उत्साहही निघून गेला होता.
अखेर पुढारीने कोणताही गाजवाजा न करता किंवा प्रकाशन सोहळा न करता येत्या 6 जानेवारी 2017 पासून बाजारात अंक देण्याचा निर्णय घेतला आहे.औरंगाबाद शहर,औरंगाबाद जिल्हा,बीड आणि जालना अश्या चार आवृत्त्या निघणार असून,सिटीचा अंक 12 + 8 तर औरंगाबाद ग्रामीण, बीड आणि जालनाचा अंक 12 + 4 राहणार आहे.
मराठवाड्यात आठ जिल्हे असून फक्त औरंगाबाद,बीड आणि जालनामध्ये पुढारी दिसणार आहे.परभणी,हिंगोली,नांदेेड,लातूर,उस्मानाबाद पाच जिल्ह्यात पुढारी केव्हा सुरू होणार,हे कोडेच आहे.