पत्रकारांना जोड्याने मारीनः दिलीप कांबळे

हिंगोली -हिंगोलीचे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे आपल्या वक्तव्यांमुळे सतत वाद ओढवून घेतात. आज हिंगोलितल्या खंडाळा या गावात बोलताना ते पत्रकारांवरच घसरले. मी पत्रकारांना घाबरत नाही. पत्रकार हे पाकीट दिलं की कुणाबद्दलही लिहितात अशा लोकांना जोड्यानं मारलं पाहिजे असं विधान त्यांनी केलं.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यानंतर आता मंत्रिमंडळातले सामाजिक न्यायसारख्या महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्री असलेले नेते दिलीप कांबळे यांनी पत्रकारांच्याविरोधात दमदाटीची भाषा वापरली. काही तक्रार असल्यास संवैधानिक पदावरच्या नेत्यानं संयमित भाषेतच उत्तर देणं अपेक्षीत आहे. मात्र जोड्यानं मारा अशी मवाली भाषा मंत्र्यांना शोभते का हाच खरा प्रश्न आहे.. या आधीही घाबरायला मी काही ब्राम्हण आहे का ? असं जातीवाचक उद्गारही त्यांनी काढलं होतं. त्यावर वादळही झालं होतं नंतर त्यांनी माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
काय म्हणाले दिलीप कांबळे ?
काल म्हणे काय तमाशा चालला होता स्वागतचा...अरे तुझं काय पोट दुखतंय रे...जी लोकं काम करत नाही ती दांडक्यावाल्यांना घाबरतात आणि पत्रकारांनाही घाबरतात...पण मी काही दांडक्यावाल्यांना पण घाबरत नाही ना लिहीणाऱ्यांनाही घाबरत नाही...35 वर्ष समाजकारणात आहे...लाडीलबाडी केली नाही...एक रुपया खालला नाही...एकच ड्रेस घालतो...माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या पक्षांने चांगलं शिकवलं...आणि या पत्रकारांच्या जीवावर राजकारण चालतं का ?, आज हे आपले उद्या लगेच दुसऱ्याचे....पाकीट मिळालं की तुमच्या विरोधात लिहतील...त्याने पाकिट दिलं की याच्या विरोधात लिहतील....मी कुणाला नाही घाबरत...आहे कुणाची हिंमत तर बोलावं त्याने माझ्याशी...मी नाही घाबरत कुणाला....खरा जो असतो तो खरा असतो...सिंह कधी ओरडून सांगत नाही मी जंगलाचा राजा आहे...सिंह सिंह असतो..खऱ्या माणसाला कुणाची भिती नसते...मला गडकरीसाहेबांचं म्हणणं जास्त आवडतं...दांडकेवाले पुढे आले की काही बोलायचं गरज नाही...त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देण्याची गरज नाही...काम करत राहा...जनता आपोआप तुमच्यासोबत राहील...ज्याची लफडी असेल ते घाबरतील...माझ्यासारख्या नेत्याच्या विरोधात लिहितात कमालच झाली...उभं जोड्याने मारेल...एखाद्याला...काय लिहीयचं ते लिहा...
13 मार्च रोजी कांबळे ब्राह्मणांबद्दल काय बोलले होते ?
"राज्यात दलालाची दलाली बंद झालीये. त्यामुळे काही जण शासनाला बदनाम करण्याचं काम करताय..काल एवढा चांगला कार्यक्रम झालाय. या राज्यातल्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला. त्यानंतर आम्ही निघून गेल्यानंतर घोषणाबाजी केली. हिंमत असेल तर माझ्यासमोर करा...मुस्काटात हाणलं असतं...मी ही दलित आहे मी काय ब्राम्हण आहे का ? हे सरकार दलालांच्या विरोधात आहे म्हणून काही जणांची पोटं दुखायला लागली..."