सोशल मीडिया: अभिव्यक्ती स्वातंत्र्य भोचक तज्ज्ञांचे

जेष्ठ नेते श्री शरद पवार यांनी मागील महिन्यात सोशलनेटवर्क वर लिखाण करणाऱ्या तरूणांची बैठक घेतली व त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला कारण यापैकी काही तरूणांना पोलीसांच्या नोटीस गेल्या होत्या. आम्ही सरकार विरोधात लिखाण करत असल्यामुळे आम्हाला पोलीसांच्या नोटीस आल्याचा या तरुणांचा दावा होता. या प्रकरणाच्या निमित्ताने सध्या सत्तेत असलेलं सरकार "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत आहे "असा आरोप सरकारवर केला गेला.
याबाबत सायबर कायद्यातील काही गंभीर व ठळक गुन्हे कोणते ते पाहू
१) संगणकाचा वापर करुन " हॅकींग करणे "
२) दुसऱ्या व्यक्तीची digital सही करणे किंवा पासवर्ड वापरणे .
३) संगणकाचा वापर करून फसवणूक करणे.
४) दहशतवादी कारवायांसाठी संगणकाचा वापर करणे.
५) लहान बालकांचा समावेश असणारे किंवा एखाद्या व्यक्तीची परवानगी न घेता त्याची लैगिंक छायाचित्रे प्रकाशित करणे .
या सगळ्या गुन्ह्यांसाठी तीन वर्षाच्यावर कैद आणि एक ते पाच लाख रूपये दंडाची तरतूद आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावे.

आता तुम्हाला प्रश्न पडेल कि इतके कडक कायदे असले तरीही सोशलनेटवर्क वर इतक्या मोठ्या प्रमाणात गैरकृत्य,शिवीगाळ,अश्लील साहित्य ,बदनामीकारक मजकूरांचा सुळसुळाट कसा आढळून येतो ? या मागचं मुख्य कारण म्हणजे सोशलनेटवर्कची जगभर असलेली अवाढव्य व्याप्ती आणि तपास यंत्रणाच्या मर्यादा. उदाहरणार्थ बऱ्याच बेकायदेशीर वेबसाईट अशा ठिकाणांवरून आॅपरेट होत असतात की त्या ठिकाणी पोलीस तर सोडा लष्कराचा देखिल शिरकाव होऊ शकत नाही , यामुळे गुन्हेगारांचे फावते.
सायबर विभाग देशाच्या सार्वभौमत्वाला व सुरक्षेला धोका पोहचवणाऱ्या प्रकरणांत स्वतः लक्ष ठेवून असतो. पण वैयक्तिक पातळीवर चालणाऱ्या आर्थिक , मानसिक, शारिरीक अशा खाजगी स्वरूपांच्या गुन्ह्यात मात्र तक्रार आल्याशिवाय कारवाई करू शकत नाही.
महाराष्ट्रात घडलेले ताजे उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात घडलेल्या शेतकरी संपाच्या काळात देव गायकवाड या नावाच्या फेसबुक प्रोफाईलवरून "निधी कामदार" या मुख्यमंत्री फडणवीसांच्या O.S.D कडून शेतकऱ्यांचा संप अधिक न चिघळवण्यासाठी आर्थिक प्रलोभन देण्यात आल्याचा खळबळजनक दावा देव गायकवाडकडून करण्यात आला होता. त्यासाठी त्याने निधी कामदार यांच्या कडून तसा मेसेज आल्याचा screenshot सोबत जोडला होता.
संबंधीत फेसबुक पोस्ट निधी कामदार यांच्या निदर्शनास आली तेव्हा त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आधीच शेतकरी संपामुळे राज्यात चिघळलेले वातावरण तसेच मुख्यमंत्र्यांशी थेट संबंध असलेल्या व्यक्तींवर केलेला खळबळजनक आरोप याची गंभीरता लक्षात घेऊन तपासाची चक्रे फिरवली. त्या तपासातून पुढे आलेली माहिती अशी आहे की देव गायकवाड हे मुळातच बनावट अकाऊंट होते. ते अकाऊंट बारामती येथील महादेव बालगुडे नावाच्या व्यक्तीने "देव गायकवाड " हे बनावट नाव वापरून उघडले होते. या व्यक्तीनेच निधी कामदार यांच्या नावाने देखिल बनावट अकाउंट उघडून त्या अकाउंट वरुन स्वतःलाच आर्थिक आमिष दाखवणारे मेसेज पाठवले व त्याचे फोटो काढुन लोकांमधे असंतोष उफाळेल असे कृत्य केले. ते अकाउंट वेगवेगळ्या मोबाईल वरुन वेगवेगळे लोक वापरत असल्याच्या संशयावरून काही व्यक्तींची चौकशी केली.
सदर किंवा इतर कुठल्याही बनावट अकाऊंट वापरून राजकीय विरोध होत असला तर त्यात एक वेळ आक्षेपार्ह मानण्यासारखे काही नाही असे समजु पण सरळसरळ तोतयेगिरी करणे ,समाजात भ्रम निर्माण करणे ,सामाजिक वातावरणात बिघाड होईल असा हेतू बाळगणे आदी गुन्हे प्रथम दर्शनीच सदर प्रकरणात दिसत आहेत त्यामुळे पोलीस कारवाई होणार यात आक्षेपार्ह काही नाही .
असो, मध्यंतरी एका परदेशी ऑनलाईन दैनिकामध्ये माजी अमेरिकन राष्ट्रपती बराक आेबामा आपल्या पत्निचे चुंबन घेतानाचे छायाचित्र पहायला मिळाले.त्या छायाचित्रात आजुबाजुला त्यांचे सहकारी हास्य विनोद करत उभे आहेत तर सुरक्षारक्षक चौफेर नजर ठेऊन आपले कर्तव्य बजावत उभे असलेले दिसतात.एका पती पत्निच्या आयुष्यातील त्या एका रोमॅटींक प्रसंगाकडे त्यांचा फोटोग्राफर वगळता कोणाचेहि लक्ष नाही कारण राष्ट्रपती असला तरी तो आपल्या सारखाच एक माणूस आहे व त्याला सामान्य माणसां इतकाच आपल्या कुटुंबातील व्यक्तीं बरोबर काही क्षण एकत्र उपभोगण्याचा हक्क आहे हे जगातील सर्वात बलाढ्य देश म्हणजेच अमेरिकन लोकशाहीने स्विकारलेले आहे. त्यामुळे काही दोष असले तरी एक दिलखुलास लोकशाही म्हणून जगातील लोकांना ती नेहमीच आकर्षित करते.
दुसऱ्या हाताला सदर फोटो पाहिला तेव्हा माझ्या मनात उमटलेला पहिला विचार म्हणजे हेच छायाचित्र आपल्या दैनिकांत छापून आले असते तर काय झाले असते ? पण त्या नुसत्या विचारानेच माझे मन भितीने दडपून गेले .कारण या देशांत कुठल्याही नेत्याच्या आयुष्यातील कौटुंबिक क्षणांच्या बातमी किंवा छायाचित्रामुळे "शेतकरी देशोधडीला लागला आहे आणि यांना मौजमजा सुचते आहे " अशा प्रकारच्या तिखट व असंबंद्ध प्रतिक्रियांचा वर्षाव सोशलनेटवर्क वर सुरू होईल. भारतीय नागरिकांना आपला नेता म्हणजे सर्वसंगपरीत्याग केलेला व चोविस तास जनतेच्या समस्या सोडवणारा एक अवतारी पुरुष म्हणून अपेक्षित असतो. भारतात सोशलनेटवर्क वर अनेक स्वयंघोषित पोलीस , संस्कृती रक्षक व वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांचा महापुर आलेला आहे. सोशलनेटवर्क वर बसलेला कुणीही स्वयंघोषित आंतरराष्ट्रीय तज्ञ आपल्या गल्लीत चोरीस गेलेल्या ड्रेनेजच्या झाकणांच्या गंभीर समस्येमुळे भारत अमेरिकेकडून करत असलेल्या हेलिकॉप्टर खरेदीस विरोध करू शकतो.
या भोचक तज्ञांना कुठल्याही गोष्टींचा त्रास होतो पण सलमान खुर्शीद यांचा कल हो ना हो या गाण्यावरील विडिओ, देवेंद्र फडणविस यांचे मॉडेलींगचे फोटो , त्यांच्या पत्नीने भाग घेतलेल्या फॅशनशो मधील सहभाग, राज ठाकरे यांची कुत्र्यांची आवड, आठवले साहेबांची स्वतःची अशी फॅशन हे मला वैयक्तिकरीत्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत.
या सगळ्या आवडी व सवयींचा आवश्यक तिथे विनोद, संदर्भ, उपयोजिता म्हणुन वापर करण्यास काही हरकत नाही परंतु यांचा वापर विखार व द्वेष पसरवण्यासाठी करणे मात्र चुकीचे आहे. आपण आता इतके टोकदार झालो आहोत कि कधीकधी अनवधनाने घडलेल्या गोष्टींचा सुद्धा आपण मोठा बाऊ करतो. झेंडा उलटा लागला कि सुलटा यावरून आपण कमीतकमी चार दिवस संपूर्ण देशभर चर्चासत्रं भरवतो व बहुमूल्य वेळ त्यावर वाया घालवतो.
हे सगळे नैतिक गोंधळ होण्यामागील महत्वाचे कारण म्हणजे आपल्या प्रत्यक्ष जिवनातील शालेय शिक्षण पद्धतीमध्ये इतिहास ८० गुण व रोजच्या जीवनाशी निगडीत नागरीक शास्त्रासाठी मात्र २० गुणांचा अभ्यासक्रम असल्यामुळे सार्वजनिक जिवनात वावरताना साध्या साध्या गोष्टींची माहिती किंवा शिष्ठाचाराचा अभाव दिसतो. याचे आपल्या समाजावर सर्वच क्षेत्रात दुरगामी प्रतिकुल परिणाम होतात.
सोशलनेटवर्क असो किंवा प्रत्यक्ष जीवन, कुठेही वावरताना स्वातंत्र्य व स्वैराचार यामध्ये अत्यंत पुसट सिमारेषा आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या खाजगी अवकाश व हक्कांवर अतिक्रमण न करता आपण उपभोगत असलेले हक्क निश्चित व्यक्तीस्वातंत्र्यामध्ये मोडतात. परंतु इतरांच्या खाजगी अवकाशावर अतिक्रमण करून, त्यांचे हक्क दडपण्याची प्रत्येक कृती स्वैराचारात मोडते याचे आपण सर्वांनी भान ठेवणे गरजेचे आहे.
आपण एका लोकशाही देशामधे राहतो. लोकशाही मध्ये जनतेचा व विरोधी पक्षांचा अंकुश हा राजसत्तेवर असणे गरजेचे आहे अन्यथा राज्यकर्ते बेलगाम होऊ शकतात. पण इथे लक्षात ठेवण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्ताधाऱ्यांना करावयाचा विरोध हा तत्वं व मुल्यांवर आधारित हवा. सत्ताधारी पक्षाची चुकीची व संशयास्पद धोरणं , भ्रष्टाचाराची प्रकरणं , चुकीचे निर्णय यावर जरूर आसुड ओढले पाहिजेत.
परंतु कुठल्याही पक्षाच्या नेत्यांचे कौटुंबिक जीवन, त्याचे नातेवाईक यांच्या बद्दल आपण भान ठेऊन बोलले पाहिजे. व्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ तोतयेगिरी करणे नव्हे. व्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ नो एंट्री मध्ये वाहनं दामटणे नव्हे. व्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणे नव्हे. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. अर्थात अशा स्वैराचाराला आळा घालण्याचा अथवा जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यावर "आमच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा गळा घोटला जातोय" हि बोंब ठोकणे योग्य नाही.
एक गंमतीची गोष्ट म्हणजे आपल्या भारतीय समाजाकडे नजर टाकली असता प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्य, अनुदानं, आरक्षणं, बोनस , पगारवाढ अशा प्रत्येक हक्कासाठी आपण हिरीरीने एकमेकांशी भांडत आहोत. परंतु या भारताचे जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्य आहेत , जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्यांनी पार पाडाव्यात यासाठी मात्र आजपर्यंत एकही मोर्चा, संप, आंदोलन करावे असे एकाही जात, धर्म, संस्था, पक्ष, व्यक्ती यांना वाटत नाही.
लोकशाही मध्ये सुद्धा स्वातंत्र्य फुकट मिळत नाही तर ते कमवावे लागते कारण ती एक जबाबदारी देखील आहे. आपलं वैयक्तिक आयुष्य असो किंवा सोशल लाईफ असो ते स्वातंत्र्य कमावण्याची पात्रता आपल्या मध्ये आहे का हे प्रत्येकाने तपासण्याची वेळ आली आहे.

- तुषार दामगुडे

साभार - सकाळ