अखेर पत्रकारच धावलेत पत्रकाराच्या मदतीला !

नागपूर (विजय खवसे ) : पत्रकार किती संवेदनशील असतात याची प्रचीती नागपुरात दिसून आली. गंभीर जखमी झालेल्या एका जेष्ठ पत्रकाराला रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची हलाखीची आर्थिक परिस्थिती बघता नागपुरातील पत्रकारांना त्यांची कळवळ आली व धडपड करीत या पत्रकारांच्या चमूने मुख्यमंत्री निधीतून जखमी पत्रकाराच्या ऑपरेशन करिता मुख्यमंत्री मदत निधीतून ५०,०००/- (पन्नास हजार रुपये) चा धनादेश मिळवून देत माणुसकीचे दर्शन घडवून दिले.

सविस्तर वृत्त असे कि, हिवाळी अधिवेशन दरम्यान मोर्चाचे वृत्तसंकलन करीत असतांना एका दुचाकीस्वाराने उभे असलेल्या पत्रकाराला आकस्मिक धडक दिली आणि हे वरिष्ठ पत्रकार खाली कोसळले व त्यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाली. लगेच त्यांना नागपुरातील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना आयसीयुमध्ये ठेवण्यात आले. नंतर त्यांना डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आले.

अतुल शरारा असे त्या जखमी पत्रकाराचे नाव असून ते दैनिक देशोन्नति व राष्ट्रप्रकाश चे वार्ताहर आहेत. सोमवार दिनांक 18 डिसेंबर रोजी विधान भवन येथे वृत्त्तसंकलन करण्यासाठी अतुल शरारा येत असताना मॉरिस कॉलेज टी पॉइंट येथे दुचाकी ने त्यांचा अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात ते सध्या भरती आहेत. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना एक मुलगी व मुलगा असून पत्नीचे निधन झाले आहे. अशात घरचा भार अतुल शरारा हेच सांभाळतात. अपघात झाला तेव्हा त्यांच्या बँक खात्यात फक्त ५००/- रुपये असल्याचे समजले. अश्यातच डॉक्टरांनी त्यांच्या पायाचे ऑपरेशन सांगितले. ही घटना पत्रकार भीमराव लोनारे, पत्रकार जितेंद्र धाबर्डे व इतर पत्रकार मित्रांना कळताच त्यांचे हृदय पाझरले. संकटात असलेल्या शरारा यांच्या मदतीला पत्रकारांची ही चमू धाऊन आली. लगेच धावपळ करीत त्यांनी हैद्राबाद हाउस येथील मुख्यमंत्री कार्यालयाकडे धाव घेतली. सर्व पत्रकार विधानभवनात कर्तव्यावर होते. विधानभवन ते हैद्राबाद हाउस येथपर्यंत पायी प्रवास करीत त्यांनी हैद्राबाद हाउस येथील मुख्यमंत्री कार्यालय गाठले. त्यांनी स्वत: स्वाक्षरी केलेले निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री फड़नवीस यांनी देखील मुख्यमंत्री आर्थिक सहायता निधितुन 50 हजार रूपयाचा या नावाने असलेला धनादेश भीमराव लोणारे व जितेंद्र धाबर्डे यांच्या स्वाधीन केला. पत्रकार विजय तायड़े, जानकिराम वानखेडे, अनिल शेंडे, सुभाष गोडघाटे, विकास विष्णुकांत बनसोड,परेश जाटवे ईत्यादी पत्रकार बांधव देखील त्यांच्या सोबतीला होतेच.
हा धनादेश घेऊन ही टीम डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात गेली. जखमी असलेले पत्रकार अतुल शरारा यावेळी रुग्णालयातील बेडवर चिंतामग्न अवस्थेत होते. ऑपरेशन करिता लागणारी मोठी रक्कम कुठून आणायची जणू याच चिंतेत ते असावेत! अशातच पत्रकार भीमराव लोनारे, पत्रकार जितेंद्र धाबर्डे, पत्रकार विजय तायड़े, जानकिराम वानखेडे, अनिल शेंडे, सुभाष गोडघाटे, विकास विष्णुकांत बनसोड,परेश जाटवे ईत्यादी त्यांच्या समोर येऊन उभे झालेत. तब्येतीची विचारपूस केल्यानंतर पत्रकार भीमराव लोनारे यांनी "मुख्यमंत्री मदत निधीतून ५०,०००/- रुपयांचा धनादेश घेऊन आल्याचे" सांगताच अतुल शरारा यांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रूंच्या धारा वाहू लागल्यात. मिळालेल्या मदतीने शरारा यांनी सर्वांचे आभार मानले. पत्रकार भीमराव लोणारे यांनी डॉक्टरांसोबत सविस्तर फोनवर बोलणे केले. आम्ही ऑपरेशनची तयारी करतो असे डॉक्टर म्हणाले. नंतर सर्वांनी हा धनादेश पत्रकार अतुल शरारा यांच्या स्वाधीन केला. "तब्येतीची काळजी घ्या..." असे म्हणत सर्वजन नागपूरकडे रवाना झाले. याप्रकारे पत्रकारांनी संकटात सापडलेल्या आपल्या पत्रकार बांधवाला मदत करून मानवतेचे दर्शन घडवून दिले.