राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍युरेटर; फडणीस पुण्याचे कन्टेंट क्‍युरेटर

पुणे : बेरक्याने २८ फेब्रुवारी रोजी दिलेलं वृत्त तंतोतंत खरे ठरले. सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी श्रीराम पवार आणि चीफ कन्टेंट क्‍युरेटरपदी (मुख्य संपादक) राहुल गडपाले यांची नियुक्ती झाली आहे. पुणे आवृत्तीच्या कन्टेंट क्‍युरेटरपदी (संपादक) सम्राट फडणीस आणि समूहाच्या एक्‍झिक्‍युटिव्ह कन्टेंट क्‍युरेटरपदी शीतल पवार यांची नियुक्ती झाली आहे.  आज सकाळ माध्यम समूहाने याची  अधिकृत घोषणा केली आहे.
माहितीचा वेग आणि उपलब्धता, सोशल मीडियाचा विस्तार आणि मुद्रित माध्यमाची विश्वासार्हता या घटकांचा विचार करून समूहाने संपादकपदाच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ केली आहे. माहितीची विश्वासार्हता या प्राथमिक घटकासोबत वाचकांना विविध माध्यमांद्वारे आणि सर्वंकष माहिती पुरविणे ही ‘क्‍युरेटर’ची जबाबदारी आता संपादकीय कामकाजाचा प्रमुख भाग राहील.
श्रीराम पवार गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ समूहात विविध संपादकीय पदांवर कार्यरत आहेत.
राहुल गडपाले सध्या ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचे संपादक आहेत. विविध माध्यम समूहांमध्ये संपादकीय जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. राजकारण, शहरीकरण, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा आदी त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.
सम्राट फडणीस ‘सकाळ’च्या डिजिटल माध्यमाचे निवासी संपादक आहेत. विद्यार्थी बातमीदार ते संपादक असा त्यांचा विविध माध्यम समूहांमधील प्रवास आहे.
शीतल पवार संगणक अभियंता आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायसेन्स (टीआयएसएस) संस्थेतून त्यांनी समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. शहरीकरण, माध्यमे आणि राजकारण आदी त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.
गडपाले ‘सकाळ’ समूहाच्या सर्व आवृत्त्यांच्या संपादकीय समन्वयाची, मुख्य संपादकपदाची जबाबदारी सांभाळतील. फडणीस पुणे आवृत्तीच्या संपादकीय समन्वयाची, संपादकपदाची जबाबदारी सांभाळतील.

तरुणांच्या हातात सकाळ
राहुल गडपालेचं  वय ३२.शितल पवारचं  वय २८.आणि सम्राट फडणीसचं ४२.या तरुणाच्या हातात सकाळची सूत्रे आली आहेत.
देश तरूणांचा, तरूण हेच देशाचं भविष्य वगैरे भाषणं आणि लेख असतात. सकाळनं पूर्ण संपादकीय व्यवस्थापन तरूणांच्या हाती सोपवलंय.