कागदावर बातमी लिहिण्याचे दिवस आता संपले

सुनील ढेपे
पुणे - हातात पेन घेवून कागदावर बातमी लिहिण्याचे दिवस आता संपले आहेत,  प्रत्येक पत्रकाराला बातमीबरोबर कॉम्प्युटर, इंटरनेट आणि अत्याधुनिक यंत्रणेचे ज्ञान हवे. जो पत्रकार    काळाबरोबर चालणार नाही तो पत्रकारितेतून कालबाह्य होईल,असा गर्भित इशारा ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे  यांनी दिला.

पुण्यातील कर्वे नगर रोडवरील  कॅलिडस इंटरनॅशनल मीडिया अँड आर्ट्स अकॅडमी मध्ये तिसरी राज्यस्तरीय डिजिटल मीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, यावेळी पत्रकार ढेपे बोलत होते, यावेळी सकाळचे संपादक सम्राट फडणीस, पुढारी सिटी एडिटर विक्रांत पाटील, संचालक पंकज इंगोले उपस्थित होते.

ज्या पत्रकारास संगणकाचे ज्ञान नाही तो निरक्षर पत्रकार  ठरत आहे, आपण स्वतः  20 वर्षांपासून संगणक हाताळत असून, काळाबरोबर नाही चाललो असतो तर आऊटडेटेड पत्रकार ठरलो असतो, असे सांगून पत्रकार ढेपे म्हणाले की, वेबसाईट अपलोड करणे फार अवघड काम नाही, मात्र त्याचे टेक्निकल ज्ञान घेणे आवश्यक आहे, बातमी लिहून ती फुलवणे, आकर्षण हेडिंग देणे हेच महत्वाचे आहे.
न्यूज चॅनल आणि प्रिंट मीडिया मधील संधी कमी झाल्याने तरुण पत्रकारांनी डिजिटल मीडियाचे ज्ञान घ्यावे असे आवाहनही ढेपे यांनी केले .वेबसाईट आणि सोशल मीडियामधून आर्थिक प्राप्ती कशी होते, याच्या टिप्सही त्यांनी यावेळी सांगितल्या.

पंकज इंगोले, सम्राट फडणीस, विक्रांत पाटील, सुनील ढेपे
सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी इंटरनेटचा उगम, त्याची व्याप्ती, आवाका, भविष्यात काय होणार याबद्दल मार्गदर्शन केले, पुढारीचे सिटी एडिटर विक्रांत पाटील यांनी कंटेंट, गुगल सर्चर्निग,लोकांच्या आवडी निवडी याबाबद्दल माहिती दिली.
दुपारच्या सत्रात सामचे संपादक निलेश खरे यांनी युट्युब मॉनिटेशनबद्दल माहिती सांगितली तर लोकमतचे डिजिटल संपादक  तुळशीदास भोईटे यांनी, सोशल मीडिया कसा हँडल करावा, लोकांना नेमके काय  आवडते यावर भाष्य केले.

तुळशीदास भोईटे, सुनील ढेपे, निलेश खरे, पंकज इंगोले, विक्रांत पाटील

प्रास्ताविक  संचालक पंकज इंगोले यांनी केले.यापुढे कोल्हापूर, शिर्डी, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिक आदी ठिकाणी डिजिटल मीडिया कार्यशाळा घेण्याचा मनोदय  त्यांनी व्यक्त केला, त्यासाठी त्या त्या ठिकाणच्या पत्रकार संघांनी पुढे येण्याची गरज आहे असे इंगोले म्हणाले.