लोकमतच्या पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल

हिंगोली - 'काम न केल्याचा अहवाल देणार'  या मथळ्याखाली ३० ऑगस्ट २०१८ रोजीचे दैनिक लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध करून कळमनुरी विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांची बदनामी केल्याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात खेडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दैनिक लोकमतच्या ३० ऑगस्ट २०१८ रोजीच्या अंकामध्ये 'काम न केल्याचा आहवाल देणार' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तात आपली बदनामी होईल असा मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केला आहे. या बातमीमुळे खेडेकर यांची प्रतिमा मलीन झाली असून त्यांना त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात दैनिक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिसांनी भादविच्या कलम ४९९, ५०० नुसार गुन्हा दाखल केला आहे.