हेमंत अलोने यांना जळगाव 'देशदूत'मधून 'निरोप'

जळगाव - गेली अनेक वर्षे जळगाव, खान्देश 'देशदूत'च्या कार्यकारी संपादकपदावर ठाण मांडून बसून असलेले हेमंत अलोने यांना अखेर जळगाव 'देशदूत'मधून काल 'निरोप' देण्यात आला. महाव्यवस्थापक विलास जैन यांनी त्यांच्या हाती 'श्रीफळ' सोपविले. अलोने हे आता 1 जुलैपासून नाशिक मुख्यालयात कार्यकारी संपादक वैशाली बालाजीवाले यांच्या मार्गदर्शनात देशदूत रौप्य महोत्सवी पुरवणीच्या जाहिरातींचे काम पाहणार असल्याचे सांगितले जात आहे.
 
 गेल्या काही वर्षातील तीव्र माध्यम स्पर्धेत अंकाचे रुपडे व कंटेंटचा दर्जा यात काहीही बदल अलोने करू शकलेले नव्हते. त्यामुळे मालक विक्रमभाऊ सारडा यांच्यासह व्यवस्थापन त्यांच्यावर नाराज होते. 'देशदूत'मध्ये 'कंपूबाजी'लाही उत आला होता. अनेक 'सेटिंगबाज' वार्ताहरांना प्रोत्साहन देवून अलोने यांनी ब्रांडचे नावही खराब करून ठेवले होते. 'दिव्य मराठी'तून आलेल्या जैन यांनी या विस्कळीत युनिटमध्ये आर्थिक व प्रशासकीय शिस्त लावली. मात्र, संपादकीय विभागाच्या सुधारणात त्यांना अलोने सहकार्य करत नव्हते. चांडाळ-चौकडीच्या मदतीने त्यांनी सुधारणांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता. अखेर अलोने यांचे काही खासम-खास साथीदार यांची इतरत्र रवानगी करण्यात आली व नंतर त्यांनी राजीनामेही दिले. 

दरम्यानच्या काळात जाहिरातींचे पेमेंट पार्टीने अदा केलेले मात्र संस्थेत भरणा नसल्याचे प्रकार उघड झाले. संपादक कमी आणि वितरण, जाहिरात वसुली प्रतिनिधी म्हणून दौरेच अधिक अशी भूमिका निभावणार रे अलोने या थकबाकी घोटाळ्यामुळे अडचणीत आले. अनेक 'सोय-पाणी' करणारे वार्ताहरच थकबाकीदार आढळून आले. शहरात गेल्या 15 वर्षांत अंक वाढ तर सोडाच पण समाधानकारक संख्याही स्थिर ठेवू न शकणारा नाना-मामा काही कामाचे नाही, हे मालकांच्या ध्यानात आले. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या पत्रकारितेतील मोठी 'दुकानदारी' व गावोगावची अनेक दुकाने आता बंद होणार आहेत. त्यातच अलीकडे एचडीएफसी बँकेत अमरावती येथील बनावट कागदपत्रे देवून, कृषी व्यवसाय दाखवून क्रेडिट कार्ड लाटण्याचे प्रकरण समोर आले. 

कार्डवर थकबाकी वाढल्याने व अवास्तव लीकर स्वाईपिंग झाल्याने बँकेच्या रिकव्हरी टीमने शोध घेतला. त्यात बनावट कागदपत्रे उघड झाली. एका डॉकटर प्राध्यापकाने यात मदत केल्याचे समजते. बँकेने यात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र, मालकांच्या मेहेरबानीमुळे हे प्रकरण निस्तरले गेले.