कौशल्यांतून आव्हानांवर मात शक्‍य : अभिजित पवार

परिषदेत जाहिरात एजन्सीच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन

पुणे: "तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलाप्रमाणे कौशल्ये आत्मसात करायला हवीत. ही कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठी "सकाळ माध्यम समूह' सर्वतोपरी सहकार्य करील. नवीन कौशल्यांसह एकत्रित काम करू शकलो तर येणाऱ्या आव्हानांवर आपण मात करू शकतो'', असा विश्‍वास "सकाळ'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी व्यक्त केला. 

"सकाळ माध्यम समूह' आणि "फेडरेशन ऑफ ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड मार्केटिंग आंत्रप्रिनर्स' (फेम) यांच्या वतीने जाहिरात एजन्सीच्या प्रतिनिधींसाठी दोनदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव, औरंगाबाद, नाशिक, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नागपूर आदी शहरांतील 80 हून अधिक आघाडीच्या एजन्सीचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले आहेत. 
परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी पवार यांनी "एपी ग्लोबाले प्लॅटफॉर्म अँड बिझनेस अपॉर्च्युनिटी' या विषयावर मार्गदर्शन केले. "फेम'चे अध्यक्ष मोतीराम पिंगळे आणि सचिव प्रकाश शहा यावेळी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ""बदल न स्वीकारल्याने डिजिटलकडे वळताना अनेक जुने व्यवसाय अडचणीत येत आहेत. याबाबत सरकारने घेतलेल्या काही निर्णयांचा सुरुवातीला त्रास होतो. मात्र त्यांचा नंतर फायदाच होणार असतो. भागीदार, एजन्सी आणि ग्राहक यांनी एकत्र येऊन काम केल्यास उद्योग वाढीस मदत होईल. कुटुंबांचे कल्याण करणे हा आमचा हेतू आहे.'' 

प्रतिनिधींनी विचारलेल्या विविध शंकांचे पवार यांनी निरसन केले. ग्रामीण भागातदेखील मोठ्या प्रमाणात स्टार्टअप सुरू होत आहेत. ते सर्व डिजिटल बाबींवर सर्वाधिक भर देतात. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार डिजिटल मार्केटिंगसाठी प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

दुपारच्या सत्रात झेबॅक कम्युनिकेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक किरण भट आणि सहयोगी उपाध्यक्ष अपर्णा तिलवे यांनी "एजन्सी ट्रान्सफॉर्मेशन' विषयावर, ग्रुप एमच्या प्रिंट व रेडिओ विभागाचे राष्ट्रीय प्रमुख अमिताभ शर्मा यांनी "चॅलेंजेस अहेड', ज्येष्ठ क्रीडा विश्‍लेषक सुनंदन लेले यांनी "क्रिकेट मला काय शिकवते' आणि लॅमकॉन ट्रेनिंगचे संचालक डॉ. अनिल लांबा यांनी "टू ग्लोबल रुल्स ऑफ फायनान्ससिएल मॅनेजमेंट' या विषयावर मार्गदर्शन केले. 

....

ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन व्यवसाय वाढीसाठी काय करता येईल याचे योग्य मार्गदर्शन परिषदेत तज्ज्ञांकडून आम्हाला मिळाले. बदल स्वीकारत असताना नेमके काय आत्मसात करावे, हे समजले. बदल चांगलाच आहे, त्यामुळे पूर्वीसारखी होणारी धावपळ थांबली आहे. 
- मोतीराम पिंगळे, अध्यक्ष, फेम


ही परिषद पुढील व्यवसायासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. महागाई आणि मंदीच्या काळात व्यवसायावर झालेल्या परिमाणांतून बाहेर पडण्याचा मार्ग परिषदेतून मिळाला. व्यवसायाबाबतची अद्ययावत माहिती मिळाली. फेमच्या सदस्यांना याचा उपयोग होईल. 
- प्रकाश शहा, सचिव, फेम