बातम्यांची विश्वासार्हता धोक्यात

ज्या बातम्यांच्या भरवशावर वृत्तपत्रांना जाहिराती मिळतात त्या बातम्यांची विश्वासार्हता राहीली आहे काय ? असे म्हणण्याइतपत बातम्यांची परिस्थिती गंभीर झाली आहे. रोजची वृत्तपत्रे चाळली तर प्रथमदर्शनीच वृत्तपत्रांच्या प्रथम पानावर बातम्यांऐवजी जाहिराती गच्च भरलेल्या दिसून येतात. आताशा त्यात लैंगीक जाहिरातीची जास्तीच भर पडत चालली आहे. वृत्तपत्राचे प्रथम पान हे देशातील प्रमुख  बातम्यांसाठी राखून ठेवलेले असते. त्याच  वृत्तपत्रांचे अर्धे अधिक पान जाहिरातींनी व्यापलेले दिसते. एखादे दर्जेदार वृत्तपत्र जाहिरातीच्या भरवशावर नव्हे तर बातम्यांच्या भरवशावरच चालते. त्या वृत्तपत्रातील जाहिरातींनी सरकार घाबरत नाही तर बातम्यांनी सरकारच्या उरात धडकी बसते. जनतेमधील दृष्ट प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी पत्रकार आपले लेखणीरुपी धनुष्यबाणातून शब्दांचे तीर सोडतो. आज बातम्यांची परिस्थिती शोचनिय झाली आहे. जाहिरातपिसाट पत्रकारांनी बातमीला वेश्यांच्या कोठ्यावर बसविले असून रोज तिच्यावर बलात्कार केले जात आहेत. तर जाहिरातीला पालखीतून बसवून तीची मिरवणूक काढल्या जात आहे. महाराष्ट्रात तर वृत्तपत्रांचा नुसता बाजार झाला आहे. येथे दररोज एकतरी वृत्तपत्र निघते. स्थानिक स्तरावर तर दररोज शेकडयाने निघणारी वृत्तपत्रे व त्यांच्या भरमसाठ आवृत्त्या यांच्यामध्ये बोटावर मोजण्याइतपतही वृत्तपत्रे दर्जेदार नाहीत. फक्त जाहिरातीचा दृष्टीकोन समोर ठेवून निघणारी वृत्तपत्रे, वृत्तपत्रांचे हत्यार वापरुन होणारे ब्लॅकमेलींगचे प्रकार, बातम्या छापण्याच्या धमक्या देवून घेतल्या जाणा-या जाहिराती, वृत्तपत्रांच्या पत्रकारांना शासनाकडून मिळणा-या जास्तीत जास्त सवलती, चिल्लर पत्रकारांच्या उसन्या धमक्यांना घाबरुन स्थानिक सरकारी, निमसरकारी कार्यालये, पोलीस स्टेशन, राजकीय क्षेत्र आदींकडून दर महिन्याला मिळणारे हप्ते व जाहिराती, दिवाळी, दसरा, स्वातंत्र्य दिन आदी विशेष प्रसंगी डॉक्टर, वकील आदींकडून जबरदस्ती व विना परवानगीने छापल्या जाणा-या जाहिराती आदी घातक प्रकारामध्ये वृत्तपत्रसृष्टीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून सर्व  स्तरावर अशा धोकादायक प्रकाराने सर्वसामान्य  वाचक, अधिकारी, कर्मचारी आदींमध्ये दर्जेदार वृत्तपत्रांबाबत एक चुकीचा संदेश पसरत आहे. केवळ पैसे मिळविणे हा एकच उद्देश ठेवून काही घातक व गुंडप्रवृत्तींची वृत्तपत्रात होणारी घुसखोरी पाहता दर्जेदार बातम्या  व दर्जेदार वृत्तपत्रांची तसेच दर्जेदार पत्रकारांचे पावित्र पवित्र अशा पत्रकारीतेच्या क्षेत्रात मातीमोल ठरत आहे.
    स्वातंत्र्यपुर्व काळातील महान पत्रकारांनी त्यांच्या वृत्तपत्रात नुसत्या बातम्या छापून ब्रिटीश सरकारला हादरवून सोडले होते. त्यांचा वारसा घेवून आजही काही प्रतिभावंत पत्रकार वृत्तपत्रसृष्टीत पत्रकारीतेचा पवित्र वसा सांभाळून आहेत. त्यांच्या शब्दाला व बोलण्याला किंमत आहे. त्यांच्या समाजाप्रती व देशाप्रती संवेदना आहेत. अशा पत्रकारांनी जाहिरातीला दुय्यम स्थान देवून बातमीलाच ईश्वर मानले आहे. त्यामुळे त्यांना कधी भरमसाठ जाहिराती मिळवून धनसंचय करायची गरज वाटली नाही. या पत्रकारांच्या शब्दालाच किंमत असल्यामुळे  केवळ शब्दाच्या प्रतिष्ठेमुळे  त्यांच्या जिवनात पैशाची कधीच अडचण भासली नाही. आजच्या पत्रकारीतेतील काही पत्रकार मात्र जाहिरातीसाठी हपापल्यासारखे वागत आहेत. स्वत:ला महान समजून घेणारे हे पत्रकार जाहिरातीसाठी रात्रंदिवस भुकतहान विसरतात. मात्र त्यांना चांगल्या दर्जेदार व सकस बातम्यांसाठी धावाधाव करायची गरज वाटत नाही. चांगल्या व विश्वासार्ह वृत्तपत्राचा पाया ख-या व दर्जेदार बातम्यांमध्ये आहे. वृत्तपत्रामध्ये जनमाणसात चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी वाचकांना सकस बातम्यांचा बौध्दीक आहार द्यावा लागतो. अशाच वृत्तपत्रांची प्रतिष्ठा कायम टिकून राहते. मात्र जे पत्रकार केवळ जाहिरातीलाच आपले दैवत मानून वृत्तपत्रक्षेत्रात वाटचाल करतात त्या पत्रकारांचे जिवन अल्पायुषी ठरते. असे पत्रकार जाहिरातीच्या रुपाने कितीही पैसे  कमावित असले तरी प्रसिध्दी त्याच्यापासून दुर दुर जात राहते. जाहिरातीसाठी साम-दाम-दंड-भेद या इंग्रजांच्या पध्दतीचा अवलंब करण्यात धन्यता मानणा-या अशा पत्रकारांच्या वृत्तपत्रांमध्ये बातम्यांची विश्वासार्हता कायमची नष्ट होते.
    आज राष्ट्रीय, प्रादेशिक तसेच स्थानिक स्तरावर हजारोंच्या संख्येने  दैनिके व नियतकालिके प्रकाशित होतात. या वृत्तपत्रांमध्ये  छापल्या जाणा-या बातम्यांची दखल अधिकारीक स्तरावर घेतल्या जाते का ? रोज प्रकाशित होणारी किती वृत्तपत्रे अधिका-यांच्या डोळ्याखालून जातात ? किती अधिकारी अशी वृत्तपत्रे वाचून त्यातील बातम्यांची दखल घेतात ? हा संशोधनाचा मुद्दा आहे. अशा वृत्तपत्रांत छापण्यात आलेल्या किती बातम्या ख-या व विश्वासार्ह असतात ?  माझ्या मते, राष्ट्रीय स्तरावरील काही बोटावर मोजण्याइतपत वृत्तपत्रे सोडली तर अनेक वृत्तपत्रांकडे शासनातील अधिकारी ढुंकुनही पाहत नाहीत. बातम्या छापण्याची धमकी किंवा धौस देवून सर्वसामान्य जनता, सरकारी अधिकारी,  व्यापारी, डॉक्टरांकडून हजारो रुपयांच्या जाहिराती उकळल्या जातात.  ज्यांच्याकडून सरळसरळ गुंडांप्रमाणे हप्ते न घेता नियमित जाहिराती घेतल्या जातात ते जाहिरातदार आपल्या घामाच्या कमाईतून या पत्रकारांना जाहिरातीच्या रुपाने पैसे देतात असे म्हटले तर ते मुर्खपणाचे ठरेल. अधिकारी, डॉक्टरांकडून पत्रकारांना दिल्या जाणा-या हजारो रुपयांच्या जाहिरातीसाठी सरकारी अधिकारी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करतात. तर डॉक्टर, व्यापारी हा जाहिरातीचा पैसा आपल्या ग्राहकांकडून  व पेशंटकडून अव्वाच्या सव्वा बिल काढून वसुल करतात. कोणताच सरकारी अधिकारी वृत्तपत्रांना स्वत:च्या खिशातून हजारो रुपयाच्या जाहिराती देत नाही. हे सुर्यप्रकाशाइतके सत्य आहे.
    आजकाल वृत्तपत्राचे रजिस्ट्रेशन करणे  ही काही मोठी गोष्ट राहीलेली नाही. केवळ दहा रुपयाच्या अर्जावर वृत्तपत्राचे टायटल मिळते.  कोणीही उठसुठ येतो आणि पत्रकार म्हणून मिरवितो. ज्याच्याकडे एक बातमीही लिहायची अक्कल किंवा कुवत नाही तो ही कडक इस्त्रीचे कपडे घालून व कॉलर ताठ ठेवून पत्रकार म्हणून मिरवितो.
    वृत्तपत्राचे टायटल मिळविण्यासाठी संबंधीत कार्यालये समोेरच्या व्यक्तीची प्रवृत्ती कशा स्वरुपाची आहे, त्याची काही गुन्हेगारी पाश्र्वभूमि आहे काय ? त्यांची शैक्षणिक पात्रता, वृत्तपत्र क्षेत्राचा अनुभव याचा कोणताही तपास करीत नाही. कोणतेही मेहनतीचे काम न करता जाहिरातीच्या रुपाने बक्कळ पैसा मिळत असेल तर कोणाला नको आहे. या भावनेतून आज हजारोंच्या संख्येने वृत्तपत्रे छापल्या जात आहेत. अनेक वृत्तपत्रे आज शासकीय यादीवर आहेत. अशा वृत्तपत्रांचे खपाचे आकडे डोळे दिपविणारे आहेत. शासनदरबारी  केवळ कागदी घोडे नाचवून व आर्थिक कुस्ती लढवून शासकीय जाहिराती पदरात पाडणा-या अशा वृत्तपत्रांमधून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणा-या किती बातम्या छापल्या जातात ? अशा वृत्तपत्रातून जनतेला खरच न्याय मिळतो का ? अशी वृत्तपत्रे सरकार चालविण्यासाठी मार्गदर्शक ठरतात का ? हे ही तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.   शासनाला मात्र अशी वृत्तपत्रे  व त्यात काम करणा-या पत्रकारांचे चारित्र तपासून पाहण्याची गरज वाटत नाही. संबंधीत कार्यालयाने परवानगी दिलेली वृत्तपत्रे कशा प्रकारे चालतात, त्यांचा दर्जा कसा आहे, त्यांच्यापासून सर्वसामान्य जनतेला काय त्रास होतो याची दखल शासनाला घ्यावीशी वाटत नाही. राज्यस्तरावर सोडले तर जिल्हा व तालुका स्तरावर अशा वृत्तपत्रांवर व अशा पत्रकारांवर नजर ठेवणारे एकही स्वतंत्र कार्यालय नाही. वृत्तपत्रांसंबंधी क्षेत्रावर कायद्याचा वचक ठेवण्यासाठी अनिल देशमुख समितीव्दारे वृत्तपत्रांबाबतच्या कायद्याची रचना केली गेली. मात्र या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होतांना दिसत नाही. आजच्या बदलत्या वृत्तपत्रीय युगात अनिल देशमुख कायदाही कुचकामी ठरत आहे.
    वृत्तपत्रांच्या बाजारु  व गल्लाभरु वृत्तीमुळे, त्यातल्या त्यात स्थानिक स्तरावरही आपली विश्वासार्हता गमाविलेल्या पत्रकारीतेमुळे सर्वसामान्य वाचकांचा बातम्यांवरचा भरवसा दिवसेंदिवस उडत आहे. केवळ जाहिराती मिळविण्यासाठी हेतुपुरस्पर विरोधातल्या किंवा  प्रशंसेच्या बातम्या (फटाके)  प्रसारीत करुन वाचकांच्या मेंदूचे ब्रेनवॉश केल्या जात आहे. येथेही काही वेळा कास्ट फॅक्टरचा (जातीचा फायदा) उपयोग करुन घेतला जातो.  निवडणूक काळात तर पेडन्युज हा घाणेरडा व किळसवाणा प्रकार ही पहायला मिळतो.  त्यामुळे एखादा नवीन पत्रकार जरी दर्जेदार वृत्तपत्र काढत असेल तर त्याला या सर्व प्रकाराचा फटका बसतो. ध्येयनिष्ठ पत्रकार अल्पावधीतच यामुळे नाउमेद होतो. त्याच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण होते.
    त्यामुळे आजच्या पत्रकारीतेमध्ये दिवसेंदिवस बातमीचे स्वास्थ्य हरवत आहे. आज अशी परिस्थिती आहे की, क्वचितच एखाद्या बातमीची शासन स्तरावर दखल घेतल्या जाते. माझ्या पाहण्यात अशीही वृत्तपत्रे आहेत की, एखाद्या राजकीय नेत्याने केवळ  जाहिरात दिली नाही म्हणून महिनामहिनाभर त्याच्या विरोधातल्या बातम्या प्रकाशित केल्या गेल्या. मात्र त्या राजकीय नेत्याच्या राजकीय जिवनावर  या बातम्यांमुळे काहीही फरक पडला नाही. उलट पुढील निवडणूकीत तो अधिक मतांनी निवडून आला. अनेक जाहिरातपिसाट पत्रकारांना जाहिरातीच्या अधिक लोभामुळे अनेकवेळा मानहानी किंवा मार खायचीही पाळी येते. मात्र निर्ढावलेले पत्रकार अशा प्रकारामुळे अधिकच बेशरम होवून जास्त उत्साहाने जाहिरातदाराच्या मागे लागत असल्याची परिस्थिती आहे. काही पत्रकार असेही आहेत की, जाहिरात देत नाही म्हणून अनेक पत्रकार शासकीय अधिका-यांच्या मागे लागतात. उठसुठ त्याच्या विरोधात बातम्या छापतात. निवडणूकीच्या वेळेस पत्रकारांना पाट्र्या देणे, पाकीटे देणे ही गोष्ट आज साधारण झाली आहे. पत्रकारीतेच्या जगात याला मुक मान्यताही मिळालेली आहे. तोड्या करणे हा आजच्या पत्रकारीतेला लागलेला रोग आहे. एखादे प्रकरण हाती लागले की, मोठी तोडी करणे व तोडी फिस्कटली तर विरोधात बातम्या छापणे हा काही पत्रकारांच्या पत्रकारीतेचा पिंडच झाला आहे. अशा तोड्या करण्यासाठी अनेक ठिकाणी पत्रकारांचा ग्रुपच कार्यरत असतो. या कामी त्यांच्यामध्ये पोलीस प्रशासन महत्वाची भूमिका बजावत असते.
    वृत्तपत्र हे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे शस्त्र आहे. मात्र दुर्देवाने लिहावेसे वाटते की, आजघडीला वृत्तपत्र हे काही दृष्ट प्रवृत्तींसाठी केवळ पैसे कमाविण्याचे साधन झाले आहे. सरकारने वृत्तपत्राला दिलेले अवाजवी स्वातंत्र्य हे यामागचे एक कारण असू शकते. ६० वर्षाआधीची पत्रकारीता व ६० वर्षानंतरची पत्रकारीता यामधील तुलना करायची असल्यास काही वृत्तपत्रांचा अपवाद वगळल्यास आजच्या वृत्तपत्रसृष्टीला बाजारु व गलिच्छ रुप आले आहे. ध्येयनिष्ठ पत्रकारीता नावालाच उरली आहे. स्थानिक स्तरावरच्या पत्रकारीतेबद्दल सांगायचे झाल्यास, काही पत्रकार असेही आहेत की, ज्यांनी आपल्या उभ्या पत्रकारीतेच्या जिवनात साधी बातमीही लिहीली नसेल मात्र ते राष्ट्रीय स्तरावरच्या दैनिकाच्या बरोबरीने जाहिराती मिळवतात. मग भलेही त्यांच्या वृत्तपत्रातील एकाही बातमीने सर्वसामान्यांना न्याय मिळाला नसेल. बातमी म्हणजे काय ? बातमी कशाची खातात ? हे अजूनही स्वत:ला पत्रकार म्हणवून घेणा-या तथाकथीत पत्रकारांना माहित नाही. अशा पत्रकारांनी चार प्रतिष्ठीत माणसात आपली कॉलर ताठ करुन स्वत:ला पत्रकार म्हणवून घेणे म्हणजे लेखणीशी केलेला व्याभिचार व बेईमानी नाही काय ?

संदीप पिंपळकर
साप्ताहिक पहाटवारा,वाशीम
मोबाईल 9822047068

Post a Comment

0 Comments