नुसती प्रतिक्रियांची पत्रकारिता करण्याचे हे धंदे वाहिन्यांनी आता बंद केले पाहिजेत. आगीत तेल घालून ती पेटती ठेवायची आणि नंतर वणवा भडकला की त्या धगीवर आपल्या टीआरपीची पुढचे दोन आठवडे पोळी भाजायची, हा वाहिन्यांचा गल्लाभरू सवंग दुटप्पीपणा लोकांनीच आता हाणून पाडायची वेळ आली आहे. कुणाला आणि किती महत्त्व द्यायचे याला काही धरबंद आहे का नाही?
प्रसारमाध्यमांचे वर्तन सध्या आक्षेपार्हच नव्हे, तर संतापजनक होत चालले आहे. सर्व समाजाला अक्कल शिकवण्याचा ठेका घेतल्याप्रमाणे या 24 तास चालणाऱ्या वाहिन्या वागत असतात आणि समाजकारण- राजकारणातील माणसे कशाला माध्यमांच्या वाकड्यात जायचे म्हणून अनेक वेळा गप्प बसतात. पण आता मात्र या वाहिन्यांचा निर्लज्जपणा इतका वाढतो आहे, की समाजाने त्यांचा कान धरून या माध्यमांना त्यांच्या चुका दाखवून न थांबता, त्या मान्य करणे भाग पाडले पाहिजे. शुक्रवारी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर झालेला हल्ला जितका निंद्य आणि निषेधार्ह होता, त्याहीपेक्षा लज्जास्पद आणि अत्यंत असभ्य वागणे होते काही वृत्तवाहिन्यांचे! पवारांवर अचानक त्या माथेफिरूने केलेल्या हल्ल्याच्या दृश्यातील ते तीन शॉट्स एकदा-दोनदा नव्हे, तर शेकडो वेळा परत परत दाखवून या वाहिन्यांनी आपल्या अकलेची दिवाळखोरी तर जाहीर केलीच, पण आपल्याला भोवतालच्या सामाजिक-राजकीय परिणामांचे आणि वास्तवाचे कसे अजिबात भान नाही, हेच स्वत:च सिद्ध केले. या वाहिन्यांना आता आवरण्याची आणि प्रसंगी त्यांच्या नाकात वेसण घालण्याची गरज आहे.
कोठून आली ही मग्रुरी आणि कोणाच्या जोरावर चालते ही शिरजोरी? आपण करू ती पूर्व आणि आम्ही करू तेच अंतिम, आम्हाला कोण, काय आणि कसे विचारते तेच पाहतो, अशा मस्तीच्या आविर्भावात या वाहिन्या सध्या बेबंद झाल्या आहेत. याला काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचे? हा अभिव्यक्तीचा स्वैराचारच नव्हे, तर माध्यमांच्या व्यवहारातील व्यभिचारच म्हणायला हवा. शनिवारच्या दुपारपर्यंत हा वाहिन्यांचा मनमानीपणा सुरूच होता. एखाद्या राष्ट्रीय ज्येष्ठ नेत्यावर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांना स्वत:ला एकदा होणाऱ्या मनस्तापाच्या कित्येक पट अधिक यातना, त्रास आणि मानहानीचा अनुभव या निलाजऱ्या वृत्तवाहिन्यांनी सतत दोन दिवस देऊन काय मिळवले? तो व्यावसायिक टीआरपी, का सवंग वाढणारी दर्शक संख्या? आणि मुळात हा अधिकार त्यांना दिला कोणी?
प्रसारमाध्यमांमधील संकलनाचे एक व्याकरण असते. या माध्यमांमध्ये मागील पंचवीस वर्षे अथक काम केलेल्यांना ते उत्तम समजते. दीड सेकंदाचा तोच क्षण एकामागून एक परत परत जोडून एकदा मारलेल्या थपडेच्या दहा-बारा थपडा करण्याच्या या प्रकाराला मानसिक विकृती म्हटले पाहिजे. संकलनाच्या कोणत्याही व्याकरण किंवा तंत्राच्या व्याख्येत हा प्रकार बसत नाही. ""ज्यांनी एखादे बातमीपत्र पाहिले नसेल, त्यांना बघता यावे म्हणून हे दृश्य प्रत्येक बातमीपत्रात आम्ही दाखवले, यात काय चुकले?'' असा शहाजोगपणाचा स्पष्टीकरणाचा प्रकार या वाहिन्या करतीलच, पण ते मान्य होणार नाही. असे वागून कोणत्या स्वयंशिस्तीच्या गप्पा या वाहिन्या आणि त्यांचे संपादक करतात? असेच तत्त्व या वाहिन्या त्यांच्याच एखाद्या कर्मचाऱ्याच्या बदफैलीपणाचे किंवा भ्रष्टाचाराचे पुरावे बाहेर आले तर आचरणात आणतील का? याआधी काही वर्तमानपत्रांच्या किंवा वृत्तवाहिन्यांच्या संपादकांवर हल्ले झाले नाहीत असे नाही. काही संपादकांनी तर सांगता येणार नाही अशा कारणांसाठी बाहेरच्या राजकीय, सामाजिक किंवा माथेफिरू व्यक्तींकडून नाही, तर आपल्याच कर्मचाऱ्यांकडून जोरदार थपडा खाण्याचे लज्जास्पद प्रसंगसुद्धा घडले आहेत. याची कोठे बातमी आल्याचे, फोटो आल्याचे किंवा अशा थपडांचा पुन्हा पुन्हा एकामागोमाग एक संकलित करून "लुप' तयार करून दाखवल्याचे स्मरणात नाही. का बरं एकच न्याय सर्वांना नाही? आपल्या प्रतिस्पर्धी वाहिन्यांमध्ये असे प्रकार घडूनही, त्याबाबत एक अवाक्षर बातमी न दाखवण्याचे सौजन्य या इतर साऱ्या वाहिन्यांनी संकेत किंवा एथिक्सच्या गोंडस नावाखाली पाळले. मग पवारांवर हल्ला झाल्याचे वार्तांकन करताना कोठे गेले ते संकेत आणि आचारसंहिता?
आपल्या वाहिन्यांना किती मोठ्या प्रमाणावर पाहिले जाते, त्यांवर दाखवलेल्या बातम्या, प्रक्षोभक दृश्ये किती मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण करू शकतात, याची जाणीव जर अशा वाहिन्यांवरील कर्मचाऱ्यांना नसेल तर त्यांच्यावर कारवाई का नको व्हायला? गेला बाजार संपादकांचा विवेक तरी ऐन वेळेस जातो कोठे? का त्यांना कोणी विचारायचेच नाही? संपादकांच्या नादाला लागणार कोण? निवडणुका तोंडावर आहेत. फाटक्या तोंडाच्या या सर्वेसर्वा जावयांना उरावर घेणार कोण?
ज्या एखाद्या समाजाच्या माथेफिरूकडून असे विकृत हल्ल्याचे कृत्य केले जाते, त्याचा तोच क्षण पुन्हा पुन्हा दाखवल्यामुळे, जर उद्या त्या विशिष्ट समाजावर असामाजिक तत्त्वांनी राग काढला, तर होणारे नुकसान कोणामुळे असेल? त्याची सर्व जबाबदारी ही दृश्ये तितक्याच विकृतपणे पुन्हा पुन्हा दाखवणाऱ्या या वाहिन्यांवर टाकून का नाही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात खेचायचे? सुसंस्कृतपणे किंवा सभ्यपणे, चर्चेद्वारा मार्ग काढण्याचे बोधामृत रोज रात्रीच्या चर्चेत राजकीय भांडकुदळ नेत्यांना देणाऱ्या या वाहिन्यांचा सुसंस्कृतपणा अशा वेळी जातो कोठे? का ब्रह्मज्ञानाचे सारे नियम लोकांना? माध्यमकर्मींसाठी वर्तणुकीची, तत्त्वांची, सभ्यतेची कोणतीच आचारसंहिता लागू नाही?
नुसती प्रतिक्रियांची पत्रकारिता करण्याचे हे धंदे वाहिन्यांनी आता बंद केले पाहिजेत. आगीत तेल घालून ती पेटती ठेवायची आणि नंतर वणवा भडकला की त्या धगीवर आपल्या टीआरपीची पुढचे दोन आठवडे पोळी भाजायची, हा वाहिन्यांचा गल्लाभरू सवंग दुटप्पीपणा लोकांनीच आता हाणून पाडायची वेळ आली आहे. कुणाला आणि किती महत्त्व द्यायचे याला काही धरबंद आहे का नाही? या देशात घडलेल्या प्रत्येक गोष्टीवर आंदोलनकर्त्या एखाद्या नेत्याची प्रतिक्रिया घ्यायची? ते नेतेसुद्धा गांधी टोपी घालणार, गांधीवादाच्या गप्पा मारणार आणि "एकही मारा?' विचारणार? आणि आमचे वाहिन्यांचे पत्रकार अशा सवंग, असभ्य आणि उतावळ्या मसीहावादाची लागण झालेल्यांच्या अशा कुत्सित प्रतिक्रियांना मोठी प्रसिद्धी देणार? काय साधणार किंवा साधले त्यातून? अशी प्रतिक्रिया देणारे, त्या प्रतिक्रियेचा निषेध न करणारे आणि ती वारंवार दाखवत राहणारे सारेच धन्य! कोणत्या थराला जाणार आहे या वाहिन्यांचा बाजारू, गल्लाभरू, सवंग आणि विकृत बेजबाबदारपणा? हा माज किंवा उन्माद रोखायलाच हवा, नाहीतर समाजाचे अतोनात नुकसानच होईल.
प्रसारमाध्यमांच्या चुकांबद्दल वेळीच थेट ठाम, ठोस आणि सुस्पष्ट भूमिका घ्यायलाच हव्या. न्यायमूर्ती काटजू यांनी अशा उन्मत्तपणाला आळा घालण्यासाठीच इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांवर नियंत्रण चौकट घालण्याची आवश्यकता प्रतिपादन केली, तेव्हा वाहिन्यांनी त्याचा निषेध करून स्वयंनियंत्रणाच्या बाता मारल्या. कोठे गेले ते स्वयंनियंत्रण? ते होणे शक्य नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमातीलच ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मंडळींचे एक मंडळ बनवले जाणे, आणि प्रेस कौन्सिलप्रमाणेच त्यांचे नियंत्रण या उन्मत्त झालेल्या वाहिन्यांवर असणे, म्हणजे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणे नाही. या वाहिन्यांनी कसेही उन्मत्त, बेबंद वागावे आणि त्यावर नियंत्रण नसावे, हे आता फार काळ चालणार नाही. सभ्यता, सुसंस्कृतता, जबाबदारीचे भान आणि भोवतालच्या वास्तवाची जाण असणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यात एकत्रित स्वरूपात अपेक्षित आहे. तसे ते नसेल तर स्वातंत्र्याचा स्वैराचार आणि व्यभिचार व्हायला वेळ लागत नाही, हेच कालच्या वाहिन्यांच्या उन्मत्त प्रसारणातून दिसले. एनडीटीव्ही आणि सीएनएन, आयबीएनचा मात्र अपवाद होता. एका बातमीपत्रात एकदाच हे दृश्य फक्त रात्रीपर्यंतच दाखवले गेले. त्यांचा आदर्श इतर वाहिन्यांनी घ्यायला हवा.
एक बरे झाले- मसीहावादाची लागण झालेल्या काही नेत्यांच्या वक्तव्याने, त्यांच्याबद्दलची देवत्वाची भावना बाळगणाऱ्यांना झटका बसून ते हतबल झाले. नंतरच्या सारवासारवीला काही अर्थच उरला नाही.
प्रसारमाध्यमांच्या आणि दर क्षणाला बकणाऱ्या या मसीहांच्या उन्मत्तपणाला आळा घातला गेलाच पाहिजे आणि जनताच ती घालू शकते. सरकारने आता खरोखरच वाहिन्यांचा स्वयंनियंत्रणाचा आग्रह धुडकावून इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर नियंत्रण करणारी ब्रॉडकास्टिंग रेग्युलेरेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडिया (ब्राय)ची स्थापना करावी आणि या उन्मत्तपणाला अधिक वाट न बघता वेसण घालावी, हेच बरे!
प्रसारमाध्यमांमधील संकलनाचे एक व्याकरण असते. या माध्यमांमध्ये मागील पंचवीस वर्षे अथक काम केलेल्यांना ते उत्तम समजते. दीड सेकंदाचा तोच क्षण एकामागून एक परत परत जोडून एकदा मारलेल्या थपडेच्या दहा-बारा थपडा करण्याच्या या प्रकाराला मानसिक विकृती म्हटले पाहिजे.
'सकाळ'वरून साभार

0 टिप्पण्या