'सकाळ' नगर आवृत्तीच्या निवासी संपादकपदी बोठे

अहमदनगर - सकाळच्या नगर आवृत्तीच्या निवासी संपादकपदी ज्येष्ठ पत्रकार बाळ ज. बोठे-पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी आज पदाची सूत्रेही स्वीकारली. यावेळी पुण्याहून आलेले सकाळचे उच्चपदस्त अधिकारीही उपस्थित होते. बेरक्याने पंधरा दिवसांपूर्वी वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे.

धडाकेबाज पत्रकारितेसाठी ओळखले जाणारया बोठे-पाटील यांचा जिल्ह्यातील राजकारण, सहकार, प्रशासन या क्षेत्रात आदरयुक्त दबदबा आहे. सकाळच्या नगर आव-त्तीच्या प्रमुख पदाची जबाबादारी त्यांनी १८ वर्षे सांभाळली. त्यानंतर फेब्रुवारी २०११ मध्ये त्यांनी पुढारीच्या नगर आवृत्तीच्या ब्युरो चीफपदाची सूत्रे स्वीकारली. अवघ्या चारच महिन्यांत त्यांनी पुढारीच्या ले आऊटमध्ये अमुलाग्र बदल करून सकाळच्या तो़डीस तोड अंक देण्यास सुरवात केली. एकाच महिन्यात तब्बल ७० लाखांचे उत्पन्न मिळवून दिले. ३४ हजारावर असलेला खप ४७ हजारावर नेला. त्यांच्या या कामाची दखल घेत दिव्य मराठीवाल्यांनी त्यांची नगर आवृत्तीसाठी निवड केली. त्यांना तगडे पॅकेज देऊन पुढारीतून डीएमला बोलावून घेतले. १५ आॅक्टोबरला डीएमची नगर आवृत्ती सुरू झाली, तोपर्यंत बोठेपाटील यांच्या प्रयत्नांमुळे अंकाचे बुकिंग २० हजारापर्यंत गेले होते. नगर आवृत्तीच्या लाँचिंगसाठी भास्कर ग्रुपचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल स्वत नगरला आले होते. बोठेपाटील यांच्या कामाचा झपाटा आणि लोकसंपर्क पाहून उदघाटनाच्या कार्यक्रमात अग्रवाल यांनी बोठेपाटील यांचे तोंडभरून कौतुक केले होते. त्यानंतर बोठे-पाटील यांना निवासी संपादकापेक्षा मोठे असलेले राजकीय संपादक हे पद देण्यात आले.

एवढे झाल्यानंतर सकाळवाल्यांना बोठेपाटील यांना पुन्हा सकाळमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांना निवासी संपादक पद व मोठे पॅकेज देऊ केले. सुमारे महिनाभराच्या खलानंतर बोठेपाटील यांनी सकाळची ही आॅफर स्वीकारली आणि अखेर ते पुन्हा सकाळमध्ये आले.

श्री. बोठेपाटील वीस वर्षे पत्रकारितेत असून त्यातील १८ वर्षे त्यांनी सकाळमध्येच विविध पदांवर काम केले आहे. सध्या ते दैनिक दिव्य मराठीमध्ये राजकीय संपादक (पश्चिम महाराष्ट्र) या पदावर कार्यरत होते. शिवाय नगर आवृत्तीच्या ब्युरो चीफ पदाची जबाबदारीही त्यांच्याकडेच होती. लोकमत, केसरी, पुढारी, नगर टाइम्स या दैनिकातही पूर्वी बोठेपाटील यांनी काम केलेले आहे. त्यांनी आतापर्यंत एकूण १७ पदव्या संपादन केल्या असून नगर जिल्ह्यातील ते एकमेव उच्चशिक्षित पत्रकार मानले जातात. सध्या ते नगर जिल्ह्यातील राजकारणावर पीएचडी करीत आहेत. देशातील आणि परदेशातील विविध विद्यापीठांतूनही त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत.

शोध पत्रकारिता हा त्यांचा विशेष आवडीचा विषय. याबद्दल त्यांना देश व राज्यपातळीवरील सुमारे ३८ विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी शोधपत्रकारितेद्वारे हातळलेली ६८ प्रकरणे राज्यभर गाजली. नगर जिल्ह्यात विविध क्षेत्रातील व्यक्तींचे चित्रण उभी करणारी कारभारी जिल्ह्याचे ही त्यांची सकाळमधील शंभर भागाची मालिका खूप गाजली. लवकरच ती पुस्तकरुपाने पुन्हा प्रकाशित करण्यात येणार आहे.

दिव्य मराठीच्या स्पर्धेत आपली मातृसंस्था असलेल्या सकाळचा गड कायम ठेवण्यासाठी ते कसे काम करतात, याकडे आता लक्ष लागले आहे. सकाळमधील त्यांच्या दुसरया इनिंगला बेरक्याच्या शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments