जे.डे. हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल

 मुंबई - ज्येष्ठ पत्रकार जे.डे. यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शनिवारी आरोपपत्र दाखल केले. त्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन फरार आरोपी असून पत्रकार जिग्ना वोरा आरोपी क्रमांक अकरा आहे.
विशेष मोक्का न्यायाधीश एस. एम. मोडक यांच्यासमोर हे ३0५५ पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले. यात दहाही आरोपींवर हत्या, हत्येचा कट रचणे यासह मोक्का लावण्यात आला आहे. वोरा आरोपी असली तरी तिच्या सहभागाचा या आरोपपत्रात उल्लेख नाही. पुरवणी आरोपपत्रात तिचा सहभाग स्पष्ट केला जाईल. येत्या काही दिवसांतच हे आरोपपत्र दाखल केले जाईल, असे सरकारी पक्षाने स्पष्ट केले.
आरोपपत्रात मुख्य आरोपी सतीश काल्या असून दीडशेहून अधिक साक्षीदारांची साक्ष आहे. सात ते आठ पत्रकारांची साक्षही यात आहे. या गुन्ह्यात छोटा राजनसह आरोपी नयन बीष्टला फरारी दाखविण्यात आले आहे. यातील तीन आरोपींनी कबुली जबाब दिला असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
या आरोपपत्राची प्रत देण्यात यावी, अशी मागणी आरोपींच्या वकीलांनी न्यायालयात केली. मात्र आरोपपत्र आरोपींना कारागृहात द्यावे व त्यांच्याकडून ते वकिलांनी घ्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले. यावरील पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. जून महिन्यात जे.डे. यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली.गेल्या महिन्यात पत्रकार वोराच्या अटकेने याप्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.


आरोपींची नावे
सतीश काल्या, अभिजित शिंदे, अरूण ढाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी, पॉलसन जोसेफ, दीपक शिसोडीया, जिग्ना वोरा

आरोपींवरील कलमे
■ आयपीसी ३0२, १२0 (ब), २0१ सह ३४
■ मोक्का कलम ३(१), ३(२), ३(५), ५
■ बॉम्बे पोलीस अँक्ट कलम १९,३७, १३५
■ शस्त्रास्त्र कायदा कलम ३, २५, २७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या