पत्रकारांनी लेखणीला विचारांची धार द्यावी : शिंदे

सोलापूर : पत्रकांरानी आत्मचिंतन करण्याची आणि लेखणीला विचारांची धार देऊन समाज बदल करण्याची गरज आहे.  समाज उन्नतीचा ध्यास घेऊन नव्या पत्रकारांनी पत्रकारिता करायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने यंदाच्या वर्षीपासून पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य राज्यस्तरीय पुरस्कार आणि बाबुराव जक्कल जिल्हास्तरीय पुरत्तकार वितरणाचे आयोजित करण्यात आले होते.  यंदाच्या वर्षी ज्येष्ठ पुरस्कार प्रताप आसबे (मुंबई) यांना रंगाअण्णा वैद्य राज्यस्तरीय पुरस्कार तर श्रीनिवास दासरी यांना बाबुराव जक्कल जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.  अनुक्रमे रु. २५ हजार व रु. १५ हजार आणि स्मृतीचिन्ह, शाल अशा स्वरूपाचे हे पुरस्कार अ‍ॅम्फी थिएटर येथील समारंभात ना. शिंदे व पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना ना. शिंदे म्हणाले की, श्रमीक पत्रकारसंघाने हा पुरस्कार सुरू करून रंगाअण्णा वैद्य आणि बाबुराव जक्कल यांच्या बाबतची कृतज्ञताच व्यक्त केली आहे.  दूरदृष्टी असणा-या या दोन पत्रमहर्षिंनी पत्रकारीतेच्या माध्यमातून सोलापूरसाठी प्रचंड योगदान दिलेले आहे.  पत्रकार हा अभ्यासक, विश्लेषणात्मक आणि आत्मचिंन करणारा असला पाहिजे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलेले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री ढोबळे म्हणाले की, रंगाअण्णा व जक्कल यांनी पत्रकारांना खूप मार्गदर्शन केले आहे.  समाजमनाचे बारकावे त्यांनी आपल्या लेखणीतून मांडले.  सतीचं वाण समजून त्यांनी पत्रकारिता केली.
प्रताप आसबे व श्रीनिवास दासरी या दोन्ही सत्कार मुर्तीनंी आपल्या मनोगतातून पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.  याप्रसंगी उल्लेखनीय काम करणा-या विविध माध्यमांच्या प्रतिनीधींचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला.  पुरस्कार निवड समिती सदस्यांनाही गौरवविण्यात आले. या कार्यक्रमास दै.‘सुराज्य’ चे व्यवस्थापकीय संचालक राकेश टोळ्ये, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर, अ‍ॅड. मिलींद थोबडे, माजी आ. निर्मला ठोकळ, नगरसेवक उमेश मामड्याल, जयंतराव जक्कल, दिनेश शिंदे, दिपक राजगे, प्रा. कोंडी. प्रा. विलास बेत, दत्ता गायकवाड, शंकर पाटील, जयदीप माने आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

Post a Comment

0 Comments