महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयाची तोडफोड


मुंबई: मुंबईतील टाइम्स इमारतीवर शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ समर्थकांनी हल्ला केला. कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयाची तोडफोड केली.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी आणखी एक खासदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावर शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ राष्ट्रवादीत प्रवेश करु शकतात अशी बातमी महाराष्ट्र टाइम्सने आपल्या आजच्या अंकात छापली आहे. त्याचा राग आल्याने अडसूळ समर्थकांनी कार्यालयची तोडफोड केल्याची प्रतिक्रिया अडसूळ यांनी दिली.

दरम्यान बँक एम्पॉईज असोसिएशनचा बोर्ड हातात घेऊन आलेल्या १६ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर दंगल, घुसखोरी आणि मालमत्तेचं नुकसान यांसारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
व्हिडीओ: टाईम्स'मध्ये सेनेचा राडा
'ही बातमी म्हणजे माझ्या ४० वर्षांच्या कारकीर्दीला कलंक लावणारी आहे, अशी प्रतिक्रिया खासदार आनंदराव अडसूळ यांनी हल्ल्यानंतर दिली. या बातमीमुळे माझ्याबद्दल अनेक गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र टाइम्सने बातमी छापण्यापूर्वी माझ्याशी शहानिशा करायला हवी होती,' असं आनंदराव अडसूळ यांनी म्हटलं आहे.

'खात्री नसताना महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त छापायला नको हवं होता. हा प्रक्षोभ जनसामान्यांचा आहे,' अशी प्रतिक्रिया सेनेचे आमदार अभिजीत अडसूळ यांनी म्हटलं आहे.

तर 'आंनंदराव अडसूळ यांच्याबद्दलचं वृत्त छापण्यापूर्वी वृत्तपत्राचा विचार करायला हवा होता, असं शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. संतापाचा उद्रेक झाल्यानंतर अशी प्रतिक्रिया होते,' असं राऊत म्हणाले. त्यामुळे मीडियाने नेत्यांनी बदनामी करु नये.

टाइम्स कार्यालयाच्या तोडफोडीचा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी निषेध केला आहे. संबंधित कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. ज्यांनी कार्यकर्त्यांना हा हल्ला करण्यास प्रवृत्त केलं असेल वा प्रोत्साहन दिलं असेल त्यांच्यासह सर्वांवर अजामीनपत्राचा गुन्हा दाखल करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत हा हल्ला सहन करणार नाही, हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात नेऊन आरोपींनी लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, अशा पद्धतीची पावलं सरकारतर्फे उचलली जातील असं आश्वासन गृहमंत्र्यांनी दिलं.

दुसरीकडे महाराष्ट्र टाइम्सने हा हल्ल्याचा निषेध केला आहे. 'कोणलाही कायदा हातात घेण्याची आवश्यकता नव्हती. आजच्या अंकातील बातमी ही कोणत्याही नेत्याची बदनामी करण्यासाठी नव्हती. पण आनंदराव अडसूळ यांनी निवेदन देणं गरजेचं होतं,' अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अशोक पानवलकर यांनी दिली. तसंच अडसूळांचं निवेदन उद्याच्या अंकात प्रसिद्ध करु, असं आश्वासन अशोक पानवलकर यांनी दिलं.

त्याचबरोबर प्रसारमाध्यम आणि वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर हा हल्ला असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक सारंग दर्शने यांनी दिली.

Post a Comment

0 Comments