दुःखद निधन

परभणी येथील इ-टीव्ही मराठीचे प्रतिनिधी आणि आमचे पत्रकार मित्र रवी पांगारकर यांचे शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास हार्ट ऍटॅकनं निधन झालं.ते केवळ 47 वर्षांचे होते.त्यांच्या मागं पत्नी,मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर आज सायंकाळी चार वाजता वसमत येथे अत्यंसंस्कार करण्यात येत आहेत.मुळचे वसमत येथील असलेले पांगारकर यांनी तरूण भारत आणि अन्य काही दैनिकात पत्रकारिता केल्या नंतर ते इलेक्ट्रॉनिक माघ्यमांमध्ये गेले.त्याच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी भंडारा येथील कांचन देशपांडे यांचा ह्दयविकारानं मृत्यू झाला.त्यानंतर नगर येथील पराग चौकारही असेच ह्दयविकाराचे बळी ठरले.आता रवी पांगारकर यांचाही ह्दयविकारानं बळी घेतला आहे.कामाचा ताण,अवेळी जेवण,रात्रीची जाग्रणं,व्यायामाचा अभाव,सततची धावपळ यासाऱ्याचा पत्रकारांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यांचं दिसून येत आहे.पत्रकारितेची नशा असते.या धुंदीत काम करीत असताना बहुसंख्य पत्रकारांचे आपल्या आरोग्याकडं दुर्लक्ष होतं.त्याचे परिणाम त्याच्या कुटुंबाना भोगावे लागतात.तुटपुंजे उत्पन्न आणि अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणाऱ्या पत्रकारांवर अचानक असा काही प्रसंग आढावला तर त्याच्या माघारी सारे कुटुंब रस्त्यावर येण्याची भिती असते.अशी काही उदाहऱणं माझ्याकडं आहेत.
सरकारला या सर्वाची चिंता असण्याचं कारण नाही.पत्रकार पेन्शन योजना सुरू करावी अशी मागणी करून करून आम्हा हतबल झालोत सरकार ढम्म आहे.आमच्या सततच्या पाठपुराव्या नंतर सरकारनं शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निघी सुरू केली खरी पण या समितीच्या बैठकाच नियमित होत नाहीत आणि जी रक्कम गरजू पत्रकारांना दिली जाते ती अपुरी तर आहेच आणि त्यासाठी शंभर सोपस्कार पूर्ण करावे लागतात त्यामुळं ही योजना असून नसल्यासारखीच आहे.सरकार पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा करीत नाही आणि पत्रकारांच्या जीवन-मरणाबद्दलही सरकारला काही देणं घेणं नाही.समाजासाठी आय़ुष्यभर खास्ता खाणारे पत्रकार वेळ येते तेव्हा खरोखरच एकटे पडतात हे अनेकदा दिसून आलं आहे.आता पत्रकार संघंटनांनीच मोठा निधी जमा करून आपल्या सदस्यांच्या मदतीसाठी काही योजना आखण्याची गरज आहे.त्यासाठी साऱ्यांनी एकत्र येऊन याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे.अन्यथा देशपांडे,चौकार.पांगारकर यांच्यानंतर कोणाचा नंबर लागेल ते सांगता येणार नाही.
रवी पांगारकर यांच्या कुटुंबियांना सरकारनं आर्थिक मदत करावी अशी मराठी पत्रकार परिषद मागणी करीत आहे.
 
एस.एम.देशमुख 

Post a Comment

0 Comments