सोलापुरात पोलिसी राज

पत्रकारांवरील पोलिसी अत्याचाराची श्रीरामपूरची घटना ताजी असतानाच त्यापेक्षाही भयंकर आणि पत्रकारांच्या लेखन स्वातंत्र्याचीच होळी करणारी,आणिबाणीची आठवन करून देणारी घटना सोमवारी दि.२८-०२-12  सोलापूर महानगरात घडली.सुराज्य हे सोलापूरमधील प्रतिष़्िठत दैनिक.या दैनिकात रविवारच्या अंकात "बळी तो कान पिळी' या मथळ्याखाली एक लेख प्रसिध्द झाला आहे.या लेखामुळं पोलिसांची बदनामी( पोलिसांची बदनामी किती मोठा विनोद आहे नाही ?) झाली असं कारण सांगत आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हणजे १९२२ च्या कायद्याचा आधार घेत सोलापूरच्या मस्तवाल पोलिसांनी पोलिस आयुक्तांच्या सांगण्यावरून सुराज्यचे संपादक राकेश टोळये यांच्यावर गुन्हा दाखल केला.याची खबर टोळये यांना मिळण्यापूर्वीच १४-१५ पोलिसांची एक टोळी रात्री साडेदहाच्या सुमारास सुराज्य च्या कार्याल्यात घुसली आणि त्यांनी अरेरावी करीत टोळये यांना त्यांच्या कायार्र्लयातूनच अटक केली.टोळये यांना रात्रभर पोलिस कोठडीत डांबून  ठेवण्यात आलं.दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर उभे करून पोलिसांनी "आरोपी'ला सात दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयाक डं केली .सुदैवानं पोलिसाचा हेतू चांगला नाही हे न्यायालयाच्या लक्षात आलं आणि न्यायालयानं टोळये यांना जामिन मंजूर केला.टोळये यांना आठ दिवस "आत' ठेवण्याचा पुरता बंदोबस्त पोलिसांनी केला  होता.न्यायदेवतेमुळं तो फसला.टोळये बाहेर आले.पत्रकारावर हल्ले करायचे,त्यांच्यावर खोटे खटले भरायचे आणि त्यांना काम करणे कठीण करून टाकायचे अशा घटना राज्यात सातत्यानं होत आहेत.टोळये यांच्यावर पोलिस अत्याचार करीत होते तेव्हा मुख्यमंत्र्यांना  "सरकार पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा का करीत नाही 'असा जाब आम्ही मुंबईत विचारत होतो.त्यांचं उत्तर टेप केलेलं आहे.बघु या पाहू या,केंद्रानं  कायदा करावा म्हणून आग्रह धरू या अशी उत्तर मुख्यमंत्री देत होते.सरकारच्या अशा भूमिकेमुळं सरकार  पत्रकारांचं संरक्षण करीत नाही हे राजकीय कार्यकर्ते आणि पोलिसांच्या लक्षात आल्यानं पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनात चिंताजनक वाढ झाली आहे.विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या काळात पत्रकारांवर सर्वाधिक हल्ले झालेले असतानाही सरकार काहीच करीत नसेल तर न्या.काटजू यांनी म्हटल्याप्रमाणे अशा निष्क्रिय सरकारला सत्तेवर राहण्याचा काहीच अधिकार नाही.सरकारला वठणीवर आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे हाच एक प्रभावी मार्ग असू शकतो असं मला वाटतं. सोलापूरमधील पत्रकार वरील घटनेच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसत आहेत. आज त्यांची बैठक होत आहे .या आंदोलनात माझ्यासह महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे काही सदस्य सहभागी होत आहेत.आपला सर्वांचा पाठिंबा अपेक्षित आहे.वृत्तपत्र स्वातंत्र्य,अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारा हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही हे आपणास सरकारला दाखवून द्यावं लागेल. पोलिस आयुक्तांची तातडीन बदली करावी अशी आमची मागणी आहे.आज सोलापूरात हे घडंलंय,उद्या आपल्या गावात आपल्याबाबतही असंच घडू शकत. ती वेळ येऊ ध्यायची नसेल तर साऱ्यांनी एकजूट दाखवावी लागेल.फेसबुकवरही प्रतिक्रियांचा पाऊस पाडावा लागेल.

एस.एम.देशमुख 

Post a Comment

0 Comments