श्यामची आई नि संपादकांची आई...

जागतिक मातृदिनी १३ मे रोजी मीडियात बरेच काही छापून आलं. सकाळमध्ये जरा जास्तच. अगदी शब्दकोडं, भविष्य लिहिणा-या कुडमुड्यांनीही आईवर लेखणी घासली. सप्तरंगच्या २४ पानांचा एकूण एक कोपरा आईवरच्या लिखाणानं भरला होता. चांगलं आहे. अलिकडं सकाळनं या विषयाचा इतका चावून चोथा केला की बास. याचं कारण मुख्य संपादकांचा आई हा विषय फार जवळचा. आपली आई आणखीच ग्रेट. मागं त्यांची आई इंग्रजीत प्रसिद्ध झाली. त्या दिवशी सकाळच्या झाडून आवृत्त्यांना आईच्या महतीचं कव्हर चढलं. इंग्रजीत त्याला जॅकेट म्हणतात. या जॅकेटवर अर्थातच मुख्य संपादकांची आई! (म्हणजे लेख, पितृदिनाला वडिलांवर लेख).  कालच्या सप्तरंगमध्ये पुस्तक परिचयात कहरच झाला आहे. पाच पुस्तकांची परीक्षणं छापली आहेत. श्यामची आई व इतर तीन आयांच्या पुस्तकांना प्रत्येकी १०-१२ ओळी तर संपादकांच्या `आई समजून घेताना' पुस्तकाला ३२ ओळी. या पुस्तकाचं कव्हरही इतर चार पुस्तकांपेक्षा दुप्पट आकाराचे! खरी गंमत पुढं आहे. पुस्तक परिचयाच चक्क लेखकाचे कोट घेतले आहे. श्यामची आई आणि त्यांची आई या तुलनेवर ते म्हणतात, "साने गुरुजींनी लिहिलेली श्यामची आई ही कादंबरी आहे तर माझी अक्का (आई) ही वस्तुस्थिती आहे. दोघींचे जीवन भिन्न आणि त्या जगत असलेल्या व्यवस्थाही भिन्न!"  पुढं या पुस्तकाचे देशात-परदेशांत कसे स्वागत झाले...चौदा आवृत्त्या कशा निघाल्या....समीक्षेवर पारितोषिकं कशी लावली...हजारो वाचकांनी पुस्तक वाचले...असे वर्णन आहे. असेलही खरे. श्यामची आई पुस्तकाच्या फक्त "शेकडो" प्रती खपत आहेत. असा ओझरता उल्लेख आहे. (गेल्या ६० वर्षांत श्यामची आई या पुस्तकाच्या किती प्रती खपल्या याची गिनती करणारा संपेल. पण गिनती पुरी होणार नाही.)
बाकी राहू देत...साने गुरुजींची केवळ श्यामची आई लिहीली एवढीच ओळख होती का? त्यांचे जीवन म्हणजे करुणेचा मोठा इतिहास होता. केवळ दलितच नाही तर समाजातल्या हरेक दुबळ्या वर्गासाठी त्यांनी लढा दिला. उपेक्षित, वंचितांना हुंकार दिला. स्वातंत्रलढ्यात वैचारिक नेतृत्व दिले. हजारो निःस्वार्थी कार्यकर्ते घडविले. कुण्या जातीचे-पंथाचे अशी त्यांची ओळख मुळीच नव्हती. ते जगत असलेली व्यवस्था उसन्या अधिकारावर जगणा-या लेखकांनी मागीतली तरी मिळणार  नाही.  साने गुरुजींनी आयुष्यभर स्वतःला क्लेश करवून घेतला. (दुस-याला दिला नाही)  मानधनं आणि पुस्तकांचे गठ्ठे मिळतात म्हणून यांनी कधीच भाषणं दिली नाही. त्यांच्या करुणामय वक्तृत्वानं अनेक पिढ्या घडल्या. सानेगुरुजी कथामाला हे त्याचे फलीत. या आयुष्याची अखेरही करुणामय झाली. दुःख असह्य झालं तेव्हा गुरुजींनी स्वतःला संपविले. त्यावेळी ते कफल्लक होते. त्यांच्याकडे सरकारी कोट्यातला फ्लॅट होता ना गबर बँकबॅलन्स. श्यामची आई असल्या  "मदर्स डे" ची मौताज मुळीच नाही. "श्यामच्या आई"शी उगीचच तुलना करुन कुणी स्वतःला मोठं समजत असेल तर समजोत बिचारे! त्यांच्याशी वाद घालायला गुरुजी आहेत कुठं?  असते तरी त्यांचा टिकाव या ''व्यवस्थेनं" लागू दिला असता?