उत्तम कांबळे यांना पुरस्कार मिळालाच नाही...

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाने एक वर्षापुर्वी सकाळचे मुख्य संपादक उत्तम कांबळे यांना कै.प्रमोद महाजन स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर केला होता.मात्र त्याचे अद्यापही वितरण न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक पत्रकार संघ आहेत.मात्र उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघ (मराठी पत्रकार परिषद सलंग्न) व उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघ (राज्य मराठी पत्रकार संघ सलंग्न )यांच्यात स्पर्धा आहे. पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी धनंजय रणदिवे उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तर अनंत अडसूळ उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत.
उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे भारत गजेंद्रगडकर अध्यक्ष असताना सुनील ढेपे उपाध्यक्ष होते.ढेपे यांच्या सुचनेवरून या संघाने अनंत भालेराव स्मृती पुरस्कार सुरू केला.त्याची परंपरा अनेक वर्षापासून चालू आहे. तीन वर्षापुर्वी मतभेदातून उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघ स्थापन झाला.या संघानेही इर्षेला पेटून एक वर्षापुर्वी ५१ हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र असे स्वरूप असलेल्या कै.प्रमोद महाजन स्मृती पुरस्काराची घोषणा केली व पहिला पुरस्कार सकाळचे मुख्य संपादक उत्तम कांबळे यांना जाहीर केला.मात्र एक वर्षे झाले तरी या पुरस्काराचे वितरण नाही.याबाबत माशी कुठे  शिंकली , हे कोणास ठावूक..मात्र ज्यांच्या आर्थिक मदतीवर या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती, त्यांनी रक्कमच दिली नसल्यामुळे या पुरस्काराचे वितरण होत नसल्याचे समजते.
उत्तम कांबळे यांना पुरस्कार घोषित करण्यात आल्यानंतर त्याच्या मोठ - मोठ्या बातम्या सर्वच वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्या होत्या.सकाळनेही ठळक प्रसिध्दी दिली होती.पुरस्कार घोषित करून, तो ने देणे हा संबंधितांचा सर्वात मोठा अपमान आहे.उत्तम कांबळे यांचा उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे जो अपमान केला आहे, त्याचा निषेध करावा,तेवढा थोडा आहे.याबाबत अनंत अडसूळ यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत मूग गिळून गप्प आहेत.

'उस्मानाबाद लाइव्ह' वरून साभार  

Post a Comment

0 Comments