दै. ‘नवप्रभा’चे संपादक परेश प्रभू यांना स्व. नारायण आठवले स्मृती पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार स्व. श्री. नारायण आठवले यांच्या स्मरणार्थ श्री. आठवले यांनीच ३० वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या गोव्यातील ‘लोकविश्वास प्रतिष्ठान’ तर्फे यंदापासून महाराष्ट्र व गोव्यातील पत्रकारांसाठी ‘स्व. नारायण आठवले स्मृती पुरस्कार’ देण्यात येणार असून पहिल्यावहिल्या पुरस्कारासाठी गोव्यातील तरूण, धडाडीचे पत्रकार आणि दैनिक नवप्रभा (गोवा) चे संपादक श्री. परेश वासुदेव प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. काल पणजी येथे सिद्धार्थ बांदोडकर भवनात  घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. अनुप प्रियोळकर यांनी ही घोषणा केली.
रू. ११,१११ रोख, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या दि. १६ ऑगस्ट रोजी फोंडा येथे लोकविश्वास प्रतिष्ठानच्या सिद्धार्थ बांदोडकर स्मृती सभागृहात संध्याकाळी ४.३० वाजता गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते व ज्येष्ठ पत्रकार श्री. अरुण टिकेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या कार्यक्रमात श्री. प्रभू यांना हा पुरस्कार  प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी गोव्याचे सार्वजनिक बांधकाम व वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर, तसेच समाजकल्याण मंत्री महादेव नाईक हेही उपस्थित राहणार आहेत.
लोकविश्वास प्रतिष्ठानतर्फे या पुरस्कारासाठी एक निवड समिती स्थापन करण्यात आली होती. ज्येष्ठ पत्रकार व ‘सकाळ’चे माजी संपादक श्री. विजय कुवळेकर, गोव्यातील ‘राष्ट्रमत’ दैनिकाचे माजी संपादक व ज्येष्ठ पत्रकार श्री. सीताराम टेंगसे, ज्येष्ठ समीक्षक श्री. रवींद्र घवी, तसेच मुंबई स्थित ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. रामकृष्ण नायक यांच्या समितीने या पुरस्कारासाठी श्री. प्रभू यांची निवड केली.
महाविद्यालयीन जीवनापासून पत्रकारितेमध्ये असलेले श्री. परेश प्रभू सध्या गोव्यातील ४२ वर्षांची परंपरा असलेल्या दैनिक नवप्रभाचे संपादक आहेत. धेंपो उद्योगसमूहाच्या मालकीचे हे मराठी दैनिक असून पत्रमहर्षी द्वा. भ. कर्णिक हे त्याचे पहिले संपादक होते. श्री. प्रभू यांनी कै. चंद्रकांत घोरपडे यांच्या हाताखाली दैनिक गोमन्तकमध्ये उपसंपादक म्हणून आपल्या पत्रकारितेतील पूर्णवेळ कारकिर्दीस प्रारंभ केला. उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक, पुरवणी संपादक, दिवाळी अंक संपादक, वृत्तसंपादक, कार्यकारी संपादक अशा विविध जबाबदार्‍यांवर काम करण्याचा त्यांना गेल्या वीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. ‘नवप्रभा’ च्या संपादकपदी आल्यानंतर त्यांनी त्या दैनिकाचा समूळ कायापालट केलेला आहे. सामाजिक व सांस्कृतिक चळवळीतही ते सक्रिय असून गोव्यात युवा मराठी साहित्य संमेलनांची चळवळ त्यांनीच उभारली होती. सध्या गोवा सरकारच्या प्रेस एक्रिडिटेशन कमिटीचेही ते अध्यक्ष आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या