वर्तमानपत्रांची (अ) वाचनसंस्कृती...

वाचनसंस्कृतीच्या प्रश्नाचा माग काढायचा, शोध घ्यायचा, पाठलाग करायचा आणि झाडाझडतीचं हाती सत्र घेण्याची मालिका ‘अनुभव’ मासिकानं सुरू केलेली आहे. त्याअंतर्गत ज्येष्ठ पत्रकार, माध्यम समीक्षक तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागातील प्रपाठक जयदेव डोळे यांनी सप्टेंबरच्या ‘अनुभव’मध्ये घेतलेली वर्तमानपत्रांच्या वाचनसंस्कृतीची झाडाझडती. 

प्रत्येक शनिवारी सायंकाळी वृत्तपत्र विक्रेत्याकडून माझी खरेदी झाली की मी पुस्तकांच्या एका दुकानात अर्धा-पाऊण तास बसतो. मामांबरोबर (दुकानाचे मालक) चहा आणि गप्पा चालू असताना त्यांचा मुलगा व दुकानाचा तरुण मालक माझ्याकडील वृत्तपत्र व साप्ताहिकांमध्ये काही तरी शोधत असतो. ‘एशियन एज’मध्ये इंग्रजी पुस्तकांबद्दल काही छापून आल्यास त्याची तो नोंद घेतो. ‘तहलका’, ‘शुक्रवार’, ‘आऊटलुक’, ‘ओपन’ यातूनही त्याची हिंदी-इंग्रजी पुस्तकांची शोधाशोध चालू असते. आपलं दुकान देशाच्या पुस्तक व्यवहारात मागे पडू नये म्हणून त्याची ही धडपड असते. त्यासाठी त्याचा एकमेव आधार म्हणजे दैनिकं आणि साप्ताहिकं यात प्रसिद्ध होणारी पुस्तकविषयक दुनिया. पाठ्यपुस्तकांची गिर्‍हाइकं सोडल्यास उर्वरित मोठी गिर्‍हाइकं वृत्तपत्रांतील पुस्तकांच्या जाहिराती, परीक्षणं आणि परिचय वाचूनच दुकानात येतात. 
वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवण्या हा सध्याचा पुस्तकविषयक माहितीचा पुरवठादार. ‘मराठी साप्ताहिकं’देखील पुस्तक परिचय आणि जाहिराती याद्वारे पुस्तकांविषयी माहिती देत असतात. आपला वाचक इतरांसाठी मोकळा करून देण्याचा हा प्रकार म्हटला तर बावळटपणाचा, म्हटला तर फार शहाणपणाचा. कोणता दवाखाना आपल्या परिसरात दुसऱ्या प्रतिस्पर्धी दवाखान्याची जाहिरात करतो? कोणी हलवाई असं सांगतो का, आमच्यापेक्षा हे हे पदार्थ दुसऱ्या हलवायाकडे छान मिळतात म्हणून? कोणतंही महाविद्यालय आपल्याबरोबरच अमुक-तमुक महाविद्यालयतही चांगलं शिक्षण दिलं जातं असं येता-जाता सांगत बसत नाही. मग वृत्तपत्रं आणि साप्ताहिक यांना काय पडलं आहे वाचकाला नवा पर्याय सतत सांगत बसायला? वर्तमानपत्रंही वाचा आणि पुस्तकंही वाचा; आम्हाला काही फरक पडत नाही, अशी भूमिका कशी परवडते त्यांना?
या शंकांना उत्तर असं, की दीड-दोन रुपयांच्या वृत्तपत्रांना शंभर-दोनशे रुपयांची पुस्तकं स्पर्धक ठरू शकत नाहीत. दोघांची ताकद वेगळी, दोघांचा परिसर वेगळा आणि मुख्य म्हणजे दोघांची उपयुक्तता भिन्न. एक वृत्तपत्र वाचायला काही मिनिटं पुरतात, शिवाय लक्ष अर्धवट असलं तरी चालतं. पुस्तक मात्र लक्षपूर्वक वाचावं लागतं आणि ते वेळ फार मागतं. वृत्तपत्राला ना पावित्र्य, ना माहात्म्य. पुस्तकांना शालेय जीवनापासूनच दप्तराचा देव्हारा मिळालेला अन् टेबलाचा टापू राखीव लाभलेला. त्यामुळे पुस्तकं जपून वापरायची असतात, पुस्तकं मळवायची नसतात, पुस्तकं ज्ञान देत असतात, अशी सोवळी प्रतिमा त्यांची झालेली. पुस्तकांना असं थोरपण शिक्षण नामक चौकटबंद प्रक्रियेत प्राप्त होतं. वृत्तपत्रं बिचारी पानापानांतून सुटी होत घड्यांत आकसून जात विसविशीत होऊन जातात, कुठेही लोळत राहतात, टाकून दिल्यासारखी! म्हणजे कोणत्याच अर्थाने वृत्तपत्रांना पुस्तकांची सर नाही. पाच-दहा वृत्तपत्रं एकीकडे, एक पुस्तक दुसरीकडे. पुस्तकांना आदर एवढा, की ‘चार बुकं वाचली की झाला शहाणा’ असंही आपल्याकडे म्हटलं जातं. ‘चार पेपर वाचले म्हणून झाला बुद्धिमान’ असं कोणी म्हणणार नाही. उलट, ‘पेपर वाचण्यात वेळ किती घालवला’ अशी बोलणी त्यामुळे खावी लागणार.. तर असं हे दोन मुद्रित माध्यमांचं स्वरूप. मग त्यांनी एकमेकांना एवढा आधार का द्यायचा? त्यांचं खरोखर प्रेम असतं परस्परांवर? की वैरी आहेत ते एकमेकांचे? मराठी पत्रकारितेचा इतिहास असं सांगतो, की मूळचे ग्रंथकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे पहिलं पत्र काढलं. ते हैंद शाळा पुस्तक मंडळीचे नेटिव्ह सेक्रेटरी होते. ‘दर्पण’च्या आधी एक वर्ष त्यांनी ग्रंथरचना केल्या. म्हणजे मराठी पत्रकारितेचा जनक अर्धा ग्रंथकार व अर्धा पत्रकार होता. ‘दर्पण’च्या पहिल्या अंकात त्यांनी लिहिलं होतं, ‘...विलायतेतील विद्या, कला, कौशल्ये याविषयीचे व त्यातील ज्या भागांचा उपयोग या देशात झाल्यास फार हित आहे त्याविषयीचे लहान लहान ग्रंथ लिहिले जातील.’ याचा अर्थ असा, की केवळ ‘दर्पण’ छापून वा वाचून ज्यांची भूक भागणार नाही त्यांना असे ग्रंथ स्वत: संपादकच उपलब्ध करवून देतील. ग्रंथलेखन आणि पत्रकारिता यात द्वैत नसल्याचा हा तिच्या जन्मावेळचाच पुरावा. नंतरचा इतिहास बघितल्यावर कळतं, की महाराष्ट्रीय ग्रंथव्यवहार व पत्रकारिता बरोबरच चालली. लोकांना ज्ञान देण्यासाठी जे जे आवश्यक होतं ते ते त्यावेळी देण्यात आलं. लोकहितवादी, कृष्णशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आदी मंडळी दोन्ही लिखाणांत तरबेज होती. पुस्तक प्रकाशन व पत्रकारिता यांचा व्यवसाय एकाचवेळी करणारे लोकही त्या वेळी होते. छपाईयंत्र, कागद, शाई, कुशल कामगार यांचा योग्य वापर करून आणि शिक्षणाचं वाढतं प्रमाण पाहून हे दोन्ही व्यवसाय ठाकठीक चालले असणार. मराठी कादंबरीचा जन्मही असाच झाला. ‘मोचनगड’ कादंबरी लिहिणारे रा. भि. गुंजीकर हे ‘विविधज्ञानविस्तार’ मासिकाचे निर्माते असून त्यात त्यांनी तिचं १८६७ पासून लिखाण सुरू केलं. ‘मुक्तमाला’ कादंबरीचे लेखक लक्ष्मणशास्त्री हळबे हे १८६२ साली सुरू झालेल्या ‘इंदुप्रकाश’ पत्राच्या व्यवस्थापकांपैकी एक होते, तर पहिली कादंबरी   (यमुना पयर्टन, १८५७) लिहिणारे बाबा पदमनजी यांनी तिच्यात वृत्तपत्रांचे उल्लेख केलेले होते. पुनर्विवाहाविषयी लिहिताना बाबा म्हणतात, ‘गुजराथी लोकांत या कामाची बरीच वृद्धी होत आहे असे दिसते. नुकताच एक विवाह त्यांजमध्ये झाला. त्याविषयी ‘सुबोधपत्रिके’त जो मजकूर आला आहे तो आपणांस पाहण्याकरिता पाठविला आहे. पत्रिकाकाराने यासंबंधाने फार उत्तम विचार प्रकट केले आहेत तेही आपण वाचलेच. विधवांचे वपनाविषयीही लोकांचे विचार कसे बदलत चालले आहेत हे समजण्याकरिता ‘आर्यपत्रिका’ नामक पत्राचा एक अंक आपणाकडे पाठविला आहे तो पाहावा. मी पंढरपुरात असताना बडवे वगैरे लोकांमधे जो अनाचार चालत असे तसाच अद्याप चालत आहे. याविषयी एक पत्र ‘सुबोधपत्रिके’त छापले आहे. तेही आपणाकडे पाठविले आहे.’
सुमारे शंभर वर्षं ग्रंथ व पत्रं यांचं साहचर्य आणि एकी महाराष्ट्राने बघितली. १९३२ साली ‘सकाळ’ सुरू झाल्यावर साहित्य व पत्रकारिता यांचा संसार आटोपला. ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक नानासाहेब परुळेकर यांनी भाषा, आशय, वितरण, तंत्रज्ञान यात बदल करीत मराठी पत्रकारिता नव्या रस्त्यावर नेली. ग्रंथकार, साहित्यिक आणि जाडे जाडे विषय यांना फाटा देत ‘सकाळ’ थेट निघाला तो जुजबी शिक्षण घेतलेल्या वाचकाकडे, ब्राह्मण्याकडून बहुजन समाजाकडे, शहराकडून ग्रामीण महाराष्ट्राकडे. राजकीय अभिनिवेशाचाही त्याने त्याग केला आणि सर्वसमावेशक व सर्वस्पर्शी असं धोरण अंगीकारलं. स्वत: परुळेकर ग्रंथलेखक नव्हते. ‘सकाळ’चा व त्याच्या अन्य प्रकाशनांचा वाचक वाढवण्यावर त्यांनी भर दिला. त्यांची टाय व सूट परिधान करणारी प्रतिमा मराठी लेखकांसारखी नव्हती. ती उद्योगपतीसारखी होती. त्यांनी अमेरिकन दैनिकांचा कित्ता पुण्यात गिरवला. पुढे आयुष्यात मोठे लेखक झालेले अनेकजण आरंभीच्या काळात पत्रकारिता करताना अमेरिकेत पाहिले होते. तसं काही मराठीत घडलं ते प्र.के. अत्रे, वि.वा. शिरवाडकर, साने गुरुजी, जयवंत दळवी, विजय तेंडुलकर, अरुण साधू, ह.मो. मराठे आदी थोड्यांच्या बाबतीत. ‘केसरी’, ‘ज्ञानप्रकाश’ आदींची जुनी पत्रकारिता परुळेकरांनी मोडून टाकली. तसं होताच दैनिकांनी अथवा साप्ताहिकांनी आपल्यापुरता वाचक वाढावा व टिकवावा, अशी व्यावसायिक आत्मकेंद्री मराठी माणूस बघू लागला. या पत्रांपुरतीच निष्ठा वाचकांत उत्पन्न करण्याचे प्रयोग व उपक्रम सुरू झाले आणि वाङ्मय व वृत्तपत्रं यांच्यात खडाजंगी आरंभली. वाङ्मयाच्या स्वतंत्र पत्रकारितेलाही याच काळात बहर आला. ‘चित्रा’, ‘वीणा’, ‘झंकार’, ‘नवयुग’, ‘सत्यकथा’, ‘मौज’ आदी नियतकालिकांशी ना.सी. फडके, अनंक काणेकर, आचार्य अत्रे, उमाकांत ठोमरे, पु.शि. रेगे, श्री.पु. भागवत, मं.वि. राजाध्यक्ष, माधव कानिटकर, अनंत अंतरकर आदी साहित्यिक जोडले गेले. साहित्यात कलावाद की जीवनवाद असा एक तुंबळ संघर्षही याच दरम्यान उसळला. त्यामुळे कलावाद्यांचं साहित्य व ते स्वत: ‘जीवननिष्ठ’ पत्रकारितेपासून खूप दूर गेले. पत्रकारितेविषयी नाकं मुरडणंही तेव्हापासूनच सुरू झालं.
कलावाद्यांचा पत्रकारितेबद्दलचा तिटकारा एका मध्यमवर्गीय भूमिकेचा परिपाक होता. स्वातंत्र्यासाठी (राजकीय व सामाजिक) पत्रकारितेने जेवढी प्रखर भूमिका घेतली तेवढी मराठी साहित्याने घेतली नाही. अनेक पत्रकार तुरुंगात गेले, ब्रिटिशांकडून छळले गेले. मराठी साहित्यिकांपैकी साने गुरुजी, वामन चोरघडे, वि.दा. सावरकर आदी मोजक्यांची नावं त्यानुषंगाने समोर येतात. त्यामुळे झालं असं, की प्रतिष्ठा, मान, लोकमान्यता आणि सत्ता यामध्ये पत्रकार एकदम पुढे गेले. साहित्यिकांना तो मान लाभेना. हे मानभंगाचं प्रकरण साहित्य विरुद्ध पत्रकारिता या अंगाने प्रकटू लागलं आणि त्याची परिणती पुस्तकं, त्यांचा प्रचार, त्यांचं स्थान या बाबतीत वृत्तपत्रांकडून कंजूषी करण्यात झाली. तुम्ही आम्हाला मोजत नाही ना, मग आम्हीही तुम्हाला मोजणार नाही, असं शब्दांची दुनिया बांधणाऱ्या दोन श्रमिकांचं युद्धच जणू पेटलं! एक मध्यमवर्ग नव्या स्वातंत्र्यात सुस्थिर होऊन सुख शोधणारा होता. त्याला सत्तास्थानांशी झगडा नको होता. दुसरा मध्यमवर्ग मात्र ‘अजून स्वातंत्र्य पुरतं मिळावयाचं आहे’ या मताचा होता. तो सत्तास्थानांवर अंकुश ठेवू पाहत होता. त्याच्यासाठी पत्रकारिता अद्यापही ध्येयवादी व लढाऊ होती. सुखाची नोकरी व व्यवसाय टाळून गरिबांसाठी व समस्यांच्या विरोधात त्या काळी पत्रकारितेत कोण येत होतं? कनिष्ठ मध्यमवर्गीय, अर्धशिक्षित, ध्येयवादी सुशिक्षित असे मराठी तरुण. त्याला तेव्हाचं कलावादी, पलायनवादी, रोमांचवादी वाङ्मय आवडेनासं झालं. आपलं पत्रकार म्हणून राबणं लेखकांच्या कल्पनारम्य निर्मितीपेक्षा अधिक ठोस आहे असं तो मानत चालला. जीवनाचं दाहक वास्तव आपण पाहतो अन् हा मराठी लेखक मात्र अवास्तव खरडतो असं त्याला वाटू लागलं. आपण कष्टतो, मान मात्र या साहित्यिकाला, असा मत्सर पत्रकाराला पेटवू लागला. या अशा विषम वातावरणात साहित्य व पत्रकारिता एकमेकांच्या विरोधात उभी न राहती तरच नवल! चिं. वि.जोशी यांनी अनेकदा पत्रकार-संपादक यांची थट्टा केली आहे. त्यांच्यापासून सुरू झालेली पत्रकारितेची मस्करी मुकुंद टाकसाळे यांच्यापर्यंत चालूच आहे. जोतिरावांनी केलेली पत्रकारितेची बिंगफोड मामा वरेरकर, नाथमाधव, श्री. व्यं. केतकर यांच्या कादंबऱ्यांमधूनही प्रकटते. अशा वातावरणात इंग्रजी वृत्तपत्रांतील एक पद्धत अथवा पठडी साहित्याला लाकडाने शिवण्यासाठी उपयोगी पडली. रविवार पुरवणीत पुस्तकांची परीक्षणं, पुस्तकांच्या जाहिराती, लेखकांच्या मुलाखती, कविता, नव्या पुस्तकांचं स्वागत, अनुवाद छापण्याची इंग्रजी पत्रांची प्रथा असे. त्याची नक्कल मराठी वृत्तपत्रांनी सुरू केली आणि साहित्याला स्थानमान देत असल्याची ग्वाही दिली. परंतु साहित्याचं अग्रस्थान पत्रकारितेने हिरावलं ते हिरावलंच. इंग्रजी पत्रकारितेत संपादक मंडळी काही वाङ्मयीन मातबर नसत. निदान भारतात तरी. पण त्या पत्रांत स्वतंत्र ‘लिटररी एडिटर’ जसा असे तसा वाङ्मयीन भान असणारा पत्रकार नेमण्याची परंपरा मात्र मराठीत पडली. शंकर सारडा, दिनकर गांगल, महावीर जोंधळे, ह. मो. मराठे, प्रसन्नकुमार अकलूजकर, अरुणा अंतरकर, मनोहर शहाणे, सुरेशचंद्र पाध्ये, विद्याधर गोखले यांच्यापासून ते आजचे श्रीकांत बोजेवार, अपर्णा वेलणकर, मुकुंद कुळे, मुकेश माचकर आदीपर्यंतच्या रविवार पुरवणी संपादकांनी वाङ्मयीन वसा घेतलेला दिसतो. मात्र वाङ्मयीन मातबरी त्यांनी होऊ दिली नाही. मराठी पत्रकारिता साहित्यिक सावलीतून बाहेर पडताना तिने आपली एक भाषा, निर्मितितंत्र आणि आशयाची निवड इतकी ठोस करून टाकली, की एके काळी मराठी साहित्याची जाण नसलेल्यांना पत्रकारितेचं दार बंद होतं हे आज खरंच वाटत नाही. का? कारण जो साहित्य वाचतो तो सजग, सुजाण व सगुण असून पत्रकारितेसाठी लाभदायक आहे, असा मुळी संपादकांचाच समज होता. पुन्हा का? कारण साहित्याचं वाचन बरं असणाऱ्यांचं मराठी लेखनही बरं असणार, असाही एक समज होता. पत्रकारितेत येण्यासाठी निदान धड मराठी तरी नको का यायला? हे असं साहित्य डोक्यावर चढवून ठेवलेल्या पत्रकारितेने ते ओझं उतरवलं खरं, मात्र उतरवताना डोक्यातीलही थोडा हिस्सा सांडला हे तिच्या ध्यानी आलं नाही!
या वर्षाच्या जूनमधील एक प्रसंग. पुण्यात एका बड्या प्रकाशनसंस्थेने पत्रकार परिषद बोलावली - एका दिवंगत मराठी लेखकाच्या चार डझन पुस्तकांच्या प्रचारासाठी. पत्रकारांशी बोलणं आटोपल्यावर प्रकाशकांनी उपस्थितांसाठी पुस्तकांचा संच भेट देऊ केला. फुकट म्हटल्यावर तो ते घेऊन जातील अशी अपेक्षा होती. कसलं काय! अनेक संच उरले. आजच्या तरुण पत्रकाराला मराठी साहित्याशी काही देणं-घेणं नाही हे या प्रसंगातून सिद्ध झालं. तेही चक्क पुण्यात! पुण्यातच नव्हे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, ठाणे आदी शहरांतील असंख्य मराठी पत्रकार वाङ्मयविमुख आहेत. त्यांना वाचनाची आवडच नाही. साहित्य नसेना का, आपल्या आवडीच्या विषयात तरी त्यांना गोडी असावी ना! पण नाही. बहुसंख्य तरुण मराठी पत्रकार ‘साहित्यसपाट’ असून वाचनाची नावड असणारे आहेत. मग तेच जर असे, तर त्यांचे वाचक कसे असावेत? औरंगाबादेत श्याम देशपांडे हे एक ‘पत्रकार मित्र’ सर्व प्रकारच्या साहित्यिक पृच्छा-शंका-समस्या यांचं निवारण करीत असतात. ते काही दिवस आजारी पडले तर शहरातील पत्रकारांचं साहित्यविश्वच वैराण होऊन गेलं! मी ज्या पुस्तकांच्या दुकानात जातो तिथे मराठी पत्रकारांचा वावर शून्यवत आहे. प्रदर्शनं लागली की दोन-चार नेहमीचे भेटतात. बाकीचे साहित्यविश्वात कायम अडखळत, ठेचाळत चालतात. प्रकाशन समारंभ, गौरव पुरस्कार-निवडीनिमित्त सत्कार, साहित्य संमेलन अध्यक्षांची निवडणूक एवढ्यापुरता ज्यांचा साहित्याशी संबंध, त्यांच्याकडून मराठी वाचनविश्व समृद्ध व्हावं अशी कशी अपेक्षा ठेवणार? कोणी साहित्यिक दगावला की यांची धावपळ, धांदल बघण्यासारखी असते. कारण फार थोड्या वृत्तपत्रांच्या कार्यालयात सध्या ग्रंथालय असतं. असलं तरी ‘कोणी वाचत नाही’ अशा सबबीखाली त्यात भर पडलेली नसते. त्यामुळे दिवंगताचं साहित्य, मिळालेले पुरस्कार, थोडा इतिहास अशा माहितीसाठी संदर्भग्रंथांऐवजी संदर्भपुरुष गाठले जातात आणि बातम्या दिल्या जातात. त्यामुळे होतं असं, की भरपूर, विविध लिखाण करणारा साहित्यिक त्याच्या मृत्यूच्या बातमीतून मात्र साचेबंद पद्धतीने लोकांना समजतो. एकच बातमी साºया वर्तमानपत्रांत छापून येते. मजकूर तर सारखा असतोच पण ‘प्रतिक्रिया’ देणारेही तेच असतात! ‘तुम्ही आणून द्या लेख, आम्ही छापतो’ असा तोडगा काढून पुण्यतिथी, जयंती, श्रद्धांजली यांचा सोपस्कार पार पाडला जातो. पारितोषिकं, पुरस्कार, नामांकन यांच्या बातम्या तर अक्षरश: त्या देणाऱ्यावर विश्वास ठेवून छापल्या  जातात. पारितोषिकांचा दर्जा, लेखकाचा वकूब आणि प्रसिद्धीची जागा यात अजिबात ताळमेळ नसतो. त्यामुळे अनेक कवी व लेखक वृत्तपत्रांतून पारितोषिकविजेते म्हणूनच झळकत राहतात. हे लोक काय लिहितात, त्यांची लायकी काय, पारितोषिक देणाऱ्यांची प्रतिष्ठा काय, वगैरे बाबी तपासण्याच्या भानगडीत कोणी जात नाही. अशी बेफिकिरी ज्या साहित्यविश्वात, त्यात वाचनाची गोडी कोणी कोणाला लावायची? सुमार कुवतीचे लेखक-कवी प्रसिद्धीच्या कामात वाकबगार असतात. ते पत्रकारांचा पाहुणचार, आदरातिथ्य नियमित करत असतात. असं साहित्यविश्व पत्रकारांच्या मागे-पुढे झुलत असताना अस्सल साहित्य आपोआपच नजरेआड होणार. ते लोकांनाही तसंच असणार. पत्रकारांना समोर जे येतं तेच द्यावं लागतं. अबोल, भिडस्त, एकटे परंतु चांगले लेखक-कवी अशा व्यवहारात कायमचे मागे पडतात. हे लेखक पुढे पत्रकारितेच्या अशा एकतर्फी व्यवहारावर इतके रागावतात की पत्रकारितेचं नावच टाकतात, तिला नावं ठेवत राहतात. बस्स, सारा मामला ‘हमसे आया न गया, तुमसे बुलाया ना गया, फासला प्यार में दोनोंसे मिटाया ना गया’ असा होऊन जातो.   ‘गरज असेल तर येतील’ अशी सज्जता दोन्ही बाजू ठेवून असतात. तरीही या तुटकपणाला पत्रकार जबाबदार असल्याचं मी मानतो. लेखक-पत्रकार हे समानधर्मी असल्याचं तो विसरतो आणि दोन्ही जगं उपाशी ठेवतो. समान असं म्हणणंही आगाऊपणाचं होईल. साहित्य पत्रकारितेपेक्षा मोठं आहे असं मानलं तरच काही बदल होतील. पत्रकारितेचं महत्त्व भरपूर असलं तरी ते अन्यत्र. तिने साहित्यापुढे कमीपणाच पत्करायला हवा. कमीपणा म्हणजे दुय्यम दर्जा असा नव्हे. गुटेनबर्गच्या उदरातून जन्मलेली ही थोरली-धाकटी भावंडं होत, असा व्यवहार राहिला तरच काही लाभ होण्याची शक्यता आहे.
पण आपला अहंकार पत्रकारिता बाजूला ठेवत नाही आणि मामला पुन्हा फिसकटतो. शिवाय अडाणीपणातून आलेला हा अहंकार असतो. साहित्यापेक्षा संगणक, राजकारण आणि सामान्यज्ञान, एवढी जुजबी पुंजी बाळगणाऱ्याला आज पत्रकार होता येतं. मला चांगल्या कथा-कादंबऱ्या लिहायच्या असल्याने मी पत्रकार झालो, असं म्हणणारा कोणी भेटला नाही मला. किंबहुना ‘साहित्यजगत’ असं वार्ताक्षेत्र मराठी वृत्तपत्रांत असतं का? ते साहित्यसंस्थांपुरतंच असतं. तरुण पिढी काय वाचते आहे, तिची वाङ्मयीन जाण किती, साहित्यिक वाद व तत्त्वचर्चा यांचं भान एम.ए. मराठीच्या वर्गाबाहेर कितीजणांना असतं. मराठी साहित्यविषयक नियतकालिकं कितीजणांपर्यंत पोहोचतात, ग्रंथालयांमध्ये पुस्तकांची देवाणघेवाण कशी चालते, असे किती तरी प्रश्न पत्रकारांना पडायला हवेत; मात्र तशी प्रचिती फार दुर्मिळ. एखाद्या पुस्तक प्रदर्शनात जायचं, संयोजकांशी बोलून आकडे घ्यायचे आणि ‘यंदा बच्चे कंपनीसाठी बालसाहित्याची रेलचेल’ अशी बातमी छापून टाकायची. झाला यांचा साहित्यिक संपर्क!  बरं, अशी बातमी देताना मनात कायम एक धाकधूक, की प्रदर्शनवाल्याने जाहिरात दिली आहे का? उद्या वृत्तपत्राच्या व्यवस्थापकाने विचारलं तर काय? प्रदर्शकसुद्धा आता तरबेज झाले आहेत. ते कित्येकदा आधी जाहिराती देतात व मग जाहिरात विभागाकडून बातम्या छापून आणतात. अशा बातम्या उरका पद्धतीच्या असतात. त्यात ना जीव असतो, ना रस. असा धंदा होऊन बसल्यावर पत्रकारांना तरी कशी गोडी वाटणार? दोन-चार पत्रकार असले पुस्तकविश्वात रमणारे, तरी अंत होतो तो जाहिरात दिली नाही तर प्रसिद्धी कशाला द्या, या मालकी युक्तिवादात. एका मालकाने पुस्तक प्रकाशनाच्या बातम्यांवरच बंदी घातली. त्याचा दावा असा, की पुस्तकांचं ‘लाँचिंग’ व्यापारासाठी असतं, मग कशाला बातमी द्या? जाहिरातीचा रेट लावा अशा बातम्यांना! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत पुस्तकांच्या व्यवसायाचीही राजधानी दडल्याचं त्याच्या अभिजात बुद्धीला माहीत नव्हतं. अन्य स्पर्धकांनी अशा घडामोडी फारच प्रेमाने टिपणं सुरू केल्यावर मालकपुत्र समजून चुकले व यथावकाश प्रकाशन समारंभ त्या पुस्तकात झळकू लागले. मालक आणि मालकासम वागणारे संपादक मराठी साहित्यविश्व भिकार मानतात. एक पानभर साहित्यिक मजकूर आठवड्याला तयार करण्याची जबाबदारी एक-दोघांवर सोपवली की ती दोघं एक मुलाखत, एक पुस्तकविषयक, एक पुस्तकेतर पण साहित्यिक, एक साहित्यिक वैचारिक, एक परीक्षणात्मक असे लेख छापून मोकळे होतात. शक्यतो पडीक, पढीक आणि पडेल लेखक कविमंडळींना गाठून त्यांच्याकडून मजकूर घ्यायचा व छापायचा, असा बिनडोक साहित्यविश्वाचा प्रवास ती दोघं वाचकांना प्रत्येक आठवड्याला घडवतात. एकदा एकाचा मला फोन आला. बहुधा त्याच पानासाठी. सध्या काय वाचताय, काय लेखन चाललं आहे, कोणतं पुस्तक आवडलं, वाचन कसं महत्त्वाचं असतं वगैरेच्या निमित्ताने. अशा पत्रकारांना बहुधा उलट उत्तर ऐकायची सवय नसते. सतत प्रसिद्धिलंपटांच्या सान्निध्यात राहिल्याचा हा परिणाम! त्यांना एक तर होकार अथवा वाहवा ऐकायची असते. एकदा मला त्यापैकी एकाचा फोन आला. मी त्या पत्रकाराला झिडकारलं. आपल्या वाचनाचा खासगी आनंद जाहीरपणे व्यक्त करणाऱ्यांचं खरं तर आश्चर्य वाटायला हवं. त्यांनी वाचलेली पुस्तकं कधी आपण वाचलेली असतात, तर कधी ती पाहू शकणारही नसू इतकी विचित्र, दुर्लभ असतात. वाचन हा माझ्या अध्यापकीय व्यवसायाचा फार मोठा पाया आहे. तो मी जाहीर करणं म्हणजे व्यावसायिक कुस्तीगिराच्या रोजच्या व्यायामाचं कौतुक करणं जणू! अशा पत्रकारांनी चांगल्या वाचकांचा शोध घेऊन, त्यांच्या संग्रहामधील वेगळ्या पुस्तकांची नोंद घेऊन, पुस्तकं जमविण्याचा प्रयत्न कसा केला जातो हे सांगून नीट काही लिहायला पाहिजे. फोनवरून पुस्तकांचं सदर चालवायचं म्हणजे ‘नासा’च्या तळावरून चंद्रयान चालवण्यासारखंच! आव मात्र शास्त्रज्ञासारखा. पुस्तकं अथवा वाचन यामध्ये व्यक्तिगत आवडनिवड फार असते. ज्या पत्रकाराकडे वाचनसंस्कृतीची वृद्धी व्हावी म्हणून काही कार्य सोपवलेलं असतं त्याची स्वत:ची आवडनिवड पक्की हवी. मराठी प्रकाशनविश्वात हरतऱ्हेचे लेखक व पुस्तकं उपलब्ध असतात; परंतु वृत्तपत्रीय परीक्षणविश्वात बाबा कदम, स्नेहलता दसनूरकर, व.बा. बोधे अशा दर्जाच्या साहित्यिकांची  दखल घेतली नाही. याचा अर्थ मराठी प्रसारमाध्यमांची चोखंदळवृत्ती शाबूत आहे. निवडीचं काम तिने आधीच इतकं हलकं करून टाकलं आहे. उरलेल्या पुस्तकांत डझनभर प्रतिष्ठित प्रकाशनसंस्थांची उत्पादनं सामील असतात. फिरून त्यांच्याच पुस्तकांची परीक्षणं कोणत्या ना कोणत्या माध्यमांत छापली जात असतात. वृत्तपत्रांच्या कचेऱ्यांत आपणहून पाठवणाऱ्या प्रकाशनसंस्थांच्या पुस्तकांना सुलभपणे परीक्षण प्राप्त होत असतं. किती समीक्षक दुकानात जाऊन, चाळून, निवडून पुस्तकांची परीक्षणं करतात? प्रकाशक धाडत आहेत म्हणजे परीक्षणं करणं कर्तव्यच आहे, असा केविलवाणा समज वृत्तपत्रीय कर्मचारी करवून घेत असतात. बातम्यांसारखी शोधून, पारखून परीक्षणं का लिहिली जात नाहीत, कळत नाही. गोविंद तळवलकर यांना जसा कोणतीही पुस्तकं विकत आणून त्यांची परीक्षणं ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये करण्याचा हक्क होता (कंपनीच्या खर्चानं बरं का!) तसा आज मराठी वृत्तपत्रांत सरसकट कोणालाही नाही. किंबहुना अशा प्रकारच्या पुस्तक परीक्षणांना वावच नाही. ‘म.टा.’ने असंख्य चांगले वाचक घडवले ते त्यात छापून येणाऱ्या परीक्षणांमुळे, परिचयांमुळे. तळवलकर फार मितभाषी, एकलकोंडे व न हिंडणारे संपादक असूनही त्यांनी त्यांच्या व्यासंगानिमित्ताने ‘वाचलं पुस्तक की कर परीक्षण’ या खाक्याने वाचकांना परीक्षणांची सवय लावली. ‘म.टा.’ने दैनिकाच्या वाचनाबरोबर पुस्तकांच्या वाचनास मोठंच उत्तेजन दिलं. संपादक ‘वाचस्पती’ म्हटल्यावर हाताखालच्यांनाही लाज वाटते व ते वाचू लागतात. त्याप्रमाणे ‘म.टा.’मधून अनेकांनी पुस्तकांचा परिचय घडवला. सध्या ‘लोकसत्ते’चे संपादक गिरीश कुबरे हे तळवलकरांची पानं पुढे चाळतात आणि वाचकांना निवडक कसं वाचावं याचे आदर्श घालून ठेवतात. ते स्वत:ही अभ्यासू लेखक आहेत. म्हणजे संपादक अभ्यासक असला की आपसूक तो चांगला होतो व वाचकांनाही आपल्या समवेत नेत राहतो. 
‘सकाळ’च्या रविवार पुरवणीत तीन सदरं पुस्तकविषयक असतात (कदाचित उत्तम कांबळे यांच्या आग्रहामुळे). त्यात पुनरुक्ती आणि नीरसता अधिक असते. शिवाय समीक्षेपेक्षा परिचय, ओळख असा मैत्रीपूर्ण रोख असल्याने त्यात वाचनीयता कमी असते. कांबळे कसलेले लेखक-कवी होते, म्हणून त्यांना पुस्तकांचं विश्व आवश्यक होतं. सध्याचे संपादक श्रीराम पवार यांनी स्वतंत्र पुस्तक परीक्षणाचं साप्ताहिक सुरू केल्यास तो नवा उपक्रम होईल. पत्रकार-लेखक दिलीप पाडगावकर यांनी ‘टाइम्स’मधून बाहेर पडल्यावर ‘बिब्लिओ’ नामक अत्यंत छानसं पुस्तकविषयक मासिक सुरू केलं; पण त्याकडे बहुधा इंग्रजी सधन वाचकांनीच पाठ फिरवली आणि दोन-तीन वर्षांत ते थांबलं. पण तो त्यांचा एकट्याचा उपक्रम होता. ‘टाइम्स लिटररी सप्लिमेंट’ (टीएलएस) व ‘न्यूयॉर्क टाइम्स रिव्ह्यू आॅफ बुक्स’ या धर्तीवरचा दिलीपरावांचा हा उपक्रम असूनही तो काळाच्या मानाने फार लवकर झाला. शिवाय त्याला इंटरनेटची स्पर्धा सोसावी लागली. वृत्तपत्रं फार कमी जागा देतात म्हणून प्रकाशकांनी स्वत:ची परिचय, परीक्षणं, प्रचार करणारी मुखपत्रं सुरू केली आहेत. त्यांच्यापुढेही वाचक टिकवण्याची समस्या आहे. कारण समीक्षेची ओळखच मराठी वाचकांना नाही. परिचय, परीक्षण आणि धावता आढावा एवढ्यावरच पुस्तकांचं जग समाप्त केलं जातं. समीक्षा, टीका हा व्यवसाय म्हणून अजून समाजाला मान्य नाही. प्रकाशकांनाही नाही. समीक्षेची पुस्तकं ते पाठ्यक्रमासाठी काढतात. त्यामुळे वाचकांना उत्तम समीक्षा अंगवळणी पडल्याखेरीज वाचनसंस्कृतीचा परीघ वाढणार नाही. त्यासाठी प्रचंड खर्च करण्याची तयारी हवी. आचरट व विनोदी ‘इव्हेंट्स’वर खर्च करण्यापेक्षा पुस्तकं आणि वाचनसंस्कृती यावर वृत्तपत्रांनी खर्च करावा. आपापल्या आॅनलाइन आवृत्त्यांमध्ये चांगली समीक्षणं भरवून वाचकांना वाचायची सवय लावली तरी खूप होईल.
आणखी एक उपक्रम मराठी पत्रकारितेने करण्यासारखा आहे. हिंदी साप्ताहिकं तो करताना दिसतात. आता मासिक झालेल्या ‘आऊटलुक’ (हिंदी) पत्रिकेने ‘पाठक साहित्य सर्वे’चे दोन विशेषांक काढले. आॅक्टोबर (२००९) आणि जानेवारी (२०११) या दोन्ही अंकांत हिंदीतील बड्या लेखक-लेखिकांचं साहित्य, मुलाखती, आढावा, वाचकप्रियता याबद्दल लेख आहेत. ‘तहलका’ या हिंदी साप्ताहिकाने ३० जून२०१० चा विशेषांक ‘पठनपाठन’ असा काढून हिंदी वाचकांना उत्तम साहित्याचा एक छानसा धावता आढावा दिला. ‘शुक्रवार’ या साप्ताहिकाने २४ फेब्रु. ते १ मार्च २०१२ च्या अंकाची मुखपृष्ठकथा ‘हिंदी प्रकाशन की कडवी सच्चाइयाँ’ अशा शीर्षकाची देऊन वाचकांना थोडी उत्साहजनक व थोडी निराशाजनक माहिती दिली. महत्त्वाचं म्हणजे दिल्लीतील विसाव्या पुस्तक मेळ्याच्या ‘शुक्रवार’ने हा उपक्रम केला. किती मराठी साप्ताहिकांनी त्या ‘बुक फेअर’ची दखल घेतली? ‘लोकराज्य’ या सरकारी मासिकाने मात्र तमाम मराठी पत्रांच्या थोबाडीत मारली. त्याचा जून-जुलै (२०११)चा अंक चक्क ‘वाचन विशेषांक’ म्हणून बाहेर आला आणि तो फार चांगला चालला. १५४ पानांचा हा मौलिक व संग्राह्य अंक केवळ दहा रुपयांत महाराष्ट्र सरकारने उपलब्ध करून दिला. ‘लोकराज्य’ने तसा हा प्रयत्न पारंपरिक नजरेतूनच केला असला तरी त्याची दखल घेऊन कौतुक करायलाच हवं. मराठी पत्रकारितेत अलीकडच्या इतिहासात असं कोणाला सुचलं नव्हतं म्हणून! हिंदीत साहित्यिक पत्रकारिता चांगली तग धरून आहे. ‘कथादेश’ मासिकाने एप्रिल (२०११ )चा अंक ‘मीडिया वार्षिकी’ असा काढून आम्हा पत्रकारांना महत्त्वपूर्ण मजकूर सादर केला. ‘भारतीय ज्ञानपीठ’ या संस्थेचं ‘नया ज्ञानोदय’ नावाचं मासिक असून त्याचा ‘मीडिया विशेषांक’ जानेवारी (२०१०) मध्ये निघाला होता. हिंदीच्या अनेक नामवंत पत्रकारांनी त्यात लिखाण केलं आहे. ‘दिनकर’ या कवीची जन्मशताब्दी (२००८)मध्ये झाली. त्याची कव्हरस्टोरी ‘प्रथम प्रवक्ता’ या पाक्षिकाने आॅक्टोबरात केली होती. लेखक होते प्रभाष जोशी. तेही आता हयात नाहीत. जाता जाता हिंदी पत्रकारितेचा साहित्यधर्म कसा चिरेबंद आहे त्याची दोन उदाहरणं. ‘इंडिया न्यूज’ या   साप्ताहिकाने ४ सप्टेंबर २००९ चा अंक ‘साहित्य के खिलाडी’ असा काढून हिंदीतील लेखकांची गटबाजी, विचारधारा, अनुयायी वर्ग, गुरुपीठं यांची फार छान हजेरी घेतली होती. त्याचीच आवृत्ती ‘तहलका’मध्ये दिसली. त्याच्या ३१ आॅगस्ट २०११च्या  अंकाने ‘साहित्य के सामंत’ अशी कव्हरस्टोरी छापून डॉ.नामवरसिंह, अशोक वाजपेयी, राजेंद्र यादव, रवींद्र कालिया आदींचं कार्य आणि त्यांची सत्ताकेंद्रं यांच्यावर उत्तम नेम धरला होता. या लोकांच्या जवळिकीनेच हिंदी नवलेखकांना मानमरातब मिळतो, असा लेखाचा रोख होता. वाचकांचं इतकं छान उद्बोधन हिंदी पत्रकारिता करीत असताना मराठी पत्रकारिता अजून कशी साहित्याच्या आरत्या ओवाळण्यात, लेखकांची चापलुसी करण्यात अथवा उपेक्षा करण्यातच रमली आहे याचं दु:ख होतं- लाजही वाटते. हिंदी पत्रकारितेला तिच्या धाडसाबद्दल दाद दिली जाते. मात्र, नुसतं धाडस यामागे नसतं. स्वत:चं ज्ञान, चिंतन, भूमिका, विचार यांची जोड तिला लाभली आहे. बव्हंश मराठी पत्रकार या विषयात नापास झालेला आहे. मग उगाच वाचकांच्या ज्ञानाचा उहापोह कशाला करायचा? आडातच नाही तर पोहºयात कुठून येणार पाणी?
- जयदेव डोळे
13, सन्मित्र कॉलनी, औरंगाबाद - 431001
मोबाइल : 9422316988