'झी'च्या दोन संपादकांना अटक


नवी दिल्ली - कोळसा खाणपट्टे वाटपाच्या संदर्भात विरोधी बातम्या प्रक्षेपित न करण्यासाठी १00 कोटी रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावरून झी बिझनेस वृत्त वाहिनीचे संपादक समीर अहलुवालिया आणि झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांना मंगळवारी रात्री दिल्ली पोलिसांनी अटक केली. 'टीआरपी'च्या मागे झपाट्याने फोफावलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना अशा गुन्ह्यासाठी अटक होण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे.
काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल यांच्या जिंदाल स्टील अँण्ड पॉवर या कंपनीने दाखल केलेल्या फिर्यादीवर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. जिंदाल कंपनीने उलटे 'स्टिंग ऑपरेशन' करून विरोधातील बातम्या न देण्यासाठी हे संपादक जाहिरातींच्या पॅकेजच्या रूपाने १00 कोटींची मागणी करीत असतानाचे चित्रण केले होते. पुरावा म्हणून कंपनीने ही कॅसेट सादर केली होती. मात्र ही कॅसेट बनावट नसल्याचा अहवाल केंद्रीय गुन्हे वैद्यक प्रयोगशाळेने दिल्यानंतर या संपादकांना अटक केली.
दोघांना बुधवारी दुपारी दोन वाजता साकेत येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
झीविरुद्ध फिर्याद.. 
१ जिंदाल कंपनीने झी वृत्त वाहिन्यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे रीतसर फिर्याद दाखल केली असून, त्यात पुराव्यादाखल याच टेप सादर केल्या होत्या.
२जिंदाल कंपनीच्या फिर्यादीत झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी व झी बिझनेसचे प्रमुख समीर अहलुवालिया यांनी विरोधातील वृत्तमालिका थांबविण्यासाठी पैशांची सौदेबाजी केल्याचा आरोप जिंदाल कंपनीच्या फिर्यादीत केला गेला आहे.
----------------------------------------------------------------------------
झी समूहानेही आक्रमक पवित्रा घेऊन आमच्या बातम्यांनी घाबरून गेलेल्या जिंदाल यांनीच आम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न केला. आम्हीच जिंदाल कंपनीला सापळ्यात पकडण्यासाठी त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचे नाटक केले, असा प्रतिदावा केला आहे.
---------------------------------------------------------------------------
 प्राथमिक पुराव्यानुसार खंडणी व कट रचल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांची मंगळवारी चार तास कसून चौकशी केली. आमच्या प्रश्नांना दोघेही समाधानकारक उत्तरे न देऊ शकल्याने त्यांना रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अटक केली. तत्पूर्वी दोघांना अटकेची कल्पना देण्यात आली होती.
- एस.बी.एस. त्यागी, डीसीपी, क्राइम ब्रांच 
----------------------------------------------------------------------------------------------
आरोप झाल्यानंतर ब्रॉडकास्ट एडिटर्स असोसिएशनने दोघाही संपादकांना पदाधिकारी तसेच सदस्यपदावरून काढून टाकले होते.
साभार : दै.लोकमत