भले तरी देवू कासेची लंगोटी। नाठाळाच्या माथी हाणू काठी।

भले तरी देवू कासेची लंगोटी। नाठाळाच्या माथी हाणू काठी। असे संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे.सांप्रत बेरक्या कोणत्याही एका पत्रकाराच्या आणि वृत्तपत्र मालकाच्या विरोधात नाही. जे पत्रकार पत्रकारितेला कलंक लावण्याचा प्रयत्न करतील,कोणाला ब्लॅकमेल करीत असतील किंवा नको ते धंदे करीत असतील अशाच पत्रकारांच्या विरोधात बेरक्या आहे. मग तो पत्रकार कितीही मोठा असो, त्याची बेरक्या गय करीत नाही.मात्र जे पत्रकार प्रामाणिक आहेत, आणि त्यांच्यावर अन्याय होत असेल तर बेरक्या त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील.त्यांच्यामागे सामुहिक शक्ती लावण्याचा प्रयत्न करील.म्हणून पत्रकारांना विनंती आहे की, बेरक्याला आपण विनाकारण शत्रू समजू नये.
वृत्तपत्र मालकांच्या विरोधातही बेरक्या नाही.मालकांनी वृत्तपत्र काढले म्हणून पत्रकार जिवंत आहेत. मात्र मालकांनी पत्रकारांची पिळवणूक करणे,त्यांच्या पगारी बुडविणे, त्यांना वेठबिगारीसारखे राबविणे, अचानक कामावरून कमी करणे हे कितपत योग्य आहे. पत्रकारांच्या कष्टावर मालकांनी लाखो रूपये कमवायचे आणि पत्रकारांनी कष्टात दिवस काढायचे, हे न पटणारे आहे. अशा मालकांच्या विरोधात बेरक्या नक्कीच आपली लेखणीची धार चालवणार आहे.मात्र जे मालक चांगले काम करतील,त्याची दखल बेरक्या नक्कीच घेईल.सांगण्याचा मुद्दा असा की, बेरक्या 'सज्जनांचा सत्कार, दांभिकांचा धिक्कार'  करणारा आहे.