मराठी पत्रकारितेची मानसिकता सुधारणार कधी ?

मराठी पत्रकारितेची मानसिकता सुधारणार कधी असा सवाल आता माध्यमात उपस्थित होऊ लागला आहे. इतर भाषिक वर्तमानपत्रांची आक्रमणे मराठी भाषिक पत्रकारितेत होत असताना मराठीत मात्र पाय ओढण्याच्या स्पर्धेचा कळस झाला आहे. मराठी पत्रकारिता आता केवळ परंपरा सांगण्यासाठीच उरली आहे की काय, असे वाटू लागले आहे.
 अमुक पत्रकाराचे अमुक दैनिकात कसे वाईट चालले आहे, याचे चर्वण किती दिवस आता आमची पत्रकार मंडळी करणार आहेत, देव जाणो...अमुकचे कसे वाईट चालले आहे...अमुकला साहेबांनी कसे झापले...अमुकने कसा घोटाळा केला...अमुकची कशी जिरवली....असे अनेक विषय घेऊन आमचा मराठी पत्रकार चर्चा करण्यात अग्रेसर ठरू लागला आहे. परंतु मराठी किंवा इतर भाषेतील एखादे चांगले पुस्तक नुकतेच प्रसिध्द झाले आहे आणि ते आपण वाचले आहे, असे किती माई के लाल छातीठोकपणे सांगू शकतात, हे आता प्रत्येकाने स्वत:लाच विचारले पाहिजे. माझी भाषा सुधारली पाहिजे, माझ्या विचारांच्या कक्षा रूंदावल्या पाहिजेत, माझ्या लिखानाची शैली सुधारली पाहिजे, असे किती जणांना वाटते, याचाही विचार आता गांभीर्याने होने आवश्यक आहे...केवळ तोंडचाडगेपणा करून स्वत:ला पत्रकार म्हणवून घेणाऱ्यांची संख्याचा आता वाढू लागली आहे, आणि हेच नेमके मराठी पत्रकारितेच्या मुळावर उठले आहे. 
ज्या वर्तमानपत्रात काम करायचे त्याच वर्तमानपत्राच्या कार्यालयात बसून व्यवस्थापनाची बदनामी करायची आणि स्वत: सर्वज्ञानी असल्याच्या आव आणणाऱ्यांनी आपली‌ बौध्दिक क्षमता तपासून पाहणे आवश्यक आहे. माझ्याशिवाय वर्तमानपत्र चालत नाही, असा आव आणणाऱ्यांची संख्याही अलिकडे वाढू लागली आहे. चारओळी धडपणे लिहिता येत नसणाऱ्यांची वाचाळ बडबडही सुरू आहे. अशा परिस्थितीत मराठी पत्रकारितेला केवळ देवच वाचवू शकेल, असेच म्हणावे लागेल. कुणाचा खप किती आहे, कुणाच्या वर्तमानपत्रात भानगडी आहेत, अमुक कसा लफडेबाज आहे, याची चर्चा करण्यापेक्षा आता नव्याने येणाऱ्या पत्रकारांनी स्वत:ची मर्यादा ओळखली पाहिजे. ज्या वर्तमानपत्रात काम करीत आहोत, ते वर्तमानपत्र तरी कितीजण प्रामाणिकपणे वाचतात, याचाही शोध घेतला पाहिजे. मराठीत धड चार ओळी लिहिता येत नाहीत, असे तोंडचाडगे लोक जागा अडवून बसले आहेत. 
हुजरेगिरी करणे आणि बॅगा उचलण्याचे काम करीत तोंडाची वाफ दवडण्याचे काम करणाऱ्यांनी आता सावध झाले पाहिजे. काही काळ जरी त्यांना ढकलता आला तरी एक दिवस त्यांची अवस्था घर का ना घाट का अशी होणार आहे, यात शंका नाही. 
अमुक पत्रकार अमुक दैनिकातून अमुक दैनिकात जाणार, हा तर आमच्या तमाम बांधवांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. जसे काही आमची धनदौलत घेऊनच तो जात आहे, अशा अविर्भावात ही मंडळी बोलत असतात. एखाद्याला त्याच्या करीअरमध्ये मदत करणे, सहाय्य करणे, अशी सद्‌भावना निर्माण होण्याला आणखी किती काळ लागेल ठाऊक नाही, परंतु मराठी पत्रकारितेची मानसिकता बदलली नाही तर आज सुपात असणाऱ्यांनी त्यांचे जाते दूर नाही हे लक्षात ठेवायला हवे.
- लेखणीबहाद्दर