बगळे, कांडेकर हाजिर हो...

महाराष्ट्राचं इथानभवन. बालवाळीतल्या पोट्यासारखा नुस्ता कल्ला. कोण कोणाले काय बोलू राह्यलं हे कोणालेच कोणाचं ऐकू येत नव्हं. खानदेशातून आलेले नाथाभौ गुमान आपल्या बाकावर बसले व्हते. सगयाच्या मस्त गप्पा-टप्पा रंगात आल्या. एवळ्यात कोयसे पाटील आले. येता येताचं त्याह्यच्याकळं धाकल्या पवारसाहेबानं डोये वटारून पाहिलं. तेरे मस्त मस्त दो नैयनं म्हणत कोयसे पाटील काय समजायचे थे समजून गेले अन् आपल्या जाग्यावर जाऊन बसले. बसल्या बसल्याच त्यायनं एका नजरेत अख्खं इथानभवन पाहून घेतलं. त्यायची नजर गॅलरीत स्थिरावली. कोण-कोण पत्रकार तथिसा येऊन बसेल हैत हे थे निरखू लागले. त्यात पेंद्यापन ह्यताच. पेंद्याले त्यायच्याकळं पाहून स्मितहास्य करावं वाटलं; पण जाऊ द्या बाप्पा ! कायले आफत ओळून घ्यायची, बिनकामाचा हक्कभंग व्हायचा, असं मनातल्या मनात पुटपुटत पेंद्या तसाच बसून राह्यिला. एकदाचं काम सुरू झालं.

कोयसे पाटील : बगळे आणि कांडेकर आज तुम्हाला येथे का बोलावले हे माहिती आहेच. त्यावर तुम्हाला काय म्हणायचे?

कांडेकर : काहीच नाही साहेब.

बगये : नाही मला तुम्हचे हे म्हणणं अजिबात पटलं नाही. हा लोकशाहीवर घाला आहे. (जोर जोरात हातवारे करीत)

कोयसे पाटील : बगळे शांत व्हा ! हा तुमचा स्डुडिओ नाही. आमचे विधानभवन आहे. सगळा महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय.

बगये : म्हणून तर. मला माझं मत मांडण्याची संधी द्यायलाच हवी.

कोयसे पाटील : बगळे, आम्ही तुम्हाला मत मांडण्याची एक संधी देतो. स्डुडिओतल्यासारखी भांडण्याची नव्हे. थोडक्यात सांगा !

कोयसे पाटलानं असं म्हणताच. इकळ विरोधी बाकावर बसलेले आमच्या नागपुरातील कमळाबाईचे सडणवीस एकदमच उठले अन् व-हाडी ठस्सक्यात म्हणले : ‘‘साहेब ह्यो आम्हाले त्याच्या ‘ठाम मत'वर बोलावते. ऑफिसाच्या अंदर गेल्यावर चॉपण पाजते. मातर आम्ही बोलू लाग्ल्यावर मधातच ब्रेक घेते. आता याले बी ब्रेक द्या ! अन् सरय कारवाईच करा.
त्यायचे बोलणे ह्योत न ह्योते तेच अमरावतीचे सच्चू कळू बोल्ले : ‘‘अबे त आता त्याले सवाल कारा ना बे ! थो थ आपल्याले लैयच वाजवते सवालावर सवाल करून''. सच्चू कळूच्या ‘प्रहारा'वर सगयेच सदस्य पेटून उठले नि ‘‘बोला बगये बोला" एका सुरात म्हणले. एकच कल्ला झालेला पाहून बगये जरासे बावरले. त्यायन् त्यायच्या पुळ्ळं ठेवलेल्या पेल्यातला एक घोट पिल्ला (को-या पाण्याचा). फुल्ल पॅण्डीच्या खिशातून रुमाल काळला. त्यानं कापयावरचा घाम पुसला अन् हातवारे करून पुन्हा बोलायनले लाग्ले : ‘पत्रकारिता हे अत्यंत पवित्र काम आहे''

त्यायचं वाक्य अर्धच तोळून इदर्भातील यवतमायातचे एक ज्येष्ठ सदस्य कव्हा ना थे पहिल्यांदाच बोल्ले : ‘‘मग तुम्ही पवित्रा काऊन घेता बाप्पा ! पवित्र काम पवित्रच करा ना ! पण तुमचं कसं जननं कमी अन् कण्णण जास्त असंच ह्यय '' एवळ्यात धाकल्या पवार साहेबानं त्यायचा मनिला ओळून त्यायले खाली बसवलं अन् थकल्या आवाजात म्हणले : ‘‘गप्प रे ! उगाच टग्यासारख्या लघूशंका काढू नको गावंढळ भाषेत बोलून. नाहीत माझ्यासारखं व्हायचं''. त्या सदस्यानं त्याची चीभ चावून मनातल्या मनात म्हणला : ‘‘आपलीच मोरी अन् मुतायची चोरी''. इकळं ‘‘बोला वगळे बोलाचा'' कल्ला सुरू होताच. बगयेनं पुन्हा बोलयले सुरुवात केली : हा हक्कभंग मला मान्य नाही. ही प्रसारमाध्यमांची...
मध्ये लगेच मनसेनेचे कांदगाकवर यायनं नाक खुपसलं : ‘‘अरेरावी आहे ही. ती आम्ही कदापी खपवून घेणार नाही''.

बगये : अहो ! कुणी तरी मला बोलू देता का?

कोयसे पाटील : बोला बगळे बोला ! तुम्हाला बोलायची संधी दिलीच आहे आम्ही !

बगये : मी फक्त जनभावना व्यक्त केल्या.

हे ऐकून आतालोक मोठ्या पयत्नान चुपचाप बसलेले धाकले पवार साहेब इज तयपायी तसे तयपले : ‘‘ का रे! ही तुझी जनभावना अन् आम्हाला लाखो लोकांनी मत देऊन येथे पाठविलं ती कोणती भावना?

बगये : साहेब विषयांतर करू नका !

सच्चू कळू : कायचे इषयांतर बे ! आम्ही इषयावर हो. तुच कायही बोलू राह्यला. अन् मालून ठेव ह्यो तुहा शो नै! ह्यो महाराष्ट्राचा रियॅलिटी शो ह्यय".

लै टाईम झाला म्हणून आता अध्यक्ष कोयसे पाटील म्हणाले ‘‘शांत व्हा ! शांत व्हा ! आजचं काम इथंचं थांबू! मी आता माझा अर्धा निकाल देतो. कांडेकर यांनी त्यांचं योग्य मत मांडलं; पण बगळे त्यांचे मत योग्य पद्धतीनेने मांडू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना नागपूर येथील अधिवेशनाला अपस्थित राहण्याचे आदेश आम्ही देतो. शिवाय त्याच अधिवेशनात आम्ही त्यांना शिक्षा देऊ!''
*****
आजचा सवाल
आगामी निवडणुकीनंतर आता नागपुरातील अधिवेशनात सावजींचा रस्सा खाण्यासाठी यापैकी किती सदस्य असतील आणि वगळेंवरील हक्कभंग पारित होईल का?

होय - ५० टक्के
नाही - ५० टक्के
तथस्थ - 00 टक्के
( च्या मारी आता आम्ही काय समजावं? असा इचार करीत करीत पेंद्या रामटेकले फिरायले पण गेला.)

......................................................................................................................................


टीप : व-हाडी भाषेत 'ढ' आणि 'ड' चा उच्चा 'ळ' होतो तर 'ळ' चा उच्चा 'य' होतो.