अगदी
पाच मिनिटांपूर्वी धुळ्याहून निखिल सूर्यवंशी (सकाळ) यांचा एसएमएस आला.
फक्त चारच शब्द; ‘श्रावण मोडक पास्ड अवे’ मी हादरलोच. अतिशय दु:खद संदेश.
किती वाइट बातमी. त्यानंतर पुण्याहून दीपक मुणोतनेही ही बातमी कळविली. अगदी
चार दिवसांपूर्वीच माझी निखिलशी भेट झाली होती, तेव्हाही श्रावण हाच
चर्चेचा केंद्रबिंदू होता.
काही कामानिमित्त घाटकोपरला असताना
काल सायंकाळीच श्रावणला हृद्यविकाराचा झटका आला. आज सकाळी पुन्हा दुसरा
झटका आला. मधुमेहाचा त्रास असलेल्या श्रावणला सलग असे हे दोन झटके पचविता
आले नाहीत. त्याची किडनी निकामी झाली व त्याने या जगाचा निरोप घेतला.
मनस्वी
जगणारा असा हा अवलिया. मधुमेहाकडे केलेले दुर्लक्ष त्याचा घात करून गेले
असावे. माझी आणि श्रावणची शेवटची भेट साधारणत: चार वर्षांपूर्वी झाली
असावी. पुण्यात हडपसरला मगरपट्टा सिटीतील एका हॉटेलात आम्ही दुपारचे जेवण
एकत्र घेतले होते. त्यावेळी मी मुंबई ‘सामना’तून पुण्यात बदलीवर गेलो होतो.
श्रावणला भेटलो. कारण त्याने पुण़्यात ‘सामना’त किमान चार-पाच वर्षे तरी
काढली होती. तो गेल्यानंतर तिथे कुणी वृत्तसंपादक नव्हते. त्याला भेटलो,
त्याच्याशी बोललो. त्याने सरळ सांगितले, करिअर करायचे असेल तर येथे अडकू
नकोस. काहीही करून दाखवायला संधी नाही. दिवस ढकळायचे असतील, मजा करायची
असेल तर बघ; पण मी तुला पाहिलेय. नको थांबूस तिथे. त्याच दिवशी संध्याकाळी
मी ‘सामना’चे कार्यकाळी संपादक संजय राऊत यांना राजीनामा पाठवून दिला. ती
संध्याकाळ आम्ही टिळकरोडवर कुठल्याशा हॉटेलात साजरी केली होती. त्यानंतर मग
मी मुंबईत सानपाड्यात ‘लोकमत’ला जॉईन झालो.
श्रावणला
त्यानंतर दोनदा भेटण्याची संधी मिळाली; पण योग काही जुळला नाही. अगदी सहा
महिन्यांपूर्वीच चांदणी चौकात तो येणार होता; पण त्याला कोथरूडमध्येच
कुठेतरी उशीर होणार होता. त्याने मला सरळ हायवेवरून बस पकडून जाण़्यास
सांगितले. मीही घाईत असल्याने मुंबईला निघून गेलो.
श्रावणचा
माझ्या एकूणच पत्रकारितेवर फार प्रभाव आहे. अगदी उत्तम कांबळे
यांच्याइतकाच! अगदी स्टेÑट फॉरवर्ड, थेट बोलणारा, स्पष्ट बोलणारा तो एक
दिलखुलास माणूस होता. त्याचे फारच कमी लोकांशी जमायचे. साधारणत: 1993 मध्ये
मी नाशिकमध्ये ‘सकाळ’ला प्रशिक्षणार्थी असताना श्रावण धुळ्यात ‘सकाळ’
सांभाळायचा. कामापुरते फोनवरून बोलणे व्हायचे. तेव्हा स्पोर्टसमध्ये रुची
असल्याने सुनील पात्रुडकर (आता विनायक; मुंबईत ‘लोकमत’चे संपादक), शिवाजी
गायकवाड (दुर्दैवाने तोही आता या जगात नाही), दत्ता पाटील, विश्वास देवकर
वैगेरे यांच्या प्रोत्साहनामुळे प्रशिक्षणार्थी असतानाच मी स्पोर्टस पेज,
क्रीडा-विज्ञानाची ‘दिशा’ ही पुरवणी सांभाळायचो. मोहन वैद्य हे तेव्हाचे
वृत्तसंपादक. त्यांनी मला राष्ट्रीय खो-खो स्पर्धेच्या खास कव्हरेजसाठी
धुळ्यात पाठविले. धुळ्यातील गरुड मैदानावर ही स्पर्धा होती. त्याचवेळी माझी
श्रावण मोडक या माणसाशी अगदी जवळून, खासम-खास ओळख झाली.
पत्रकारितेत
सुदैवाने काही अपवाद वगळली तर मला नेहमीच अतिशय चांगली माणसे भेटली. त्यात
श्रावण हा एक आभाळाची उंची गाठणारा माणूस! त्याच्या जागी जर मी असतो आणि
एखादा ज्युनिअर स्पर्धा कव्हर करण्यासाठी हेडआॅफिसमधून लादला गेला असता तर
कदाचित मला त्याच्याएचढे चांगले नक्कीच वागता आले नसते; पण श्रावणने मला
मोठ्या भावासारखे सांभाळले. मला खो-खो मधले टेक्निकल काहीही माहिती
नव्हते. खो-खो संघटनेचे तेव्हाचे अध्यक्ष माधवराव पाटील धुळ्यातील.
श्रावणने मला आदल्या दिवशी त्यांच्याकडे नेले. त्यांच्याकडे तासभर बसून,
चर्चा करून मी मूलभूत सारे फंडे समजून घेतले. ‘सकाळ’ने या स्पर्धेचे फक्कड
कव्हरेज दिले होते. महाराष्ट्रभर सर्व आवृत्त्यात त्याला स्थान दिले गेले.
‘थर्ड रेट’च्या नियमाचा मुद्दा आम्ही लावून धरला आणि या स्पर्धेनंतर त्या
नियमात महत्त्वाचे बदल केले गेले.
दिवसभर स्पर्धा
कव्हर करून पानभर मजकूर दिल्यावर मी कार्यालयात पोहोचायचो. श्रावणचे काम
आटोपले की आम्ही प्रवीण फोटोजशेजारील नटराज की काहीशा हॉटेलात जेवायचो. आता
नेमके नाव आठवत नाही त्या हॉटेलचे. आताचे धुळ्याचे शिवसेना आमदार शरद
पाटील हे त्यावेळी ‘सकाळ’चे बातमीदार होते. श्रावण तेव्हा प्यायचा. मी
काही हे सारे शिकलो नव्हतो. त्याला पाप वैगेरे मानायचो. श्रावणने कधी मला
त्यासाठी आग्रह धरला नाही की फोर्स केला नाही. मी बिघडलो तो मुंबईत
‘सामना’मध्ये गेल्यानंतर आणि ‘प्रेस क्लब’ला चटावल्यानंतर! पुण्यात कधी मग
आता श्रावणला मी भेटलो की तो कोरडाच राहायचा. त्याने पिणे सोडले होते. मी
मात्र प्यायचो. श्रावणसोबत गप्पा मात्र मस्त रंगायच्या. जुन्या आठवणींना
उजाळा मिळायचा.
श्रावण कामात एकदम परफेक्ट.
शुद्धलेखनात कुणी त्याचा हात नाही धरू शकणार. स्टाईल भन्नाट. कांबळेंशी कधी
जमले नाही म्हणून की शत्रुत्व ओढवून घेतले म्हणून काय असेल ते असो; पण तो
नेहमी असा मुख्यालयाबाहेर राहिला. त्यामुळेच त्याची प्रतिभा, प्रगल्भ
पत्रकारिता खरया अर्थाने जगासमोर आलीच नाही. धुळे-नंदुरबारात मात्र तो
सर्वांना अजूनही ठावूक आहे. सुधीर देशपांडे, सतीश पाटील वैगेरे मंडळी
त्याला नेहमी सबुरीचा सल्ला द्यायचे. मात्र, त्याने कधी तडजोड केली नाही.
पदासाठी वरिष्ठांशीही नाही आणि तत्त्वांशी तर कधीच नाही. कांबळेंशी न
पटल्याने नंदुरबारमधून थेट मुंबईत पोहोचून अतुल जोशी ‘सामना’त सहसंपादक
झालेत, स्थिरावलेत. श्रावणच्या वाट्याला मात्र तशी स्थिरता फारशी आलीच
नाही. तो जात्याच चळवळ्या होत्या. मेधा पाटकरांच्या मणीबेली वैगेरे
आंदोलनाचे किस्से नेहमी सांगायचा. कधीतरी पाट्करांना नर्मदेच्या पुरातून
नौकेत वाचविलेही आहे बहुधा त्याने. तो पत्रकारिता जगला. ती त्याच्या
नसा-नसात भिनली होती. मात्र, ‘सकाळ’मधील वाइट अनुभवानंतर पुण्यात गेला
तेव्हापासून त्याच्या पत्रकारितेतील मस्ती हरविली होती. बहुधा
‘हेरॉल्ड’मध्येही त्याने काम केले. ‘सामना’त फारसे काही करायला न
मिळाल्याची त्याची खंत होती. अखेरच्या पर्वात तो इतर क्षेत्रात मोठे आणि
निर्दोष, परफेक्ट असे काम करीत होता तरीही तो पत्रकारितेच्या मुख्य
परिघाबाहेर राहिला, याची माझ्यासारख्या मित्राला नेहमीच खंत राहील.
आज
वृत्तपत्रात भाषेतील शुद्धता अभावानेच आढळते. नव्या पिढीला तर त्याच्याशी
काही देणे-घेणेही नाही. तरीही मी शुद्धलेखनाचा वेडेपणाचा आग्रह सहकारयांकडे
धरतो, हा श्रावणचा माझ्यावरील शुद्ध प्रभाव! श्रावण भाषांतरातही अव्वल
होता. नेमके आणि नेटकी कॉपी. मी भाषांतर शिकलो तेही त्याच्याकडूनच. देवकर,
किरण काळे, अभय सुपेकर आणि खुद्द मोहन वैद्यांचीही मदत झालीच. मात्र,
श्रावणशी माझी नाळ जुळली होती. 1996-97 मी पुण्यात शिकायला असताना, नंतर
1999-2001 लोकमत, वेबदुनियासाठी पुण्यात असताना नेहमी त्याची भेट व्हायची.
पुढे आमची भटकंती सुरू झाली अन भेटी दुर्मिळ होत गेल्या. मुंबईत असताना मी
पुण्यात गेलो की मग मात्र त्याला हमखास भेटायचो. शिवाजी पुण्यात ‘लोकमत’ला
असताना आम्ही नेहमी पर्वती, बालगंधर्व, चांदणी चौक, हडपसरची टेकडी असे
कुठेही भटकायचो, तासनतास गप्पा मारत बसायचो. अनेकदा विद्यापीठात ही मंडळी
यायची मग होस्टेलवर फड जमायचे.
श्रावणने माझे सासरे
जगतराव सोनवणे यांच्या कर्मचारी मार्गदर्शक आणि अधिकारी मार्गदर्शक या
1600 पानी पुस्तकांचे प्रूफरिडींग करून दिले. तेव्हा तो काही दिवस नाशिकला
होता. मी ‘गांवकरी’त होतो. माझी बायको दीपाली हीही तिथे टेÑनी होती. टू बी
आॅर नॉट टू बी अशा संभ्रमावस्थेत तेव्हाही श्रावणनेच मला सल्ला दिला होता,
लग्न कर. माझ्या आयुष्यातील दोन व्यक्तिगत मोठ्या समस्यांवर मी या
माणसामुळे मात करू शकलो होतो. पत्रकारितेच्या माझ्या प्रशिक्षण काळातच
श्रावणसह या सर्व मंडळींचा सहवास, मार्गदर्शन लाभल्याने आम्हालाही नोकरीवर
लाथ मारू पण तत्त्वांशी तडजोड नाही; अपमानाला थारा नाही असा बाणा जपता
आला.
श्रावणसारखा उमदा माणूस आता आपल्यात नाही, हे
अतिशय वेदनादायी सत्य पचवीने फारच अवघड आहे. माझ्या भावनांचा कल्लोळ झालाय.
त्याच्याही काही व्यक्तिगत समस्या होत्या; पण तत्वांशी तडजोड न करता
आपल्या मर्जीने, ‘किंगसाइज’ आयुष्य जगलेल्या श्रावणला माझा सलाम! मुंबईतील
हॉस्पिटलातून पुण़्याला पार्थिव आणून आज सायंकाळी श्रावणचे अत्यंसंस्कार
केले जातील. त्याच्या आत्म्याला शांती लाभो, हीच प्रभूचरणी प्रार्थना!
- विक्रांत पाटील
- विक्रांत पाटील