महाराष्ट्रात
‘दिव्य मराठी’च्या रुपाने ‘भास्कर’ने जोरदार फटका दिल्यामुळे कातावलेल्या,
चवताळलेल्या ‘लोकमत’ने तडकाफडकी मध्य प्रदेशात धडक देण्याची योजना बनविली.
मात्र या नकटीच्या लग्नात आता 1760 विघ्ने येते आहेत. छिंदवाडा येथून
‘लोकमत समाचार’ची पहिली आवृत्ती प्रकाशित करून ‘लोकमत’चे मध्य प्रदेशात
जोरदार लॉंचिंग करण्याची योजना दर्डा शेठजींनी आखली आहे. त्यांना तमाम
‘भास्कर’विरोधकांनी शक्ती पुरविली आहे. छिंदवाडा हा तुलनेने ‘भास्कर’चा
फारसा प्रभाव नसलेला भाग ‘लोकमत’ने मध्य प्रदेश लॉंचिंगसाठी निवडला.
छिंदवाडा आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाची सर्व तयारीही
झाली होती. 2 जुलै रोजी हा कार्यक्रम व्हावयाचा होता. त्यासाठी मुख्यमंत्री
शिवराजसिंग चौहान आणि विधानसभा अध्यक्ष ईश्वरदास रोहाणी हे मुख्य पाहूने
होते. दोघांनी आपली उपस्थितीही फायनल केली होती. मात्र, तोंडावर असलेल्या
निवडणुका व पॉलिटीकल रेव्हेन्यूची शक्यता पाहता कोणा एका पक्षाचा
सुरूवातीपासून शिक्का बसण्याऐवजी इतर पक्षाच्या दिग्गजांनाही प्रकाशनाच्या
उद्घाटन समारंभात बोलवावे, असा दर्डा सीनिअर्सचा आग्रह होता. छोटे बाबू
मंडळी मात्र आपला समझोता फक्त सत्ताधीशांशी हा युक्तिवाद पुढे करीत होती.
अखेर सीनिअर्सचा आग्रह मान्य करून मुख्यमंत्री व भाजपच्य बड्या
नेत्यांबरोबरच कॉंग्रेस महासचिव दिग्विजय सिंग आणि केंद्रीय मंत्री कमलनाथ
यांनाही प्रमुख पाहुने म्हणून बोलविण्याची योजना आखली गेली. स्वत: खासदार
बाबूजी अत्यंत सन्मानाने, आदरपूर्वक निमंत्रण घेऊन कॉंग्रेसनेत्यांच्या
दारी पोहोचले. मात्र, या मंडळींनी ‘लोकमत’कारांची चाल ओळखून भाजपच्या
नेत्यांसह व्यासपीठ शेअर करण्यास नकार दिला व दोन जुलैच्या कार्यक्रमात
येण्याबाबत अनंत अडचणींचा पाढा वाचला. अखेर बड्या बाबूजींनी पूर्वीच्या दोन
जुलैच्या उद्घाटन कार्यक्रमाचा बेत रद्द करीत कॉंग्रेसनेत्यांच्या सोयीची;
त्यांच्याच सल्ल्याने 12 जुलै ही नवी तारीख पक्की केली.
या बदलानंतर अखेर बडे बाबूजी पुन्हा भाजपच्या दारी
गेले. कारण त्यांना आता मुख्यमंत्री, अध्यक्षांची माफी मागून नवी तारीख
मिळवायची होती. या दोघांनी त्यापूर्वीच 2 तारखेला ‘ओके’ दिले होते. त्यांना
ही ‘ओके’ केलेली जुनी 2 तारीख बदलून 12 तारखेसाठी राजी करणे हे तसे कठीणच
काम होते. मात्र, बाबूजींनी अद्वितीय संवादकौशल्य व ‘वाकण्याच्या’
क्षमतेतून मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आणि विधानसभा अध्यक्ष ईश्वरदास
रोहाणी या दोघांनाही पटवून बदललेल्या 12 तारखेला प्रकाशन कार्यक्रमास
येण्यास राजी केले. त्यांची नवी तारीख मिळविली.
खरी खिचडी यानंतरच पकली. ‘भास्कर’वाल्यांनी मध्य
प्रदेशातील ‘माहिती-जनसंपर्क’वाल्यांना आतल्या गोटातील खबर पुरविली. दोन
तारीख बदलून 12 का केली, हा प्रश्न तसाही सर्वांनाच पडला होता. झाले!
‘माहिती-जनसंपर्क’वाल्यांनी चौहान आणि रोहाणी यांना तारीख बदलाचे ‘गुपित’
सांगितले. दिग्विजय सिंग आणि कमलनाथ या कॉंग्रेसींच्या सांगण्यावरून
पूर्वी ठरविलेली 2 तारीख बदलून 12 केली गेली व त्याबाबत आपणास अंधारात
ठेवले गेले, हे समजल्यावर मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान हे ‘लोकमत’कारांवर
भलतेच संतापले. त्यांनी ‘माहिती-जनसंपर्क’ खात्यामार्फतच बड्या व छोट्या
बाबूजींनाही निरोप पोहचविला, की चौहान आणि रोहाणी या दोघांनाही 12
तारखेच्या प्रकाशन कार्यक्रमास उपस्थित राहता येणार नाही. त्यासाठी
विधीमंडळ अधिवेशनाच्या तयारीमुळे व्यग्रतेचा हवाला दिला गेला. मुख्यमंत्री
शिवराजसिंग चौहान यांचे हे ‘खेदपत्र’ (खरे तर नकार!) म्हणजे
‘लोकमत’कारांसाठी ‘लेटर-बॉम्ब’च ठरले.
सत्ताधारयांच्या प्रकाशन कार्यक्रमावरील
बहिष्कारानंतर, वैतागलेल्या लोकमत प्रशासनाने आता असा मध्यममार्गी तोडगा
काढलाय की, छिंदवाडा येथून ‘लोकमत समाचार’चा मध्यप्रदेशातील पहिला आवृत्ती
प्रकाशन कार्यक्रम अर्थात ‘लोकमत’चे मध्य प्रदेश लॉंचिंग 12 जुलै रोजी
सकाळी होईल. त्यासाठी राज्यातील सर्व कॉंग्रेस नेत्यांना बोलाविले जाईल.
याच दिवशी रात्री प्रीतीभोजन कार्यक्रमाचा बेत आखण्यात आलाय. या शाही
भोजनासाठी मात्र मुख्यमत्र्यांसह राज्यातील सर्व भाजप व कॉंग्रेसेतर
नेत्यांना आमंत्रित केले जाईल. अर्थात हे सारे काही लोकमत प्रशासनाच्या
पातळीवर ठरलेय. त्यात सारे बाबूजी कितपत यशस्वी होतात, याबाबत शंकाच आहे.
‘लोकमत’ हा कॉंग्रेसी दर्डा परिवाराचा पेपर आहे आणि मध्यप्रदेशात कट्टर
कॉंग्रेसविरोधी भाजपचे सरकार आहे.
‘लोकमत’वाल्यांना कॉंग्रेसी, मॅडम यांना दुखावून
चालणार नाही आणि दुसरीकडे मध्यप्रदेशात पेपर चालवायचा, ‘भास्कर’ला धक्का
द्यायचा तर सत्ताधारी भाजपला सोबत घ्यावेच लागेल. ‘इकडे आड आणि तिकडे
विहीर’ अशी ‘लोकमत’कारांची अवघड अवस्था झालीय. ‘सहन होत नाही आणि सांगताही
येत नाही’ या स्थितीत बाबूजी सापडले आहेत. एकीकडे ‘दिव्य मराठी’चा आता थेट
‘लोकमत’चा गड असलेल्या विदर्भात धडाका सुरू होतोय तर दुसरीकडे
‘लोकमत’वाल्यांच्या ‘काऊंटर अॅटॅक’ची योजना म्हणजे फुसका बार ठरू पाहत
आहे. ज्युनिअर बाबूजींनी ‘शत्रूला शत्रूच्या प्रदेशातच घुसून नामोहरम
करायचे’ हा पुस्तकी पाठ तर सातत्याने मांडला; पण आता त्याच्या अंमलबजावणीत
अनंत अडचणी उभ्या राहिल्या आहेत. ‘लोकमत’चे मध्य प्रदेश लॉंचिंग म्हणजे
‘भीक नको; पण कुत्रा आवर’ असे म्हणण्याची वेळ आलीय.
तसाही सध्या नागपूरहून लोकमत समाचार मध्यप्रदेशात
सकर््युलेट होतोच. छिंदवाडा हे शहर नागपूरला जवळचे म्हणून प्रशासकीय
सोयीच्या दृष्टीने तिथून पहिली आवृत्ती काढून त्यापाठोपाठ भोपाळ, इंदूर,
जबलपूर अशा विस्ताराची योजना आहे. भोपाळमध्ये तर बिल्डींग बनून तयार आहे.
तेच मध्यप्रदेश ‘लोकमत’चे मुख्यालय राहील. तशी ‘लोकमत समाचार’ची
महाराष्ट्रातही विस्ताराची योजना आहे. मुंबई, नाशिक आवृत्त्या सशक्त करने
रडारवर आहे. सध्या ‘लोकमत समाचार’च्या नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर,
अकोला, पुणे व जळगाव अशा सहा आवृत्त्या आहेत. ‘लोकमत टाईम्स’च्या औरंगाबाद व
नागपूर अशा दोन तर ‘लोकमत’च्या महाराष्ट्र-गोव्यात 11 आवृत्त्या आणि एकूण
46 उप-आवृत्त्या आहेत.