मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाची जय्यत तयारी

मराठी पत्रकार परिषदेचे ३९ वे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या २४ आणि २५ ऑगस्ट औरंगाबादेत होत आहे. सिडको भागातील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज नाट्यगृहात  होणा-या या अधिवेशाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची मातृसंस्था आहे.पत्रकारितेची वैभवशाली परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपद पां.वा.गाडगीळ,आचार्य प्र.के.अत्रे,ह.रा.महाजनी,ज.श्री.टिळक,बाळासाहेब भारदे,अनंतराव भालेराव यांच्यासारख्या थोर पत्रकारांनी भूषविले आहे.
औरंगाबादेत दोन दिवस होणा-या या अधिवेशात दिनांक २४ ऑगस्ट रोजी  पत्रकार संरक्षण कायद्याची गरज आहे का आणि  ग्रामीण पत्रकारांच्या समस्या आणि आणि उपाय या विषयावर तर दि.२५ ऑगस्ट रोजी  संपादक नावाची प्रभावशाली संस्था निस्तेज होत आहे का ? आणि  प्रसारमाध्यमे बेजबाबदार होत आहेत काय ? या विषयावर परिसंवाद रंगणार आहे.
या अधिवेशाची अत्यंत आकर्षक निमंत्रण पत्रिका सर्व पत्रकारांना पाठविण्यात आली आहे.ज्यांना मिळाली नसेल त्यांनी हीच निमंत्रण पत्रिका समजून अधिवेशनास येण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषद आणि औंरगाबाद जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.