पालिकेतील पत्रकारांचे हाल

मुंबई महानगर पालिकेचे वृत्तसंकलन करण्यासाठी विविध भाषिक वृत्तपत्र आणि वृत्त वाहिन्यांच्या प्रतिनिधींची नेमणूक केली जाते. या पत्रकारांनी वृत्तसंकलन केलेल्या बातम्यांना प्रसिद्धी मिळावी म्हणून पालिकेने पत्रकारांना बसण्याची सोय म्हणून पत्रकार कक्ष उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये संगणक, दूरध्वनी, फ्याक्स इत्यादी यंत्र पालिकेने देवून सर्व सोयी सुविधा देल्याचे नाटक केले असले तरी पत्रकार कक्षातील बहुतेक सगळ्या सोयी सुविधा बंद असल्याने पत्रकारांचे हाल होत आहेत. 

पत्रकार कक्षामध्ये लोकप्रतिनीधीनी दोन संगणक दिले आहेत. यामधील जुना संगणक कित्तेक वर्षे बंद आहे. नवीन संगणक एक वर्षा पूर्वी बंद पडला आहे. हा संगणक दुरुस्त करण्यासाठी कीत्तेक वेळा जनसंपर्क विभगाचे अधिकारी, कर्मचारी व संगणक दुरुस्तीसाठी विविध कर्मचाऱ्यांना घेवून येत असतात परंतु गेल्या एक वर्षात हा संगणक सुरु झालेला नाही. पत्रकारांना हे संगणक सुरु असताना बातम्या ईमेल करणे सोपे जात होते. परंतु संगणकच सुरु नसल्याने पत्रकारांना पालिकेमध्ये असताना ईमेल पाहणे, करणे या सुविधा बंद झाल्या आहेत. 

पत्रकार कक्षामध्ये दोन फ्याक्स मशीन आहेत. या फ्याक्स मशीन मधील जुनी मशीन बंद आहे. यामुळे दुसर्या एका मशीन वरच सर्व पत्रकारांना बातम्या फ्याक्स कराव्या लागत आहेत. याच मशीन वर संध्याकाळी बातम्या पाठवायची पत्रकारांची घाई असताना पालिकेकडून वृत्तपत्रांना मिळालेल्या जाहिराती फ्याक्स करण्यासाठी जाहिरात प्रतिनिधी सुद्धा येत असल्याने पत्रकार व जाहिरात प्रतिनिधी यांच्यामध्ये बहुतेक वेळेला खटके उडत असतात. पत्रकार कक्षातील एकमेव फ्याक्स मशीन सुरु असल्याने पत्रकारांना या मशिनच्या भरवश्यावर पत्रकारिता करावी लागत आहे. हि मशीन सुद्धा बंद पडल्यास पत्रकारांचे काय होणार असा प्रश्न सध्या पत्रकारांना पडला आहे. 

पालिकेच्या जुन्या इमारतीचे नुतनीकरणाचे काम चालू आहे, यामुळे पत्रकार कक्षामधील वातानुकूलन यंत्र गेले दोन दिवस बंद आहे. वातानुकुलीत पत्रकार कक्ष असल्याने बंदिस्त असलेल्या पत्रकार कक्षात सध्या वातानुकूलन सेवा बंद असल्याने पत्रकारांना प्रचंड अश्या उकाड्याचा व गुदमरण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पत्रकार कक्षामधील खिडक्या उघडल्या तरी जितके हाते तेवढे पंखे सुद्धा पत्रकार कक्षामध्ये नसल्याने गेले दोन ते तीन दिवस पत्रकार गुदमरत आपल्या बातम्या लिहून प्रसिद्धीसाठी वृत्तपत्रांकडे पाठवत आहेत. दूरध्वनी सुद्धा त्याच्या मर्जी नुसार चालू तर कधी बंद अवस्तेत असतो. या दूरध्वनीचा फायदा पालिकेमधील नोंदणीकृत पत्रकारांपेक्षा इतर भुरटे व बोगस पत्रकार मोठ्या प्रमाणात घेत असतात. 

पत्रकार कक्षामध्ये पत्रकारांचे एकीकडे हाल होत असताना पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केलेल्या पालिका वार्ताहर संघाचे पदाधिकारी गप्प का बसत आहेत असा प्रश्न पत्रकारांकडून उपस्थित केला जात आहे. एकीकडे वार्ताहर संघाचे पादाधिकारी गप्प बसून पत्रकांचे कशे हाल होत आहेत याचा तमाशा बघत असताना जनसंपर्क अधिकाऱ्यांचे सुद्धा पत्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याने पत्रकारांमध्ये सध्या तीव्र असंतोष पसरू लागला आहे. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा स्वताचे प्रश्न सोडवून घेणारे पदाधिकारी आणि जनसंपर्क अधिकारी यांच्या मधील संगनमतामुळे पालिकेतील इतर पत्रकारांचे मात्र हाल होत आहेत. 

जनसंपर्क अधिकाऱ्याच्या हाताचे बाहुले बनलेल्या पदाधीकार्यांमुळे पत्रकारांचे हाल होत असल्याची चर्चा सध्या पत्रकारांमध्ये रंगू लागली आहे. जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितल्या प्रमाणे सेटिंग करून बनलेले पदाधिकारी आणि कोणी जनसंपर्क विभागाविरोधात बातम्या प्रसिद्ध केल्यास त्या वृत्तपत्रांच्या जाहिराती बंद केल्या जातील अश्या दिल्या जाणाऱ्या धमक्या, जनसंपर्क अधिकाऱ्याच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या वृत्तपत्रांच्या जाहिराती बंद केल्या गेल्या आहेत. यामुळे इतर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, इतर लोकांना न्याय देण्यासाठी लिखाण करणारे पत्रकार आपल्यावर अन्याय होत असताना स्वताच्या समस्या आपल्या वृत्तपत्रातून मांडू शकत नाहीत इतकी दहशत सध्या पत्रकारांमध्ये निर्माण झाली आहे असे म्हणण्यास काहीही हरकत नाही. 

पत्रकार कक्षामधील पत्रकारांच्या सोयी सुविधा बंद असताना लवकरच पत्रकार कक्ष इतरत्र हलवला जाणार आहे. पत्रकार कक्ष इतर ठिकाणी हलवला जात असताना पालिकेमध्ये नोंद असलेल्या पत्रकारांची बसण्याची योग्य सोय, संगणक, फ्याक्स मशीन इत्यादी सुविधा मिळेल का याबाबत सध्या पत्रकारांना प्रश्न पडला आहे. गेल्या काही वर्षात पत्रकारांच्या एक एक करून सर्व सुविधा बंद पडत असताना जनसंपर्क अधिकाऱ्यांनी काहीही ठोस अशी कारवाही केली नसल्याने मुंबईचे महापौर सुनील प्रभू व पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्वतः जातीने लक्ष घालून पत्रकारांचे हाल थांबावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.