पत्रकारांनी 'जागल्या'ची भूमीका करावी - मुळी


लातूर : राष्ट्रीय ग्रामीण भागातील पत्रकारांची भूमीका मोलाची आहे. पत्रकारांनी ग्रामीण भागातील इतिहास व भुगोल माहिती करून घेतला पाहिजे. तसेच पत्रकारांनी नेहमीच 'जागल्या'ची भूमीका केली पाहिजे, असे मत माहिती व जनसंपर्क खात्याचे उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांनी केले.
केंद्र सरकारच्या मनुष्यबळ व प्रशिक्षण विभागामार्फत यशदा पुणे आणि लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने लातूरच्या राजीव गांधी चौकातील विश्रामगृहात २५ ते २७ सप्टेंबर या कालावधीत आयोजित 'ग्रामीण पत्रकारांसाठी प्रशिक्षण' कार्यशाळेच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मिटकरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथील माध्यमतज्ज्ञ डॉ.वि.ल.धारूरकर, यशदाचे अधिकारी डॉ.बबन जोगदंड, पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष अशोक चिंचोले, दत्ता थोरे, अरूण समुद्रे, व्यंकटेश कल्याणकर आदींची उपस्थिती होती. विकास प्रशासनातील बहुमाध्यमांची भूमीका या विषयात पीएच.डी. पदवी मिळविल्याबद्दल डॉ. बबन जोगदंड यांचा सत्कार पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला. बदलत्या काळातील पत्रकारीता आणि ग्रामीण भागातील पत्रकारासमोरील आव्हाने या विषयावरही राधाकृष्ण मुळी यांनी प्रकाशझोत टाकला.
साक्षरता वाढीचा खरा फायदा वृत्तपत्रांना झाल्याचे माध्यमतज्ज्ञ डॉ.वि.ल.धारूरकर यांनी सांगितले. खेड्यातील पत्रकार हा मातीशी नाते जोडणारा असतो. त्यास पद्धतशीरपणे लेखन करण्याचे शास्त्र शिकविणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशिक्षण ही संजीवनी असते, असेही ते म्हणाले. यावेळी दत्ता थोरे व अरूण समुद्रे यांचीही भाषणे झाली. अध्यक्षीय समारोप चंद्रकांत मिटकरी यांनी केला. प्रास्ताविक डॉ.जोगदंड यांनी केले. कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमीका अशोक चिंचोले यांनी मांडली. सूत्रसंचालन कोषाध्यक्ष पंकज जैस्वाल यांनी केले. सरचिटणीस विजय स्वामी यांनी आभार मानले. मान्यवरांचे स्वागत संघाचे उपाध्यक्ष अरविंद रेड्डी, राजकुमार पाटील, विनोद निला, शशिकांत पाटील, काकासाहेब घुटे आदींनी केले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील बहुतांश पत्रकारांनी सहभाग नोंदविला.