पत्रकार लहाडे मारहाणीचा विसर

अहमदनगर - सुमारे बारा वर्षांपूर्वी लोकसत्ताचे वार्ताहर मोहनीराज लहाडे यांना शिवसेनेचे आमदार अनिल राठोड व त्यांच्या समर्थकांनी जबर मारहाण केली होती. बातमी छापल्याच्या रागातून त्यांना ऑफिसमधून उचलून नेऊन मारहाण केली होती. आता या खटल्याची सुनावणी सुरू झाली असून त्यातील एक साक्षीदार होस्टाईल झाला आहे. मात्र, पत्रकार संघटना आणि लोकसत्ता यांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. मधल्या काळात या प्रकरणाचा अनेक विरोधी पक्षांनी राजकारणासाठी वापर केला. आता त्यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने लहाडे एकाकी पडले आहेत. 
लहाडे यांनी त्यावेळी लोकसत्तामध्ये शिवसेनेच्या विरोधात बातमी छापली होती. त्याचा राग धरून राठोड व त्यांच्या कार्यकर्त्यांनी लहाडे यांना जबर मारहाण केली होती. त्यावर ते कित्येक महिने रुग्णालयात पडून होते. त्यावेळी लोकसत्ताने त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका घेतली. पत्रकार संघटनाही त्यांच्यामागे उभ्या राहिल्या. त्यामध्ये आमदारांसह अन्य आरोपींना अटक झाली. राठोड यांना जामिनासाठी अधिस्वीकृतीधारक पत्रकार असावा, अशी अट पोलिसांनी घातली होती. सर्वच पत्रकार विरोधात गेल्याने कोणी जामीन मिळणार नाही, अशी कल्पना होती. मात्र, एका पत्रकाराने जामीन राहण्याची तयारी दर्शविली आणि आमदार राठोड यांची सुटका झाली. पुढे दीर्घकाळ हा खटला प्रलंबित राहिला. लोकसत्तासह काही दैनिकांनी राठोड यांच्या बातम्यांवर बहिष्कार टाकला. मात्र तोही काही दिवसच टिकला. नंतर लोकसत्तासह सर्वांनी तो मागे घेत बातम्या सुरू केला. पत्रकारांच्या कार्यक्रमांनाही आमदार राठोड उपस्थित राहू लागले. त्यांच्या हस्ते सत्कारही घेतले जाऊ लागले. पुढे राजकीय पक्षांनी निवडणुकांमध्ये या प्रकरणांना उजाळा देत जाहिराती छापल्या. त्याचे भांडवल करून आमदार राठोड यांना बदनाम करण्याचा आणि मते मिळविण्याचा प्रयत्न केला. इतके दिवस रखडलेल्या या खटल्याची सुनावणी आता सुरू झाली. यामध्ये बहुतांश साक्षीदार पत्रकारच आहेत. तेही त्यावेळी लोकसत्तामध्ये असलेले. मात्र, मधल्या काळात यातील लहाडे वगळता बहुतांश पत्रकारांनी लोकसत्ता सोडून इतर पेपर जॉईन केले आहेत. त्यामुळे ते आता काय साक्ष देणार याकडे लक्ष लागले आहे. या खटल्याची पहिली तारीख चालली. त्यामध्ये एक साक्षीदार होस्टाईल झाला. त्यामुळे या खटल्याचे भवितव्य लक्षात येते. अशावेळी लहाडे यांच्यामागे कोणीही नाही, त्यामुळे ते एकाकी पडल्याचे दिसून येते. याच्या बातम्याही आता कोणी छापत नाही. त्यामुळे काय चालले आहे हेही लोकांना कळत नाही. कोठे गेल्या पत्रकार संघटना, कोठे गेले ते राजकीय फायदा घेणारे विरोधक