अमरावतीच्या ‘आम्ही सारे’ फाउंडेशनचा ‘आम्ही सारे कार्यकर्ता’ पुरस्कार अमर हबीब यांना जाहीर

अमरावतीच्या ‘आम्ही सारे’ फाउंडेशनचा 2013 चा ‘आम्ही सारे कार्यकर्ता’ पुरस्कार अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते, लेखक व पत्रकार अमर हबीब यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनने एका पत्रकाद्वारे दिली आहे.एक लाख रूपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप  आहे.
अमर हबीब यांचे संघर्षवाहीनी, आणिबाणीविरोध, नामांतर आंदोलन, शेतकरी संघटनेतील योगदान व पत्रकारितेतील कार्य लक्षात घेऊन हा पुरस्कार जाहीर केला आहे.
जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेल्या संघर्षवाहीनीचे राष्ट्रीय संयोजक म्हणून अमर हबीब यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. आणिबाणीत 19 महिने ते तुरुंगात होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात त्यांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या होत्या. शेतकरी संघटनेतील त्यांचे योगदान संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे.
राज्यातील विविध वृत्तपत्रांतून सामाजिक व राजकीय विषयांवर त्यांनी स्तंभलेखन केले आहे. एक वक्ता म्हणून महाराष्ट्रभर त्यांची व्याख्याने होतात. त्यांनी 8 पुस्तके लिहीली असून नाते, कलमा, आकलन या पुस्तकांना वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. ‘परिसर’ प्रकाशनच्या माध्यमातून अनेक नव्या लेखकांना घडवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. ‘आम्ही सारे’ फाउंडेशनने त्यांच्या या सर्व कामाची दखल घेऊनच या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
 20 ऑक्टोबर रोजी अमरावती येथील संत ज्ञानेश्र्वर सांस्कृतिक भवनात हा पुरस्कार अमर हबीब यांना प्रदान केला जाणार आहे. दुपारी 4.00 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्रसिंह राणा, विधानसभा सदस्य बच्चू कडू, सुप्रसिद्ध लेखक व शेतकरी आंदोलक चंद्रकांत वानखेडे व विभागीय आयुक्त डी.आर.बनसोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही सारे फाउंडेशनने केले आहे.