सच्चा कार्यकर्त्याचा सत्कार

अमर हबीब आणि माझ्या मैत्रीबद्दल नव्यानं काही लिहावं असं इथं प्रयोजन नाही. मात्र अमरला नुकत्याच प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराच्या निमित्तानं काही गोष्टी आठवल्या. आजपर्यंत अनेकांनी अमरला त्यांच्या संस्थेच्या पुरस्काराबद्दल विचारलेलं आहे. अनेकदा मी साक्षीदार आहे. प्रत्येक वेळी त्याने पुरस्कार स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. माझ्यापेक्षा अनेकजण योग्य आहेत, असंच तो सांगायचा. ज्यांनी त्याच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला त्यांना अमरने सुनावले...‘तुम्ही कोण लागुन गेलात मला पुरस्कार देणारे? अनेकजण पुरस्काराच्या प्रतिक्षेत आहेत, त्यांना द्या.’  अमर एक सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार म्हणून समाजात वावरत असल्याने, गल्लीबोळात दिल्या जाणा-या व राज्यव्यापी म्हणवल्या जाणा-या पुरस्कारांचं स्वरूप त्याला माहित आहे. असे पुरस्कार देणा-यांची भूमिकाही तो जाणून आहे. त्यामुळेच आजपर्यंत त्याने कुठलाही पुरस्कार स्वीकारला नव्हता. पुरस्काराबाबत त्याची पाटी कोरी होती. याचा त्याला अभिमानही वाटायचा.
अमरावतीच्या ‘आम्ही सारे फाउंडेशन’  ने त्यांच्या ‘आम्ही सारे कार्यकर्ता’  या पुरस्कारासाठी अमरची निवड करण्याचा निर्णय केला तेव्हा त्याने हा पुरस्कार स्वीकारण्याला संमती दिली. त्याचे कारण हा पुरस्कार कुठल्या भ्रष्ट पुढा-यातर्फे अथवा कथित सामाजिक संघटनेतर्फे दिला जाणारा पुरस्कार नाही. सरकारी खिरापतीतून वाटला जाणाराही हा पुरस्कार नव्हता. या पुरस्काराचे मोल खूप अधिक आहे.त्यासाठी या पुरस्काराची जन्मकथाही जाणून घेणे आवश्यक आहे. संघर्ष वाहिनी, शेतकरी संघटनेचे आघाडीचे कार्यकर्ते व सुप्रसिद्ध लेखक चंद्रकांत वानखडे यांचा उल्लेख त्यांचे मित्र ‘फाटका कार्यकर्ता’  असा करतात. विदर्भाच्या ११ जिल्ह्यातील वानखडे यांच्या मित्रांनी, कार्यकत्र्यांनी त्यांच्यासाठी ११ लाख रुपयांचा निधी संकलित करुन त्यांचा भव्य असा सत्कार केला. या सत्कारात वानखडे यांना ११ लाखाची थैली अर्पण करण्यात आली. आपल्या या फाटक्या मित्राला आर्थिक मदत व्हावी हा या मागचा त्यांचा प्रामाणिक हेतू होता. मात्र या फाटक्या कार्यकत्र्याने या ११ लाखातून स्वतःसाठी एक पैसाही घेतला नाही. हा सर्व निधी त्यांनी ‘आम्ही सारे फाउंडेशन’  कडे सुपूर्द केला. या संघटनेची कल्पनाही वानखडे यांचीच. या फाउंडेशनमार्फत दरवर्षी एका सच्चा कार्यकत्र्याला एक लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१२ पासून या उपक्रमाची सुरूवात झाली. २०१२ चा पहिला पुरस्कार विदर्भातीलच शेतकरी संघटनेचे बिनीचे कार्यकर्ते विजय विल्हेकर यांना देण्यात आला. २०१३ च्या या दुस-या पुरस्कारासाठी अमर हबीब यांची निवड करण्यात आली. या पुरस्कारा मागची भावना व त्याचे मोल लक्षात घेऊनच अमरने तो स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्याच्या खात्यावर जमा झालेला हा पहिला पुरस्कार कोणालाही अभिमान वाटावा असाच आहे.

२० ऑक्टोबरला अमरावतीतील ज्ञानेश्वर सभागृहातील या भव्य पुरस्कार सोहळ्याला मीही साक्षीदार होतो. अमरच कर्तृत्व त्याचे सगळे मित्र जाणून असल्यामुळे त्याच्या सत्कारासाठी तोलामोलाचेच पाहुणे निवडण्यात आले होते. राजस्थानचे जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे, मॅगासेसे पुरस्कार विजेते राजेंद्रसिंह राणा, सामाजिक जाण असलेले व निःस्पृह अधिकारी अशी ओळख असलेले अमरावतीचे आयुक्त श्रीयुत डी.आर. बनसोड, अमरचे स्नेही चंद्रकांत वानखडे, आ.बच्चु कडू, हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. चाहत्यांनी तुडूंब भरलेल्या सभागृहात अमर हबीब व आशा वाघमारे यांचा डोळ्याचे पारणे फेडणारा हृदयस्पर्शी असा सत्कार समारंभ पार पडला. या सत्काराच्या वेळी संपूर्ण सभागृहातील अमरच्या चाहत्यांनी उभे राहून त्याच्याविषयीचा आपला आदरभाव व्यक्त केला. या वेळी अमरला एक लाख  रुपयांचा चेकही देण्यात आला.
प्रारंभी अमर हबीब यांच्या जीवनावरील एक डाक्युमेंटरी उपस्थितांना दाखविण्यात आली. यात लातूरचे पत्रकार दिपरत्न निलंगेकर व महारूद्र मंगनाळे यांचा महत्वाचा सहभाग असल्याचे संयोजकानी आवर्जून सांगितले. यावेळी बोलतांना आयुक्त डी.आर.बनसोड यांनी अंबाजोगाईतील आपल्या पहिल्या नियुक्तीच्या वेळच्या आठवणी सांगून अमर सारख्या प्रामाणिक कार्यकत्र्याच्या सत्कार समारंभात सहभागी होता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. चंद्रकांत वानखडे यांनी संघर्ष वाहिनीच्या काळातील आठवणी जिवंत करुन अमरचे कार्यकर्तेपण विशद केले. आ.बच्चु कडू यांनी अमरला मिळालेल्या या पुरस्कारामुळे पुरस्काराचे मोल वाढल्याचे सांगितले. पाणीवाले बाबा म्हणून ओळखल्या जाणा-या राजेंद्रसिंह राणा यांनी आपल्या हस्ते अमर हबीब यांचा सत्कार होतोय ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले. संघर्ष वाहिनीत अमर नेता होता तेव्हा आपण कार्यकर्ते होतो हेही त्यांनी आवर्जून सांगितले.

सत्काराला उत्तर देताना अमर हबीब म्हणाले, ‘मी आणि आशा वाघमारे यांनी प्रेमविवाह केला. मी मुस्लिम घरात जन्मलो. ती ख्रिश्चन. दोघांनीही धर्म बदलला नाही. प्रेम कोणातही होऊ शकते. ती एक भावना आहे. आज जर दोन भिन्न धर्मियांना लग्न करायचे असेल तर धार्मिक पद्धतीने तत्काळ करता येते. मात्र दोघापैकी एकाला आपला धर्म बदलावा लागतो. धर्म बदलला की, मंदीरात, मस्जिदमध्ये किंवा चर्चमध्ये लग्न करता येते. पण स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टमध्ये लग्न करताना दोघापैकी कोणालाही धर्म बदलण्याची गरज नाही. मात्र या लग्नासाठी एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. हा एक महिना घरच्या मंडळींना दबाव आणण्यासाठी, लग्न मोडण्यासाठी सोयीचा ठरतो. त्यामुळे एक महिन्याची नोटीस देण्याची पद्धत चुकीची आहे. ती रद्द व्हायला हवी.’
भारतातील शिक्षणाच्या धार्मिकतेवर प्रकाश टाकताना अमर म्हणाला, ‘मला पहिली मुलगी झाली तिचे नाव तरंग. मी तिला बालवाडीत टाकायचे ठरवले. तिची आई आशाची भाषा मराठी. आम्ही दिल्लीकडचे असल्याने आमच्या घरात उर्दू बोलली जात असे. माझी मातृभाषा ही उर्दूच. पण मी ठरवले, घरात आईचीच भाषा चालली पाहिजे. आम्ही घरात मुद्दाम मराठीत बोलायचो. यामुळे मुलगी तरंग आणि मुलगा सारंग यांना मराठी शाळेत घालायचे ठरवले. एका ख्यातनाम शाळेत गेलो. समोरच सरस्वतीदेवीचा पुतळा होता. मला मुख्याध्यापक म्हणाले, आम्ही रोज सरस्वतीची प्रार्थना घेतो. मी ही शाळा नाकारली. दुस-या शाळेत गेलो. तिथे तर तीन हिंदू देवदेवतांच्या प्रार्थना घेतल्या जात होत्या. शेवटी नाईलाजाने घराजवळच्या एका शाळेत त्यांना टाकले. माझी साडेचार वर्षाची तरंग एक दिवस शाळेतून आली आणि घडाघडा गायत्रीमंत्र म्हणू लागली. मी हबकून गेलो. आता माझ्या नातवाला शाळेत घालतानाही हाच प्रश्न निर्माण झाला. नातवाच्या आईची मातृभाषा उर्दू असल्याने नातवाला उर्दू शाळेत घालायचे ठरवले. तिथे तर इस्लाम व कलमाच शिकवल्या जातात. सरकारी अनुदानावर चालणा-या शाळांत आपला धर्म मुलांवर का लादला जातो? मला माझ्या मुलांना १४ वर्षांची होईपर्यंत धर्म शिकवायचा नव्हता. १४ वर्षानंतर त्यांना हवा तो धर्म स्वीकारावा किंवा धर्माशिवाय राहावे असे माझे मत होते. परंतु मला हे करता आले नाही. कारण माणूस म्हणून शिक्षण देणारी एकही शाळा या देशात नाही. आज ४० वर्षांनंतरही या परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही.’
समाजातील सर्वात दुर्बल घटक कोण? हे सांगताना अमर म्हणाला, ‘ज्यांना आपला मुलगा किंवा मुलगी आपल्यासारखे होऊ नयेत असे वाटते ते सगळ्यात दुबळे. डॉक्टरांना आपला मुलगा डॉक्टर व्हावा वाटतो. वकीलांना त्याचा मुलगा वकील व्हावा वाटतो. पुढारी तर आपल्या मुलांना पुढारीच बनवतात. त्यासाठी वाट्टेल तेवढा खर्च करतात. मात्र कुठल्याही शेतक-याला आपला मुलगा शेतीत यावा असे वाटत नाही. आपल्या मुलाला शिपायाची नोकरी लागली तरी त्यासाठी वाटेल ते करायची त्याची तयारी असते. दुस-या बाजुला कुठल्याही स्त्रीला आपल्याला मुलगी होऊ नये असे वाटते.आपण आयुष्यभर एक स्त्री म्हणून जे दुःख भोगलं तसं दुःख भोगणारं अपत्य जन्मू नये असं तिला वाटतं. याचाच अर्थ सध्या शेतकरी आणि स्त्री हे दोन घटक सर्वात अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी काम करण्याची खरी गरज आहे.’
आपल्या मुस्लिम असल्याबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन विशद करताना अमर म्हणाले,‘मला सगळे विचारतात की तू मुस्लिमांसाठी काय केलंस? का? हा प्रश्न लोक मला का विचारतात याचे मला आणखीही कोडे सुटले नाही. ही मंडळी चंद्रकांत वानखडेना विचारत नाहीत की तू मराठ्यांसाठी काय केलेस? शेखर सोनाळकरला विचारत नाहीत की तू सीकेपीसाठी काय केलेस? मग मलाच हा प्रश्न का विचारला जातो.’
आपण आज जे काही आहोत ते समाजामुळेच. समाजामुळेच आपण घडलो. अखेरपर्यंत आपल्याला कार्यकर्ता म्हणून राहणे आवडेल असे सांगून हा पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या सत्कार सोहळ्याला अमर हबीब यांचे संघर्ष वाहिनीतील सहकारी, शेतकरी संघटनेतील सहकारी कार्यकर्ते, विविध पत्रकार मित्र, राज्याच्या विविध भागातील त्यांचे चाहते उपस्थित होते. पुण्यनगरीचे संपादक अविनाश दुधे यांनी या कार्यक्रमासाठी पडद्याआड राहून मेहनत घेतली. ते व्यासपीठावर गेले नाहीत याचे अनेकांनी कौतूक केले.

महारूद्र मंगनाळे
मुक्तरंग प्रकाशन,लातूर
मो. ९४२२४६९३३९,९०९६१३९६६६