मैत्रीचा खळाळता प्रवाह

अमरावती येथील आम्ही सारे फाउंडेशनने यावर्षीचा ‘कार्यकर्ता पुरस्कार ’  अंबाजोगाई येथील पत्रकार, लेखक व सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांना घोषित केला आहे. एक लाख रूपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २० ऑक्टोबरला अमरावती येथे मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्रसिंह राणा, आ.बच्चू कडू, प्रसिद्ध लेखक चंद्रकांत वानखेडे व विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने हा लेख.


दै.लोकमनची माझी पत्रकारिता सुरू झाल्यानंतर अमर हबीब हे नाव सतत कानावर येऊ लागले. तसं यापुर्वीच प्रा. निशीकांत देशपांडे यांच्यासोबत अमरला मी अंबाजोगाईला जाऊन भेटलो होतो. त्याची प्रिंटींग प्रेस पाहून त्याच्याशी चर्चाही केली होती. परंतु आमची खरी ओळख झाली ती, अमर लातुरला दै.मराठवाडाचा संपादक झाल्यानंतर. अगदी दीड-दोन वर्र्षांचा नित्याचा सहवास घनिष्ठ मैत्रीत रूपांतरीत झाला. या काळातील किस्स्यांवरच एक वेगळा लेख होईल. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर मित्र बनतात. त्या-त्या कालावधीपुरते ते मित्र राहतात. पुढे आपण मित्र होतो एवढेच दोघांना कधीतरी आठवत राहाते. परिस्थितीच्या रेट्यापुढे मैत्री टिकत नाही. मात्र अमरच्या व माझ्या मैत्रीचे वैशिष्ट्य असे की, सलग पंचवीस वर्षांपासून या मैत्रीत कसलाच खंड पडलेला नाही. कसले मतभेद नाहीत की दुरावा. खळाळत्या प्रवाहाप्रमाणे ही मैत्री टिकून आहे.
मी ‘लोकमन’  मधून मुक्त झाल्यानंतर माझ्या स्वातंत्र्याची व्याप्ती अधिक वाढली. ९५-९६ च्या सुमारास किल्लारी भूकंप पुनर्वसनावर आधारीत डॉक्युमेंटेशनचे काम केले. सगळा मजूकर तयार झाला तेव्हा संपादनासाठी मला अमरचीच आठवण झाली. त्याने हे काम आनंदाने केले. याआधी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मी एम.एम.सी.जे.ची (मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अ‍ॅन्ड जरनॅलिझम) पदवी संपादन केली. या कामात अमरची मला खूप मदत झाली. शोधनिबंधासाठी चळवळीची पत्रकारिता हा विषय मी त्याच्याच सल्ल्याने निवडला. अधिकृतरित्या तो माझा गाईड नसला तरी ख-या अर्थाने तोच माझा मार्गदर्शक होता. शेतकरी संघटनेचे मुखपत्र ‘शेतकरी संघटक’  हा विषय मी अभ्यासासाठी निवडला. तेव्हा संघटकचे अंक आणण्यासाठी व संपादक सुरेशचंद्र म्हात्रे यांच्याशी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आंबेठाणला तो आला होता. माझा प्रबंध अधिकाधिक दर्जेदार व्हावा यासाठी त्याने केलेले प्रयत्न आजही माझ्या स्मरणात आहेत. १९९८ मध्ये मी सा.‘बातमी मागची बातमी’ ची सुरूवात केली. त्यावेळीही मी त्याच्याशी प्रदिर्घ चर्चा केली होेती. या साप्ताहिकात सुरुवातीपासून त्याचा सक्रीय सहभाग होता. तो आजपर्यंत कायम आहे. ‘बातमी’ त त्याने अनेक विषयांवर स्तंभलेखन केले. याच काळात प्रकाशन व्यवसायाची सुरुवात करण्याचे माझ्या मनात घोळत होते. ‘लोकमन’ मधील माझ्या निवडक अग्रलेखांचा संग्रह काढावा, अशी अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. परंतु अग्रलेखांची निवड करणे मला जमत नव्हते. शेवटी अमरच्या कानावर मी हे घातले.तेव्हा त्याने संपादनाची जबाबदारी स्वीकारली. अग्रलेखांची निवड करुन त्यामागचे नेमके प्रयोजनही त्याने लिहीले. प्राचार्य डोळे यांनी प्रस्तावना लिहीली. प्रा.शशिकांत डोंगरे या मित्राने समर्पक मुखपृष्ठ तयार केले आणि ‘माती आणि नाती’  हे माझं पहिलं पुस्तक माझ्याच ‘मुक्तरंग प्रकाशन’ तर्फे प्रकाशित झालं. या पुस्तकाचं संपादन एवढं प्रभावी ठरलं की,सर्व थरातून त्याचं स्वागत झालं. दोन महिन्यातच पहिली आवृत्ती संपली. नुकतीच या पुस्तकाची आठवी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. यात अमरचा मोठा वाटा आहे. अमरचे पहिले पुस्तक काढण्याची संधीही मलाच मिळाली. त्याने दुष्काळावर लिहीलेले लेख ‘दुष्काळदेशी’  या नावाने ‘मुक्तरंग’ ने प्रकाशित केले.
नवे प्रयोग करण्यात अमरचा नेहमीच पुढाकार असतो. मी, अमर हबीब, अच्यूत गंगणे, प्रा. विकास सुकाळे अशा चौघांनी मिळून १९९९ साली बारावीच्या विद्याथ्र्यांसाठी ‘लातूरचा कानमंत्र’  या नावाने पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाची आम्ही चांगली जाहीरातबाजी केली होती. त्यामुळे हे पुस्तक हीट ठरेल असा आमचा अंदाज होता. परंतु तो चुकला. आम्ही यात बुडालो. हे पुस्तक घेऊन आम्ही महाराष्ट्रभर फिरलो. व्यवहार तोट्याचा झाला. मात्र हा अनुभव मला ‘मुक्तरंग’ च्या पुढील वाट-चालीसाठी उपयुक्त ठरला. या आर्थिक नुकसानीचा आमच्या संबंधावर काहीही परिणाम झालेला नाही. त्यानंतर काही काळ अमर दिल्लीला गेला. तिथे त्याने पत्रकारिता केली. मी पुण्याला ‘मुक्तरंग’ चे ऑफिस थाटले. याकाळात आमच्या गाठीभेटी कमी झाल्या तरी संपर्क कायम होता. संबंधातील ओलावा तसाच होता. २००३ मध्ये ‘मॅप मिडीया लिंक’  या माझ्या संस्थेला नांदेड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रसिद्धीचे काम मिळाले. सर्वेक्षण करणे, कामासंबंधी पोष्टर्स बनविणे, डॉक्युमेंट्री फिल्म व ऑडियो कॅसेट बनवणे असे कामाचे स्वरूप होते. डॉक्युमेंटरीचा मला व अमरलाही अनुभव नव्हता. तरीही आम्ही मिळून हे काम केले.दीपरत्न निलंगेकर या दुस-या मित्राने चित्रीकरण व संपादन केले. ही अध्र्या तासाची डॉक्युमेंटरी सर्वांच्या पसंदीला उतरली. ऑडियो कॅसेटसाठी मी, अमर व नाईक मुंबईला गेलो. रेकॉर्डींग स्टुडिओजवळ बसूनच आम्ही स्क्रीप्ट तयार केली. यात एक खेडूत व प्रशिक्षक यांचा संवाद आहे. त्या भूमिका अमर व मी वठवल्या. अशी ‘नंदीग्रामची यशोगाथा’  नावाची ऑडियो कॅसेटही आमच्या नावावर आहे.
‘मुक्तरंग’  प्रकाशनच्या कामातील अमरच्या सहभागावर कितीही लिहीले तरी ते कमीच होईल. ‘मुक्तरंग’  हे माझ्या कार्यालयाचे व प्रकाशनाचे नाव. तेही अमरनेच सुचवलेले आहे. माझ्या बहुतेक पुस्तकांची नावे त्याच्याशी चर्चा करुनच ठरतात. मुखपृष्ठ फायनल करतानाही त्याचा सल्ला मोलाचा ठरतो. कुठं थोडंसं अडलं की लगेच त्याला फोन करतो. अडचण दूर होते. खरं सांगायचं तर ‘मुक्तरंग आणि अमर’  यांना वेगळे करता येत नाही. तो या परिवाराचा एक घटक आहे. शेतक-यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने अमरने ‘बळीराज्य मराठवाडा’  या पाक्षिकाची सुरुवात केली.यात अमरसोबत मी आणि अच्यूत गंगणे होतो. अतिशय तुटपूंज्या साधन-संपत्तीच्या बळावर जवळपास दीड वर्षे हे पाक्षिक चालले. मात्र अमरने या कामासाठी घेतलेली मेहनत अजोड होती. त्याने या कामाला अक्षरशः वाहून घेतले होते. या काळातही त्याचा मला भरपूर सहवास लाभला. ‘अ‍ॅग्रोसेल’  हाही आम्ही मिळून केलेला प्रयोग. अमरची ही कल्पना मूर्त स्वरुपात उतरवण्यासाठी मीही थोडासा हातभार लावू शकलो. शेतक-यांनी त्यांचा माल थेट ग्राहकांना विकावा ही यामागची अमरची कल्पना. खरे तर शेतकरी संघटनेने या प्रयोगाच्या पाठीशी पूर्ण पाठबळ उभे करायला हवे होते. परंतु ते घडले नाही. अमरची स्वतंत्र विचारसरणी बहुतेकांना खटकत असावी. अमरने हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. कधी जीपने तर कधी मोटरसायकलवर जाऊन गावोगाव सभा, बैठका घेतल्या. संघटनेच्या निवडक कार्यकत्र्यांनी या कामात आम्हाला साथ दिली आणि कोणाही नामवंताचे, प्रस्थापितांचे पाठबळ व सहकार्य नसतानाही ‘अ‍ॅग्रोसेल’ चा प्रयोग यशस्वी झाला. अनेक शेतकरी त्यात सहभागी झाले. शेतक-यांचा माल हातोहात संपला. लाखो रूपयांची उलाढाल झाली. अ‍ॅग्रोसेल ख-या अर्थाने यशस्वी झाले. त्यावेळी शेतकरी संघटनेने असे प्रयोग महाराष्ट्रभर केले असते तर आजही शेतकरी संघटनेची तीच ताकद टिकून राहीली असती.
एक वक्ता म्हणूनही अमर हबीब मला खूपच भावतो. त्याचं बोलणं तर्कशुद्ध तर असतंच शिवाय ते व्यवहार्यही असतं. तो नेहमीच जमिनीवरचं बोलतो. त्यामुळे माझ्या अनेक पुस्तक प्रकाशनासाठीचा तो प्रमुख पाहुणा राहिलेला आहे. अमर आहे म्हटलं की, श्रोते जमवण्याची चिंता राहात नाही. अमरसोबतचं माझं मैत्रीचं आयुष्य हा एखाद्या कादंबरीचा विषय होईल. त्याच्यासोबतची अनेक वेळा केलेली अंबाजोगाईतील डोंगरभ्रमंती, विविध ठिकाणी केलेले प्रवास, तासन तास मारलेल्या गप्पा, आयुष्यातील सर्वात मोठा अमूल्य खजिना आहे. त्याच्याशी प्रत्येक वेळी नव्या विषयावर चर्चा होते. नवा दृष्टिकोन समोर येतो. कार्यकर्ता, संघटक, बंडखोर, विचारवंत, पत्रकार, प्रकाशक, लेखक, वक्ता अशा अनेक रूपात मी अमरला पाहिले आहे. मात्र यातील ‘मित्र अमर’  हे रूप मला खूप हवेहवेसे वाटणारे आहे. प्रसंग कितीही दुःखाचा असो की आनंदाचा, त्याची साथ तेवढीच मनापासूनची असते. तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. समोर कितीही कठीण परिस्थिती येवो, अमर आपल्यासोबत आहे ही एकच भावना मला निश्चिंत बनवते. मी कुठेही असलो तरी तो सतत सोबत असल्याची जाणिव राहाते. ही जाणिव एवढी प्रभावी आहे की,आता सतत फोन करण्याची गरजही भासत नाही.त्याच्या जवळ राहणा-या सर्वांनांच त्याचे मोठेपण कळते असे नाही. मी मात्र त्याच्या मोठेपणाचा पावलोपावली अनुभव घेतोय. सतत नवे नवे अनुभव घेत जगणं हेच खरं जगणं असं तो मानतो. आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतो. हे जगणं सोपं नाही मात्र याचासारखा आनंद दुस-या कशातही नाही. हे अमरकडे पाहिल्यानंतर पटतं.  असा मित्र लाभणं यासारखी आयुष्यात दुसरी कुठलीही भाग्याची गोष्ट नाही, असं मला वाटतं. माझ्यासाठी तरी अमर माझा ‘आयडॉल’ च आहे.
 
- महारूद्र मंगनाळे
मुक्तरंग प्रकाशन,लातूर
मो. ९४२२४६९३३९,९०९६१३९६६६