सरकारी पत्रकार दिनाचा राज्यात फियास्को

बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे नियतकालिक सुरू केले.मराठीतील या पहिल्याच नियतकालिकाची सुरूवात ज्या दिवशी झाली तो 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रातील पत्रकार पत्रकार दिन म्हणून साजरा करतात.या दिवशी पत्रकारांमध्ये कमालीचा उत्साह आनंद असतो.पत्रकार दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.गुणवंत आणि उत्कृष्ट कार्य क रणाऱ्या पत्रकारांचे विविध पुरस्कार देऊन सत्कार केले जातात.रक्तदानासारखे अनेक सामाजिक उपक्रम देखील पत्रकार या दिवशी करीत असतात.मात्र या साऱ्या उत्साही वातावरणात माहिती आणि जनसंपर्क विभागाची अनुपस्थिती हा खटकण्याचा विषय असतो.अनेक ठिकाणी या दिवशी जिल्हा माहिती अधिकारी कार्यक्रमांकडे फिरकतही नाहीत.जसे त्यांचा या कार्यक्रमाशी संबंधच नसतो.अर्थात हा पत्रकारांसाठी महत्वाचा दिवस असल्यानं त्यात सरकारी सहभाग आहे की नाही याची कोणी चिंता करीत नाही.पत्रकार आणि पत्रकार ंसंघटना उत्साहात कार्यक्रम साजरे करतात.
6 जानेवारी रोजी उदासिन असलेल्या माहिती आणि जनसंपर्क विभागाला 16 नोव्हेंबर रोजी कमालीचे चैतन्य आलेले असते.कारण या दिवशी राष्ट्रीय पत्रकार दिन असतो.वस्तुतः 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन का साजरा केला जातो हे जर अधिकाऱ्यांना विचारले तर 90 टक्के अधिकाऱ्यांना त्याचे उत्तर देता येणार नाही.पण सरकारी आदेश आहे,त्यामुळं उपचार म्हणून ते हा दिवस साजरा करतात.गावात ज्या पत्रकार संघटना आङेत त्यांची मिनतवारी करीत त्यांना बोलवायचे आणि हा दिवस साजरा करायचा आणि आम्ही पत्रकारांसाठी फार काही करतो आहोत हे दाखवायचे असा शिरस्ता राज्य सरकारचे माहिती खाते गेली काही वर्षे राबवत आहे.बरं पत्रकार दिन साजरा करायचा म्हणजे काय करायचे, तर एक विषय ठरवायचा आणि त्याविषयावर एखादा फुकटचा वक्ता बोलावून त्याचे भाषण ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या बातम्या काढायच्या.म्हणजे झाला पत्रकार दिन.
यंदा मात्र सरकारी पत्रकार दिनाचा पुरता फियास्को झाला.महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने राष्ट्रीय पत्रकार दिन निषेध दिन म्हणून पाळण्याचे आवाहन राज्यातील पत्रकार आणि पत्रकार संघटनांना केले होते.पत्रकारांवरील वाढते हल्ले,ते रोखण्यासाठी कायदा करण्यात सरकार करीत असलेली टाळाटाळ,पत्रकार पेन्शन योजना राबविण्यात सरकारची उदासिनता,अधिस्वीकृती समिती गठित कऱण्यात जाणीवपूर्वक क ेली जात असलेली टाळाटाळ या आणि पत्रकारांच्या अन्य प्रश्नांसदर्भात सरकारची भूमिका नकारात्मकच आहे.एकीकडे पत्रकारांचे कोणतेच प्रश्न सोडवायचे नाहीत आणि दुसरीकडे राष्ट्रीय पत्रकार दिन साजरे करून आम्ही पत्रकारांसाठी फार काही करीत आहोत हे दाखवायचे हा विरोधाभास संतापजनक आणि राज्यातील पत्रकारांना मान्य होणारा नाही.म्हणूनच राज्यातील पत्रकारांनी एकत्र येत राज्यात काल निषेध दिन पाळला.निषेध दिनाच्या निमित्तानं सरकारी पत्रकार दिनावर पत्रकारांनी बहिष्कार टाकला.त्यामुळे सरकारी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे फियोस्को झाले.राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा माहिती कार्यालयातच पत्रकार दिन झाले. बहुतेक ठिकाणी भाड्याचय जागेत असलेली माहिती कार्यालयात कर्मचा़ऱ्यांना बसायलाही जागा नाही अशा स्थितीत किती लोकांच्या उपस्थितीत हे सरकारी उपचार पार पडले असतील याची आपण कल्पना करू शकोत.माहिती विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच हे कार्यक्रम झाले.राज्यात कोठेही या सरकारी कार्यक्रमांना दहा पत्रकार देखील उपस्थित नव्हते. काही ठिकाणी कार्यक्रमास पत्रकारांनी यावं म्हणून ज्या पत्रकारांना शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून अनुदान मिळाले त्याच्या चेकचे वितरण करण्याचे कार्यक्रम या कार्यक्रमाच ठेवल्याने काही ठिकाणी असे लाभित पत्रकार उपस्थित होते .पण कोठेही दहाच्या वर पत्रकार या कार्यक्रमांना हजर नव्हते.सर्वच ठिकाणी जनसेवेत माध्यमांची भूमिका असा निरर्थक विषयावर वक्तयांनी आपले चऱ्हाट लावले.पत्रकारितेचा जन्मच मुळात समाज हिताची कामं कऱण्यासाठी झाला हे हा विषय ठेवणाऱ्यांना कळले नसावे.वस्तुतः पत्रकार दिन आहे तर मग पत्रकारांच्या प्रश्नावर व्यापक चर्चा होणे अपेक्षित असते.पत्रकारांच्या अडचणी,बदलत्या काळातील पत्रकारितेचे बदलते स्वरूप,वेब,इलेक्टॉनिक पत्रकारितेवर मान्यवरांची व्याख्यानं होणं गरजेचं होती.पत्रकारांवरील हल्ले,पत्रकारांच्या पेन्शन आणि मागण्यांच्या संदर्भात सरकारची भूमिका मांडली जायला हवी होती पण असे काही झाले नाही.सरकारच्या माहिती विभागाने एक कर्मकांड उरकले.हे कर्मकांड उरकताना मुंबईत तर माहिती आणि जनसंपर्क विभागाला कार्यक्रमाही घेता आला नाही.कार्यक्रम घेता येत नाही म्हणून पत्रकार कल्याण निधीची बैठक लावली गेली पण मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला अन्य पत्रकारा संघटनांच्याही काही सद्‌स्यांनी बहिष्कार टाकल्याने या बैठकीची हवाही निघून गेली.त्यामुळं कालच्या पत्रकार दिनाचा राज्यात फियास्कोच झाला.एखादं-दुसरा अपवाद वगळता कोणत्याही पत्रकार संघटनांनी काल कोणतेही कार्यक्रम ठेवले नव्हते.त्यामुळे पुढील वर्षी तरी पत्रकार दिनाचे कर्मकांड पार पाडताना माहिती आणि जनसंपर्क विभागाने पुरेशी काळजी घेतली पाहिजे
कालचा पत्रकार दिन निषेध दिन म्हणून पाळून राज्यातील पत्रकारांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत आपली एकजूट दाखवून दिली त्याबद्दल तमाम पत्रकार आणि पत्रकार संघटनांचे आम्ही आभारी आहोत.

S.M.Deshmukh