दासगुप्तांच्या मदतीसाठी मराठी पत्रकार परिषदेचा पुढाकार

नागपूर : पत्रकारितेच्या क्षेत्रात १६ वर्षे सेवा देणारे रवींद्र दासगुप्ता आज कसे हलाखीचे जीवन जगत आहेत यावर लोकमतने प्रकाश टाकल्यानंतर दासगुप्तांच्या मदतीसाठी अनेक सेवाभावी व्यक्ती आणि संस्था दानवीर पुढे येत आहेत. पत्रकारांच्या हितासाठी सदैव झटणार्‍या मराठी पत्रकार परिषदेनेही यासाठी पुढाकार घेतला आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक व पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी दासगुप्तांना ११ हजारांची तातडीची मदत देण्याची घोषणा केली आहे. ही माहिती लोकमतला देताना एस. एम. देशमुख म्हणाले, दासगुप्तांची ही अवस्था बघून फारच वाईट वाटले. मुंबईच्या प्रसिद्ध संपादिका सुनीता नाईक यांच्या अगतिकतेची चर्चा संपलेली नसतानाच आता पुन्हा दासगुप्तांच्या रूपाने तसेच प्रकरण समोर आले आहे. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीने पाऊल उचलणे गरजेचे आहे. मराठी पत्रकार परिषदेतर्फे आम्ही दासगुप्तांना ११ हजारांची मदत तर देतच आहोत. याशिवाय शासनातर्फे शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतून एक लाख रुपयांपर्यंतची मदत त्यांना कशी मिळवून देता येईल, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. लवकरच नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत आहे.
यावेळीही हा मुद्दा आम्ही उचलून धरू, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

साभार - दैनिक लोकमत,नागपूर

जाता -जाता : नागपूरच्या कोणत्याही स्थानिक पत्रकार संघटनेने दासगुप्ता यांना दमडीची मदत केली नाही,पण मराठी पत्रकार परिषदेचे 11 हजार रूपयाची मदत करून,या पत्रकार संघटनांच्या डोळ्यात झणझणीत अंजण घातले आहे,आता तरी नागपूर पत्रकार संघटना जागे होणार की असेच झोपणार ?