दासगुप्तांसाठी मदतीचा ओघ

नागपूर : रवींद्र दासगुप्ता नामक एक ज्येष्ठ पत्रकार रस्त्यावरचा कचरा वेचून पोट भरतोय हे वृत्त 'लोकमत'मध्ये प्रकाशित होताच समाजमन गहिवरले. दासगुप्तांना या दयनीय अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी अनेकांनी लोकमत कार्यालयात फोन करून मदतीची इच्छा व्यक्त केली. काहींनी तर थेट बँकेत रक्कमही जमा केली.
नागपूर शहरातील काही सहृदयी नागरिकांनी त्यांचा पत्ता मिळवून त्यांना गाठले व मदत दिली. रवींद्र दासगुप्ता हे एकेकाळी नागपूर टाइम्ससारख्या दैनिकात पत्रकार होते. परंतु दुर्दैवाने ते दैनिक बंद पडले अन् त्याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने दासगुप्ता अक्षरश: कोलमडून पडले. त्यांची ही दुर्दैवी कहाणी लोकमतने पुढे आणल्यामुळे सर्व स्तरांतून दासगुप्तांसाठी मदतीचे हात पुढे सरसावले आहेत.
अचानक मदतीचा हा ओघ बघून आतापर्यंत उपेक्षेचे जीवन जगणारे रवींद दासगुप्ता गहिवरले व त्यांनी लोकमतचे आभार व्यक्त केले. 
.............................
 रवींद्र दासगुप्ता यांच्या दयनीय अवस्थेबद्दल 'लोकमत'मध्ये वाचले अन् मनात कालवाकालव सुरू झाली.आपलाच एक सहकारी कचरा वेचून पोट भरतोय, ही गोष्ट समग्र पत्रकारांसाठी अत्यंत धक्कादायक आहे. मी व माझे इतर सहकारी लवकरच दासगुप्तांची भेट घेऊन त्यांना मदत करणार आहोत. अशी वेळ कुणाही पत्रकारावर येऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येईल, त्या दिशेनेही प्रयत्न करायचे आहेत.
उमेशबाबू चौबे,
ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवी. 
..............................................
मी नेहमी सायंकाळी रामकृष्ण मठात जात असतो. तेथे दासगुप्ता यांचे दर्शन घडायचे. त्यांची ती अवस्था बघून हा माणूस मठात नेमके काय शोधायला येतो याबाबत आश्‍चर्य वाटायचे. आज लोकमतमधील वृत्त बघितले अन् साराच उलगडा झाला. मठात एकदा ते माझ्याशी बोलले व त्यांनी मला तुम्ही डॉक्टर आहात का, असा प्रश्न विचारला. कदाचित तेव्हा त्यांना उपचाराची गरज असेल. लोकमतच्या वृत्तामुळे दासगुप्तांना नक्कीच मदतीचे हात लाभतील. अशाच विधायक पत्रकारितेची आज गरज आहे.
मयुरेश गोखले
(नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचे चुलत नातू)