बेळगाव 'तरुण भारत’चे मुंबईत शानदार पदार्पण


मुंबई- संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा साक्षीदार आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढय़ाचा बुलंद आवाज असलेल्या बेळगाव `तरुण भारत’च्या मुंबई आवृत्तीचा दिमाखदार प्रकाशन सोहळा गुरुवारी उत्साही वातावरणात संपन्न झाला. या प्रकाशन सोहळय़ाच्या निमित्ताने गेली पाच दशकांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाची सोडवणूक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. विश्वासार्ह दैनिक म्हणून लोकमान्य पावलेला `तरुण भारत’ मुंबईत आपली संघर्षाची आणि सडेतोड पत्रकारितेची परंपरा कायम ठेवील, अशी ग्वाही संपादक किरण ठाकुर यांनी यावेळी व्यासपीठावरून दिली.
माटुंगा येथील सिटीलाईट सिनेमागृहातील शानदार समारंभात झालेल्या या प्रकाशन सोहळय़ाप्रसंगी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते मनोहर जोशी, महापौर सुनील प्रभू, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, `तरुण भारत’चे कार्यकारी संचालक प्रसाद ठाकुर, संचालिका सई ठाकुर, बाबा धोंड आदी मान्यवर उपस्थित होते. याच कार्यक्रमात `तरुण भारत’चे संकेतस्थळ आणि स्व. बाबुराव ठाकुर यांच्या जीवनकार्याचा वेध घेणाऱया `समरांगण हे जीवन ज्यांचे’ या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले.
बेळगाव महाराष्ट्रात दिसावे
`तरुण भारत’ची आवृत्ती मुंबईत सुरू झाल्याने आता बेळगाव महाराष्ट्रात दिसावे, अशी इच्छा बाबासाहेब पुरंदरे यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचवेळी `तरुण भारत’ची नववी आवृत्ती पुण्यातून सुरू करावी, असा प्रेमळ आग्रह बाबासाहेब यांनी धरल्यानंतर सभागृहात उपस्थितांनी टाळय़ांचा कडकडाट केला. सीमाभागातील जनता महाराष्ट्रात जायचे म्हणते त्यावेळी त्यांच्यावर गोळय़ा घालणे, लाठी हल्ला करणे ही कुठली नीती?, असा संतप्त सवाल पुरंदरे यांनी केला. सीमाप्रश्न समजुतीने सोडविण्याचे प्रयत्न संपू नये आणि त्यापूर्वीच लढय़ाला यश मिळावे. सीमाप्रश्न सामंजस्याने सोडविला नाही तर आपापसातील मतभेदांचा फायदा तिसरे घेतील. त्यामुळे सावध रहा रात्र वैराची आहे, असा इशाराही बाबासाहेबांनी कर्नाटकाला दिला.
`तरुण भारत’ यशस्वी होईल
स्वातंत्र्याची आस आणि समाजसेवेचा ध्यास घेऊन समाजसेवेची साधना ठरलेले `तरुण भारत’ मुंबईत यशस्वी होईल, असा आत्मविश्वास मनोहर जोशी यांनी व्यक्त केला. `सीमाभाग हा भीक मागून नव्हे तर आम्ही हक्काने मिळवू. सीमाप्रश्नासाठी पुन्हा आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही’, असेही जोशी यांनी सांगितले. मनोहर जोशी यांनी यावेळी `तरुण भारत’चे संस्थापक बाबुराव ठाकुर यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाबुरावांना पाहिल्यानंतर मनात मोठय़ाने घोषणा द्यावीशी वाटायची. कारण बाबुरावांनी आपल्या कामाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. बाबुरावांची हीच परंपरा ठाकुर कुटुंबियांच्या तिसऱया पिढीने सुरू ठेवली, त्याबद्दल अभिनंदन. आज उगविणाऱया सूर्याचा कधीही अस्त होणार नाही, अशा सदिच्छाही जोशी यांनी दिल्या. आपल्या राजकारणाची सुरुवात सीमा लढय़ाने झाल्याचे जोशी यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
`तरुण भारत’मुळे महायुतीची सत्ता येणार
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी `सामना’ दैनिक सुरू केल्यानंतर राज्यात युतीची सत्ता आली. आता `तरुण भारत’ची मुंबई आवृत्ती सुरू झाल्याने राज्यात महायुतीची सत्ता येणार, असा दावा रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत केला. `तरुण भारत’ने पँथरच्या चळवळीतील माझ्या बातम्या छापल्या त्यामुळेच मी राजकारणात पुढे आलो, असे आठवले यांनी सांगितले. बेळगावचा सीमाभाग अजून महाराष्ट्रात आलेला नाही, तो महाराष्ट्रात यावा आणि सीमाभागातील मराठी बांधवांवरचा अन्याय दूर व्हावा म्हणून आपण सीमालढय़ाबरोबर असू, अशी ग्वाही आठवले यांनी दिली.
मराठी माणसाचा अभिमान
गौरवशाली इतिहास असलेला `तरुण भारत’ हा मराठी माणसाचा अभिमान आहे. सामाजिक बांधिलकी लोकप्रिय पुरवण्या, व्यापक जाळे आणि तांत्रिक प्रगती ही `तरुण भारत’ची वैशिष्टय़पूर्ण परंपरा आहे. स्वातंत्र्य लढा, गोवामुक्ती संग्राम आणि सीमालढय़ाची पार्श्वभूमी असलेला `तरुण भारत’बद्दल वाचकांना आदर आहे. आता `तरुण भारत’च्या मुंबई आवृत्तीच्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या चांगल्या बातम्या वाचकांपर्यंत पोहचतील, असा विश्वास सुनील प्रभू यांनी व्यक्त केला.
औचित्यपूर्ण सत्कार
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि `दैनिक नवाकाळ’चे संपादक नीलकंठ खाडिलकर यांना मानपत्राचे वाचन करून गौरविण्यात आले. जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा सत्कार त्यांच्या चिरंजीवाने स्वीकारला. `रूरल डेव्हलपमेंट’चे संस्थापक प्रदीप लोखंडे यांचाही सत्कार करण्यात आला.

नरेंद्र कोठेकर निवासी संपादक
संपादक किरण ठाकुर यांनी यावेळी मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक म्हणून नरेंद्र कोठेकर यांच्या नावाची घोषणा केली. या घोषणेनंतर कोठेकर यांचा सत्कार करण्यात आला.