मराठी पत्रकारितेत लवकरच 'दबंग'गिरीचे दमदार युग


 'निष्पक्ष नजर, निष्पक्ष खबर' या व्रताला जागून इंदूर, भोपाळसह संपूर्ण मध्यप्रदेशात 'भास्कर'च्या नाकी दम आणणारया वृत्तपत्राची आता मराठीत "दबंग'गिरी सुरू होणार आहे. होय, 'दबंग दुनिया' लवकरच मराठीतून सुरू होतोय! तसा मुंबईत सध्या 12 पानी हिंदी 'दबंग दुनिया' सुरूच आहे.

अत्यंत आक्रमक, बिनधास्त, सडेतोड शैलीसाठी हे वृत्तपत्र प्रसिद्ध आणि तुफान लोकप्रिय आहे. अत्यंत आकर्षक ले-आऊट व उच्च दर्जाची न्यूजप्रिंट हे या दैनिकाचे आणखी एक वैशिष्ट्य! मध्यप्रदेशातील बडे बिल्डर असलेले, 'टोबको बरोन' म्हणून ओळखल्या जाणारया 'गुटखाकिंग' किशोर वाधवानी यांच्या मालकीचे हे वृत्तपत्र! महाराष्ट्रात सध्या सरकारविरोधी बाणा फक्त 'लोकसता' जपून आहे. त्यामुळे दबलेल्या, पिचलेल्या 'पेज थ्री' माध्यमांच्या दुनियेत बाणेदार, तडफदार वृत्तपत्रे निश्चितच उठून दिसतात.

'दिव्य मराठी' महाराष्ट्रात आला तेव्हा मोठ्या अपेक्षा होत्या; मात्र आक्रमक 'भास्कर'ची ही मराठी आवृत्ती फारच मिळमिळीत, पिचपिचीत आणि लिबलिबीत होत दिवसेंदिवस रटाळ, ढिसाळ बनत चाललीय! त्यामुळे 'दबंग'ची स्पर्धा अधिकच सोपी झाली आहे. मध्यप्रदेशात या दोन्ही दैनिकात जाम खुन्नस आहे! निवडणूक काळात "दबंग"ने अभिलाष खांडेकर यांनी केलेल्या कॉंग्रेसच्या प्रचाराचा भांडाफोड करून धमाल उडवून दिली होती. [(इथे पाहा ते मूळ वृत्त; दबंग दुनिया - इंदूर आवृत्ती; पान 1; 26/11/2013)
 # (सौजन्य : मूळ वृत्त भडास)]

दबंग मराठीत 16 पानी असेल व मराठी 'महानगर'ला धक्का देण्यासाठी 16 जानेवारीपासूनच सुरू होईल, अशी शक्यता आहे. अधिकृतरित्या 'दबंग'च्या मुंबई आवृत्तीतूनच "आता बोलूया मराठीत!" हे अतिशय कल्पक आणि कलात्मक कैम्पेन सुरू करण्यात आले आहे. 'दबंग'गिरीच्या धास्तीमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. 'महानगर'मध्ये तयारीने वेग पकडला आहे. नितीन सावंत हे आपली सारी शक्ती पणाला लावून, झोकून तयारीला लागले आहेत. मात्र, पुरेशा, अनुभवी स्टाफमुळे त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. कमी पैशात चांगली माणसे आणायची कुठून? हा प्रश्न आहेच? तरीही आहे त्या स्थितीत 'पीआर"चा उत्तम अनुभव असलेल्या उन्मेष गुजरातींसह ते किल्ला लढवित आहेत. अर्थात टैब्लोईड 'दबंग'ची खरी स्पर्धा चौफेर व पूर्वीच्या 'वागळे महानगरशी'च आहे! 'सिंग महानगर' अजून सुरू व्हायचाय; पण 'वागळे महानगर' शेवटच्या घटका मोजीत आहे. 'चौफेर'मध्ये कुणीही नायक/संपादक नाही; उपसंपादकच गाडा ओढताहेत!

मुंबईतील लढाई 'दबंग'ला सोपी आहे. त्यांचे स्वप्न आहे ते महाराष्ट्र काबीज करण्याचे! खरेतर 'भास्कर'ने ते स्वप्न पाहिले होते; पण कमजोर मनुष्यबळ व इतर भानगडी यामुळे अग्रवाल यांनी पुरोगामी महाराष्ट्राऐवजी बिहारला प्राधान्य दिले. आता त्यांची सारी लढाई तिकडे सुरू होईल. तर त्यांच्या मध्यप्रदेश गडाला सुरुंग लावून इकडे 'दबंग'गिरीचे नवे पर्व सुरू होईल. तेव्हा महाराष्ट्रा; बी रेडी टू वेलकम "दबंग दुनिया"!