आणखी एका वाहिनीत महिलेशी गैरवर्तणूक!

नुकत्याच आत्महत्या केलेल्या तरुण अभिनेत्रीच्या नावाशी साधर्म्य असलेल्या एका हिंदी वाहिनीतही महिलेशी गैरवर्तणुकीचा प्रकार उघड झाला आहे. या वाहिनीजवळ स्वत:चे काहीही नाही. सर्व काही भाड्याचे आहे. अशात या वाहिनीच्या विक्रीचीही चर्चा सुरू आहे. आता हे नेमके काय विकणार? त्यांच्याजवळ स्वत:चे काही नाहीच आहे! नोएडातून सूत्रे चालविली जात असलेल्या या वाहिनीच्या मुंबईतील महिला पत्रकाराशी अभद्र व्यवहाराची घटनाही नुकतीच घडली होती; पण ती कार्यालयाबाहेर इतरांकडून! मात्र, कार्यालयाच्या आत वरिष्ठ छळत असल्याची तक्रार एका महिलेने केल्याने इथे धरपकड होण्याची शक्यता आहे.

या महिलेवरच व्यवस्थापनाकडे दिलेली अंतर्गत तक्रार मागे घेण्याचा दबाव होता. तिलाच बाहेरचा रस्ता दाखविण्याची तयारी सुरू होती. त्यामुळे चवताळलेल्या महिलेने महिला आयोग, मानवाधिकार आयोग यांच्याकडे तर तक्रार केलीच; पण पोलिसात तक्रार करुन एफआयआर नोंदविण्यासाठी आग्रह धरला आहे. हा गुन्हा नोंद झाल्यास अनेकजण अडचणीत येतील व वाहिन्यांच्या दुनियेतील 'घाण' जगासमोर येईल.

आघाडीच्या दोन मराठी वाहिन्यांमध्येही महिलांशी गैरवर्तणुकीचे किस्से घडले होते; पण त्यात 'मिटवामिटवी' केली गेली. नवी मुंबईत सानपाड्यात एका दैनिकातही असाच प्रकार घडला होता. इतकी छी-थू होवूनही हे 'चिराग'दिवाणे म्हातारचळ काही सोडायला तयार नाहीत. इथेही पोलिसात दाखल केली गेलेली तक्रार 'पोलीसबॉइज' वार्ताहराच्या कृपेने दाबण्यात आली आहे. शिवाय 'रंगीला' म्हातारयाच्या उलव्यातील पंटर दलालाने संबंधित महिलेची शैक्षणिक क्षेत्रातील संबंध वापरून तात्पुरती समजूत काढली आहे.

असो. विषय होता हिंदी वाहिनीतील छळाचा! या वाहिन्यांचे जगच अगदी 'विनोद' आणि 'नवीन' गोष्टींनी भरलेले आहे. बाहेरचे लोक 'एक्स्प्रेस' वेगाने इथे येतात. आता या वाहिनीचेच घ्या ना! इथेही  'एक्स्प्रेस' वेगाने बाहेरील माणसे आली; पण 15 दिवसात त्यांना म्हणजे बाहेरून आलेल्या सर्वांना व्यवस्थापनाने बाहेरचा रस्ता दाखविला! त्यात थोडीशी सुधारणा अशी की, नागपूर दौरा आटोपून आलेल्या काही अतिवरिष्ठांना जीवदान दिले गेले; त्यांच्यासोबत आलेली टीम मात्र आऊट, बेरोजगार! फक्त दोघा साहेबांना जीवदान! आहे की नाही 'विनोद'पूर्ण आणि 'नवीन' अशी ही गोष्ट!

खरेतर असे म्हटले जाते की या हिंदी वाहिनीच्या नोएडा कार्यालयातील मंडळींमध्ये काही 'धीरज' म्हणजे संयम नावाचा गुणच नाही. सारे म्हणजे मनमौजी; जणू घरी 'दिवान'वर बसून 'जॉय' करायला आलेहेत! भाड्याच्या लायसन्सवर सुरू असलेल्या या वाहिनीला एक खरीददार मिळाला असून लवकरच नोएडा कार्यालयात विक्री बैठक होण्याची शक्यता आहे. महिला कर्मचारीच्या तक्रारीवर एफआयआर दाखल होवून धरपकड व बदनामी सुरू होण्याच्या आत हा भाड्याचा खेळ विकून मोकळा व्हावा, म्हणून मालक प्रयत्न करीत आहेत. त्यांना निव्वळ पैसे आणून देण्याची मोठमोठी आश्वासने देणारया भंपक च्यानेली पत्रकारांवर पोलिसी कारवाईचा आनंदच आहे; पण हे सारे एकदा ही झंझट विकून मोकळे झाल्यावर! तोवर ते त्या महिलेला हाय रे मेरे 'जिया' म्हणून कळ काढण्याचा सल्ला देत आहेत! हा वाहिनीची मुंबईतील पालखी ओढून नेणारे 'भोय'ही (भोईचा बोलीभाषेतील अपभ्रंश) या एकूण घटनाक्रमामुळे चिंतीत आहेत. अरेरे, काय ख नाय!