आता पत्रकारांपासून समाजाच्या संरक्षणाचा कायदा मागायचा का?

पत्रकारांवर हल्ले होतात; म्हणून ओरड होते; मी किरकोळ अपवाद वगळता आजवर एकही उपसंपादक किंवा पूर्णवेळ, स्टाफर अशा श्रमिक पत्रकारावर हल्ला कुठे झाल्याचे वाचलेले नाही. त्यातही हे काही मोजके प्रकार होतात ते आवरण्यास सध्याचे प्रत्येक भारतीय नागरिकाला सरंक्षण देणारे कायदे पुरेसे आहेत. जर पत्रकारांना त्यांच्यासाठी कायदा हवा असेल तर मग समाजानेही पत्रकारांपासून सरंक्षणाचा कायदा मागायला हवा, अशी अस्वस्थ करणारी घटना काल, शनिवार, 20 सप्टेंबर रोजी जळगावात घडली.
'लोकमत'मधील वृत्तानुसार, (दैनिक 'गांवकरी'मध्ये पत्रकार असलेल्या कुणाल) हेमंत साळुंखे याने व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या सुनील पंडितराव सोनवणे यांच्या मुलीची छेड़ काढली होती. आपल्या घराजवळील किराणा दुकानात निघालेल्या मुलीचा या कुणालने हात पकडला होता. तिने प्रतिकार करताच त्याने मुलीला अश्लील शिवीगाळ करून तिला निर्दयीपणे दगड हाणून फेकला होता. दगड डोक्याला लागून ती मुलगी गंभीर जखमी झाली होती.
किती गंभीर आहे हा प्रकार! एकीकडे निर्भयाच्या नावांनी आपण रकानेच्या रकाने भरून लिहितो; शहरभर मेणबत्तीवाले कॅमेरे समोर दिसताच चेकाळल्यागत शोक करतात. इथे मुलीची छेड़ काढणाऱ्याविरुद्ध तक्रार द्यायला बाप पोलिसात गेला तर त्याला 'मिटवामिटवी'चे धड़े दिले गेले. हुश्शार पत्रकार असलेल्या कुणालाने स्वत:लाच जखमी करवून घेवून 'सिव्हील'चे टेक्नीकल सर्टिफ़िकेट्स मिळवून मुलीसह तिच्या दोन बहिणी, आई व पित्याविरुद्धच 'क्रॉस कंप्लेंट' ठोकली. पोलिसांनीही छेड़खानीच्या आरोपाच्या पिंजऱ्यात असलेल्या पत्रकाराची टेक्नीकल तक्रार इमाने-इतबारे तात्काळ नोंदवून घेतली. कर्तव्यतत्पर पोलिसांनी पीड़ित; छेड़छाड़ग्रस्त मुलीच्या कुटुंबालाच चौकशीच्या फेऱ्यात अडकवून टाकले. मुलीची छेड़ काढणारा आरोपी मोकाट आणि आपल्या कुटुंबाला मात्र पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागतेय; यामुळे अस्वस्थ बापाने रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केली. खरेतर हा पोलिसांनी केलेला खून आहे. या असल्या संवेदनाहीन यंत्रणेकडून काय अपेक्षा ठेवायची? पत्रकारितेचा गैरवापर करणाऱ्या व एक बळी घेणाऱ्यासाठी अनेक पत्रकारांच्या लेखण्या थंडीने गोठल्या. त्यांनी अक्कलहुशारीने बातम्या लिहून आरोपीची भलामण केली. अनेक संपादकही पत्रकारिता धर्म विसरले. एरव्ही प्रसिद्धिसाठी हपापलेल्या महिला संघटना ज्या मुलीची छेड़ काढली गेलीय; तिच्या मदतीला धावले नाहीत. एव्हढी गंभीर छेड़खानीची तक्रार टेक्नीकल करून एका निष्पाप बापाचा बळी घेणाऱ्या पोलिसांना आता कोण जाब विचारणार? आरोपी अजूनही मोकाट, 'सिव्हील'ला टेक्नीकल उपचार घेत पडलाय. त्याच्याविरुद्ध मूळच्या छेड़छाडीच्या गुह्याला गती देण्याबरोबरच पीड़ित कुटुंबातील प्रमुखाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून पोलीस या आरोपी पत्रकाराच्या मुसक्या कधी आवळणार?
अस्वस्थ बाप आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हणतो, आम्ही आयुष्यात कधीच पोलीस ठाण्याची व कोर्टाची पायरी चढलेलो नाही. मात्र पोलीस ठाण्यात आता कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अपमान वाटत आहे. वारंवार पोलीस ठाणे, कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. त्यामुळे कंटाळून मी आत्महत्या करीत आहे!
एक पत्रकार व कायद्याच्या टेक्नीकल पळवाटांनी एका मुलीच्या असहाय्य बापाचा बळी घेतला. त्या दुर्दैवी बापास भावपूर्ण श्रद्धांजली!
. -_-
ईश्वर, पत्रकारांपासून या समाजाचे रक्षण करो!