खबर 'दिव्य' !

महाराष्ट्रात प्रिंट मीडियात वर्चस्व निर्माण करण्यासाठी भोपाळशेठने पाच वर्षी मराठवाड्याची राजधानी औरंगाबादेत बिज रोवले.परंतु या पाच वर्षात भोपाळशेठना मराठवाड्यातील नांदेड,परभणी,हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात 'भोपळा'ही फोडता आला नाही.
औरंगाबादनंतर नाशिक,जळगाव,सोलापूर असा प्रवास करून विदर्भातील अकोल्यात पाय रोवल्यानंतर भोपाळशेठचा भ्रमाचा 'भोपळा' फुटला आहे.अकोला आणि अमरावती आवृत्ती सुरू करताना भरमसाठ माणसे महाराष्ट्राची 'अभिलाषा' असणा-या 'खांडेकरां'नी भरली,परंतु अकोला आवृत्तीचा पुरता बोजवारा उडाला आहे.अभिलाषांनी राठोडावर 'प्रेम' करून त्यांच्यावर विश्वासाने जबाबदारी सोपवली परंतु त्यांनी 'टांगा पलटी घोडा फरार' या प्रमाणे पुन्हा दर्डाशेठच्या दरबारात हजेरी लावली.त्यानंतर सचिन काटेवर जबाबदारी सोपवण्यात आली परंतु अकोला आवृत्तीचा 'काटा'च निघाला आहे.अकोला आवृत्ती प्रचंड तोट्यात आहे.खप तर नाहीच शिवाय बिझीनेसच्या नावानेही बोंबाबोंब आहे.
महाराष्ट्रातील सर्व आवृत्त्या तोट्यात सुरू असल्यामुळे भोपाळशेठ पुरते वैतागले आहेत.खांडेकरांना दिल्लीत हलवल्यानंतर 'शांत' अश्या दीक्षितांवर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली पण त्याचां कारभार 'शांत'पणेच सुरू आहे.
काही दिवसांपुर्वी गोदातीरावरच्या नाशकात भोपाळशेठच्या पाचही आवृत्त्यांच्या निवासी संपादकांची बैठक पार पडली.यावेळी नाशकाचे 'जे.पी'.,सोलापूरचे पिंपरकर,बरीच 'पटवा'पटवी करणारे औरंगाबादचे पटवे,अकोल्याचे काटे आदी सर्व मंडळी हजर होती.मुख्य संपादक प्रशांत दीक्षीत आणि साईओ नीशीत जैन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत बरेच विचार मंथन करण्यात आले.
त्यात तोटा कमी करण्यासाठी भरमसाठ पगारी घेवून पाट्या टाकणा-या कर्मचा-यांना नारळ देण्याचा निर्णय घेण्यात आला.त्याचबरोबर अकोला आवृत्तीत झालेली खोगीर भरती कमी करण्यासाठी अनेकांना घरचा रस्ता दाखवण्याचा आणि काही लोकांच्या औंरगाबाद,बीड,उस्मानाबादमध्ये बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला.दरम्यान अकोला आवृत्तीचे वृत्तसंपादक मिलींद कुलकर्णी यांनाही राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त आहे.
एकीकडे प्रचंड तोटा आणि दुसरीकडे वृत्तपत्र व्यवसायात मंदीचे वातावरण यामुळं भोपळशेठने प्रस्थावित नागपूर,नांदेड आणि कोल्हापूर आवृत्त्या सुरू करण्याचा निर्णय जानेवारी १६ पर्यंत पुढे ढकलला आहे.त्यामुळे या शहरात गुडघ्यांला बाशिंग बांधून बसलेल्या पत्रकारांचा चांगलाच भ्रमनिरास झाला आहे.