अस्थिर व्यवस्थेचा बळी ?

जळगाव - उमदा, धडपड्या, कुटुंबवत्सल, संवेदनशील आणि अभ्यासू पत्रकार हेमंत पाटील यांनी काल रात्री रेल्वेखाली आत्महत्त्या केली.पुढ़च्या आठवड्यात तो बाप होणार होता.त्याचा मृत्यू अनेकांना चटका लावणारा आहे. त्याच्या आत्महत्त्येचे नेमके कारण काय आहे ?
अनेकांचे म्हणणे आहे की,कामाच्या तणावामुळे आणि वरिष्ठांच्या जाचामुळे त्याने आत्महत्त्या केली असावी.त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे...
सध्या तरी त्याच्या कुटुंबाला धीर देणे गरजेचे आहे.ईश्वर त्यांच्या कुटुंबाला दु:ख सहन करण्याची ताकद देवो,ही प्रार्थना...
बेरक्याची भावपुर्ण श्रध्दांजली...

अस्थिर व्यवस्थेचा बळी ?
तरुण पत्रकार हेमंत पाटीलने आत्महत्या केली. प्रश्न कौटुंबिक असेल की नोकरीशी संबंधित? उत्तर मिळायला वेळ लागेल. पण मला वाटते, हेमंत पत्रकारितेतल्या अस्थिर व्यवस्थेचा बळी आहे. ही अस्थिरता प्रथम नोकरीत आहे. नंतर ती कुटुंबाला व्यापते. पत्रकार म्हणून प्रभावाचे बेगडी वलय लाभले की माणूस कुटुंबात आणि मित्रपरिवारात खरे बोलत नाही. नोकरीत इतर सहकारीही अशाच समस्या घेवूनच धावत असतात. तेव्हा गरज असते मनमोकळे बोलतील अशा मित्रांची. पत्रकाराला जवळचे मित्र कधीही नसतात. असतात ते केवळ प्रसिध्दी हवे असलेले केवळ ओळखीचे लोक. यापैकी बहुतांश कसे असतात ? १०० वेळा चांगले छापा. कोणीही आभाराचा फोन करीत नाही. पण एक बातमी विरोधात केली की समोरचा संपूर्ण अब्रू लुटल्यागत जाब विचारतो.
पत्रकार आज सर्वाधिक अस्वस्थ आणि अस्थिर आहे. कायम नोकरी आहे कुठे ? सर्व दोन/एक वर्षांच्या करारावर. हा करारही तकलादू. मुळात तो कागदावर नसतो. असलातर महिनाभराच्या नोटीसचा दिलासा नाहीतर एक महिना वेतन घ्या आणि उद्यापासून घरी बसा. याशिवाय कामाचे तास २४ पेक्षा जास्त. नोकरी करीत असलेल्या संस्थेच्या जबाबदाऱ्या, उद्दिष्टे याचा ताण. संस्थांतर्गत विरोधक आणि बाह्य कुरघोडी. वरिष्ठांशी मतभेद आणि मानसिक अस्वस्थता. जवळपास प्रत्येकजण असाच जगतोय. 
पत्रकार आपल्या पालकाशी आणि कुटुंबाशी मनमोकळे बोलतो कधी ? प्रत्येकाने हा प्रश्न विचारावा. लेखन करताना शब्दांशी खेळणारा पत्रकार कुटुंब आणि मित्रांमध्ये मूकाच. मग, मनमोकळे करण्याच्या जागा म्हणजे व्यसनाची ठिकाणे आणि त्याच वातावरणाचे मित्र. तेथे गप्पाही इतरांच्या द्वेषाच्या किंवा स्वतःवरील अन्यायाच्या. व्यसनात अडकलेले पत्रकार कुटुंबापासून लांबच असतात. पुन्हा अबोला, मौन किंवा एकलखोरेपणा. यातून हा आत्महत्येचा विचार येत असावा? 
मी हे दुष्ट चक्र अनुभवले आहे. त्याचा कमीअधिक भाग आजही जुळलेला आहे. हाय बीपीसह आता रक्तातील घटक कमी होण्याचा आजारही सोबतीला आला आहे. 
अनुभवाची प्रत्येक ठोकर खावून शहाणा होतोय. अक्कल दहाड येवून ती पडली तरी अक्कल आली असे होत नाही. शहाणपण यावे लागते. शहाणा होणे आणि शहाणपण यात खूप फरक आहे. बरेचजण पत्रकारितेच्या बेगडी वलयाने शहाणे किंवा अतिशहाणे होतात पण शहाणपण येईपर्यंत खचतात. हीच नव्या व युवा मुलांची/पत्रकारांची समस्या आहे. हेमंत अशाच उंबरठ्यावरून गेला असावा का? अस्वस्थ, अबोल, एकाकी. आत्महत्या अनुकरणात्मक क्रिया होवू नये. हेमंतच्या आठवणी काढताना या विषयावर "थोडे अंतर्मुख होवू या"