विक्रांत पाटील यांची अत्यंत मार्मिक आणि विचारमंथन करणारी पोस्ट

आमचा 'हेम्या' - 
'दिव्य मराठी'मधील नीरस अन दुष्ट कार्पोरेट व्यवस्थेचा, हीन मानसिकतेचा एक कोवळा बळी .....!!

काल रात्री मित्रांसमवेत 'दिल धडकने दो' पाहून दीड वाजता चहासाठी पाळधी ते मार्केट समिती व्हाया सिंधी कॉलनी, रेल्वे स्टेशन अशी भटकंती करून घरी पोहोचून झोपायला पहाटे पावणेचार वाजले. मोबाईल सायलेंट करून झोपल्याने कितीतरी कॉल मिस झाले. एक अप्रिय बातमी कदाचित विधात्याला मला दोन तास उशिराने ऐकवायची असेल! आठ वाजता ज्ञानेश्वर वाघ (सबएडिटर, दिव्य मराठी) हे थेट घरी पोहोचले आणि त्यांनी एक अत्यंत वाईट बातमी ऐकविली ..... पाटीलसाहेब, आपला हेमंत गेला!!! मन सुन्न झाले अगदी... हेमंत म्हणजे आमचा लाडका 'हेम्या'.... हेमंत पाटील, 'दिव्य मराठी'चा स्पेशल रिपोर्टर... घरामागील रेल्वेरुळाखाली हेमंतचा मृतदेह आज पहाटे सापडला.. रात्री साडेबारानंतर कधीतरी घडलेली घटना!!! कुठल्यातरी सुन्न अवस्थेत हेम्याचा अखेरचा प्रवास त्याला संपवूनच गेला...
असा कसा जावू शकतो हा कोवळा हेम्या? आईला दैवत मानणारा, मुलाला घडविण्यासाठी झटणारा; त्याला कौतुकाने ऑफिसला घेवून येणारा, आमच्या टीममधील सर्वात कुटुंबवत्सल, भावनिक, संवेदनशील आणि सदैव हसमुख हेम्या असा कसा जावू शकतो? एक छोटी खासगी नोकरी करणारे वडील आणि भाजी विकून लेकाला वाढविणारी आई... त्यांना सुखाचे दिवस यावे म्हणून प्रचंड धडपड ... सारखा सांगायचा, "आईचा भाजीबाजार बंद करायचा आहे, खूप कष्ट काढलेत बिचारीने!" ... इतक्या साऱ्या जाणीवा-नेणीवा उरी बाळगून असलेला हेम्या असा अचानक सोडून निघून जावा? अशी का एकाएकी घरदार, आप्तस्वकीय, स्नेहीजन आणि जगाचा पसारा सोडून निघून जाण्याची वेळ आली? त्यांच्या या निर्णयामागे नक्की कोणती कारणं असावीत? घरी काही गंभीर प्रसंग ओढवल्यामुळं, रागाची किंवा मतभेदाची परिसीमा झाल्यामुळं किंवा परिस्थिती असह्य कंटाळ्याची झाल्यामुळं काहीजण छिन्न-विछिन्न मानसिक अवस्थेत जातात, त्यांचंही समजू शकतं; पण घरच्या सर्व आघाड्यांवर आलबेल असताना, कुटुंब-मित्र-नातेवाईक कोणाविषयी कसलीही तक्रार नसताना, रोजच्या जीवनाची सगजर आणि मंगल आरती चालू असताना हेम्यानं एकदम कापरासारखं तबकातून उठून वातावरणात विरून जावं म्हणजे काय? ही कुठली रीत? सर्वसंगपरित्यागाच्याही पलीकडचा हा कुठला प्रवास?... सगळंच प्रज्ञाविवेकापल्याडचं.
 
 इथे थोडक्यात इतकंच सांगीन "अस्थिर व्यवस्थेचा बळी?" या पोस्टशी मी अंशतः सहमत आहे. नोकरी करीत असलेल्या संस्थेच्या जबाबदाऱ्या, उद्दिष्टे याचा ताण, संस्थांतर्गत विरोधक आणि बाह्य कुरघोडी, वरिष्ठांशी मतभेद आणि मानसिक अस्वस्थता... हे सारं खरं आहे. नवी मुलं काय आमच्यासारखे जुनेही खचतात. अस्वस्थ, अबोल, एकाकी होतात. आत्महत्या अनुकरणात्मक क्रिया होवू नये; हे खरेच आहे. त्यासाठी प्रतिष्ठेचा कुठलाही मुद्दा न करता दु:ख कवटाळण्याऐवजी शेअर करायला हवं.
हेमंत पाटील, आमच्या लाडक्या 'हेम्या'ने माझ्यासोबत काम केले आहे. त्याला ऑफिसबॉय ते पेस्टिंग ते पत्रकारितेत मी आणलेय 13 वर्षांपूर्वी... 'दिव्य'मध्ये मी वृत्तसंपादक असताना तो महापालिका रिपोर्टर होता. त्याने उत्तम काम केले. हेम्या हा काही कंपनीच्या अस्थिर व्यवस्थेचा बळी नाही. 'डीबी कॉर्प'मध्ये चांगला पगार, चांगल्या सुविधा आहेत. 'डीबी कॉर्प'ची एचआर पॉलिसी अत्यंत उत्तम आहे. ही पॉलिसी समजून घेण्यात कमी पडलेल्या, ती राबविण्यात कमी पडलेल्या किंवा तिचा चुकीचा अन्वयार्थ लावून, तिचा सोयीने अर्थ लावून, तिचा गैरवापर करून, तिची भीती दाखवून कनिष्ठ सहकारीवर्गाचा मानसिक छळ करणाऱ्या सडक्या आणि हीन मनोवृत्तीच्या वरिष्ठांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेचा हेम्या बळी आहे!
हेमंत पाटील अतिशय उत्तम काम करीत असताना दीपक पटवेने त्याचे महापालिका रिपोर्टर हे पद का काढून घेतले होते याचे उत्तर द्यावे! पटवेला आपल्या एखाद्या 'बगलबच्च्या'ची तिथे सोय लावायची होती म्हणून की केवळ हेम्या हा 'विक्रांत पाटीलचा माणूस आहे' असा अन्वयार्थ, तर्क लावून तसा शिक्का लावून? ही हरामखोरी उधळून लावण्याऐवजी नंतर आलेले बाहेरगावचे संपादक आणि वृत्तसंपादक यांनी ती सुरूच ठेवली. या दोन्ही लोकांना आतापर्यंत कधीही संपादकीय डेस्क आणि रिपोर्टर्स यांच्याशी उत्तम इंटरपर्सनल संबंध नाही राखता आले. कार्पोरेट व्यवस्थेतील 'बॉस'ची हवा त्यांच्या डोक्यात शिरलीय; त्यामुळे ते माणसात राहिलेले दिसत नाहीत... त्यामुळे सहकाऱ्यांच्या समस्या जाणून घेणे, ती सुख-दु:ख शेअर करणे असे या दोघांनी केलेच नाही... माणुसकी आणि आपुलकी हरविलेली, संवेदनाहीन अशी बॉस आणि सबऑर्डीनेट अशी व्यवस्था या लोकांनी निर्माण केली. एक एकसंघ टीम अशी जी 'दिव्य'ची स्ट्रेंग्थ होती तीच दीपक पटवेच्या घाणेरड्या, बायकी राजकारणाने घालवून टाकली... मना-मनात दुफळ्या माजाविल्या आणि भिंती उभ्या केल्या!! 'दिव्य'कडून 'घरकुल'नंतर एकही उत्तम काम उभे करता आले नाही, त्याचे मुख्य कारण हेच आहे, की सामूहीक कामाच्या भावनेला तडा गेलाय. त्यामुळे बॉसेस हे स्थानिकच हवेत. आम्ही रोज सारी सिटी टीम एकत्र जेवायचो आणि एकमेकाची सुख-दु:ख शेअर करायचो.. 'हेम्या'च्या डब्यातील आईच्या हातची वाटलेल्या वाटाण्याची आणि गवारीची हिरव्या रश्शाची भाजी अफ़लातून असायची.. इथला चीफ रिपोर्टर हा तसा 'हेम्या'चा 'आपला माणूस'; पण दुर्दैवाने दोन्ही बॉसच्या आणि हरामखोर अशा तिसऱ्या सुपरबॉसच्या कायम दबावात राहिल्याने ही आपलेपणाच्या व्यवस्थेची ऊबही हेम्याला नंतर मिळाली नाही.. विजयराव नेहमीच 'हुकुमाचे ताबेदार' राहिले आणि त्यांना हुकूम हेम्याला सांभाळून घेण्याचे कधी मिळालेच नाहीत.... कुणासाठी मिळाले, मिळतात ते तेच सांगतील...
'स्पेशल रिपोर्टर' या फालतू प्रकाराने हेम्या सदैव अस्वस्थ होता. आपण 'बिनखात्याचे मंत्री' आहोत, ही भावना त्याच्या उरात कायम सलत होती. त्यानंतर कधीही त्याने रिलीव्हर म्हणून एक दिवसाही महापालिकेत पाउल टाकले नाही. हे कसे कळले? मन मोकळे करण्याच्या जागा म्हणजे व्यसनाची ठिकाणे!!! तिथे हेम्या वारंवार हे बोलून दाखवायचा... 'त्याच वातावरणाचे मित्र' हे गृहीतक मात्र काही योग्य नाही. कारण हेम्या नेहमी पंकज पाचपोळ आणि माझ्याजवळ मन मोकळे करायचा.... 4 महिन्यांपूर्वी 'सिल्व्हर पॅलेस'ला त्याने आपल्याला कसे डावलले जातेय, मानसिक छळले जातेय, हे दु:ख बोलून दाखविले होते. 'दिव्य'मधल्या कोत्या मनाच्या साहेबांच्या भीतीने त्याला उघडपणे बोलता येत नव्हते की आम्हाला त्याच्या घरभरणीला जाता आले नाही. सुरेश उज्जैनवाल यांच्यासह घराचा व्यवहार नक्की केला तेव्हा 'हेम्या'ने बायकोनंतर दुसरा फोन मला केला होता... हीन विचारप्रवृत्तीच्या माणसांमुळे त्याच्या घरी नाही जाता आले शेवटपर्यंत; पोराला त्रास नको म्हणून! चार महिन्यात अलीकडे तो भेटलाही नाही... अधूनमधून फोन यायचा... तीच व्यथा; नेमके, निश्चित, हक्काचे 'बीट' नाही! 8-10 दिवसांपूर्वी त्याची दूध संघाची बातमी पान 1 वर छापून आली तेव्हा मी त्याचं जाहीर कौतुक केलं. त्याला फोन केला... त्याचं अभिनंदन केलं... तो मूडमध्ये नव्हताच... उदास होता.. त्याने एक नवीन दु:ख सांगितलं - सर, माझ्यामागे वॉर्डाचं नवं झेंगट लावून दिलंय, माझ्या इज्जतीचा पार कचरा केलाय!!! स्वत:च्या बातमीच्या कौतुकाऐवजी प्राधान्य द्यावं असं हेम्याच्या उरात ठसठसणारं हे दु:ख होतं. ते दुख त्याला विपन्नावस्थेत घेवून गेलं... पत्रकारिता जाणणारा शेंबडा पोरगाही सांगेल की ज्या कुणी हेम्यामागे वॉर्ड समस्यांचं झेंगट लावून दिलं, त्याला त्याचा उपमर्द करायचा होता; त्याचं मानसिक खच्चीकरण करायचं होतं... त्याची उमेद खचवायची होती, त्याला उद्ध्वस्त करायचं होतं!! पत्रकारितेचा अगदी मुलभूत संकेत आहे... चांद्यापासून बांद्यापर्यंत, की ही असली कामे ट्रेनी, ज्युनिअर रिपोर्टर किंवा संस्थेत जो सर्वात नवीन, उशिरा आलेला असेल तो करतो... 'दिव्य'वाल्यांना हा अगदी सामान्य संकेत माहिती नसावा का? याचाच अर्थ, पत्रकारितेच्या बेगडी वलयाने अतिशहाणे झालेल्या या बॉसेसनी हेतुत:, मुद्दाम, जाणीवपूर्वक पत्रकारितेत 12-13 वर्षांचा अनुभवी असलेल्या हेम्यावर 'चुकीची जबाबदारी' लादली.. हे त्याला मनोमन नक्कीच अस्वस्थ करणारं, आतल्या-आत तोडणारं असावं.
आता 'दिव्य'मध्ये असंच आमच्या गणेश सुरसेला तोडलं जातंय. तोही आतल्या-आत घुसमटतोय. 'सकाळ'मध्ये फोटोग्राफर असलेला गणेश सुरेश उज्जैनवाल यांचा आग्रह आणि अभिलाष खांडेकर यांच्याकडील माझ्या जोरदार शिफारसीमुळे 'दिव्य'त सिलेक्ट झाला. (महेश पठाडेही असाच आला होता; ज्याला पटवेने 'कन्फ्यूज्ड' म्हणून रिजेक्ट केले होते!) गणेशनेही उत्तम कामगिरी केली. एज्युकेशन बीटातून क्राईम गाजविले. मात्र, त्याचाही 'विक्रांत पाटील यांचा माणूस' या शिक्क्यामुळे पटवेच्या पंटर्सनी सतत कोंडी केली. आजवर ठीक होते; पण क्राईममध्ये चांगले काम केल्यानंतर त्याला नवख्या, शिकाऊ, ट्रेनी किंवा इंटर्नशीपवाल्यांना देतात तशी पत्रकाची जबाबदारी देण्यात आलीय. हा प्रचंड मानसिक छळ आहे. हा माणूस रोज आतल्या आत मरत असेल. तो कुठवर हे दु:ख पेलणार? हरामखोर पटवे आणि कंपनीला एक कोवळा, निरपराध बळी घेवून आणखीही काही हवंय का? काही कॉलेजातून फार भयानक प्रकारचे रॅगिंग चालायचे. आता तीच घाणेरडी मनोवृत्ती कॉर्पोरेटमध्येही आलीय. अशा प्रकारच्या कार्पोरेट हॅरॅसमेंटला कडक शिक्षाच हवी. ज्युनिअर रिपोर्टरचा छळ ही 'कॉर्पोरेट रॅगिंग' आहे. ही कामाच्या ठिकाणी झालेली हॅरॅसमेंट आहे. तेव्हा त्यासाठी कायद्यानुसारच कारवाई व्हायला हवी. देशातील 55 टक्के कार्पोरेट कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कामाच्या ठिकाणी छळ केला जातो, असे नुकतेच एका सर्व्हेतून दिसून आले होते. बहुतेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांनी आणि सहकाऱ्यांनी केलेल्या खोट्या आरोपांना व सततच्या टीकेला सामोरे जावे लागते. कर्मचाऱ्यांना होणाऱ्या छळासंबंधात प्रामुख्याने दोन मुद्दे सर्व्हेतून समोर आले. ज्या चुका केलेल्या नसतात, त्या चुकांचे खापर वरिष्ठ आणि सहकाऱ्यांकडून सातत्याने आपल्या माथ्यावर फोडले जाते. आपल्या मतांकडे कानाडोळा केला जातो, आपल्याला कंपनीतील प्रकल्प अथवा बैठकांपासून हेतुपुरस्सर दूर ठेवले जाते, असेही यातून उघड झाले होते. आमच्या हेम्याला सततची उपेक्षा, दुय्यम वागणूक, प्रशंसेचे बोल नाही... अशा उपेक्षेला सामोरे जावे लागत होते. आता तीच उपेक्षा गणेश सुरसे सहन करतोय... योगेश वाणी, आनंद पाटील, विशाल कासार... हे सर्व 'दिव्य'मधील 'शिक्का'तर्काचे कार्पोरेट हॅरॅसमेंट वाट्याला येणारी माणसे आहेत. ही हॅरॅसमेंट कुठली 'व्यवस्था' करत नसते तर तर त्या व्यवस्थेतील हरामखोर आणि हीन प्रवृत्तीची, कोती वरिष्ठ मंडळी करीत असते. दुय्यम वागणूक, उपेक्षेमुळे, "असल्या जगण्यापेक्षा मृत्यू बरा," असं कुणाला वाटायला लागणं, ही कार्पोरेट हॅरॅसमेंट!! फोटोग्राफर योगेश चौधरीचे प्रकरण नेमके काय? त्याने असे कसे झाले?आहे ते खरे असेल तर एक उत्तम फोटोग्राफर हाताबाहेर जाईपर्यंत वरिष्ठ झोपले होते का? की हा योगेश वरिष्ठांच्या 'लव्ह स्टोरी'तला अडसर होता... इतकी संवादहीन अवस्था न्यूजरुममध्ये? या योग्याचा आम्ही रोजच्या रोज कान उपटायचो; पण त्याला वळणावर ठेवले होते. काय चाललंय काय? माणसं अशी अस्वस्थ कशी? आपल्या जीवनाचंही मोल त्यांना राहू नये; इतकी का वैतागली आहेत ती? 
हिप्पोक्रेटस, औषधशास्त्राचा जनक साडेबावीसशे वर्षापूर्वी म्हणून गेला, 'माणसाचं सुख आणि दु:ख', 'यश आणि अपयश' त्याच्या मेंदूतून निर्माण होतं आणि मगच जीवनात ते प्रत्यक्ष अमलात येतं. स्पिनोझा नावाचा महान तत्त्वज्ञ अथवा विसाव्या शतकातील एक महान वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञ बट्रॉंड रसेल यांनी मनात खोलवर रुतत जाणारं दु:ख कसं घात करतं ते उलगडून दाखविलेलं आहे. 'सुखी माणसाचा सदरा' कार्पोरेट जगतात प्रत्येकालाच लाभतो, असे नाही. स्वतंत्रपणे काम कराल, नव्या साहेबाचं मांडलिकत्व पत्करलं नाही किंवा अगोदरच्या साहेबाचा शिक्का असेल तर अशा व्यक्तींच्या नशिबी 'दु:खी माणसाचाच सदरा' येतो. या दु:खाच्या शर्टच्या ओझ्याने हेमंतचं आयुष्य चिरडून टाकलं. आता तरी या कार्पोरेट मुखंडांनी आपल्या सर्वच ज्युनिअर, दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कर्मचाऱ्यांचे सदरे सुखाचे आहेत की बॉसेसच्या हॅरॅसमेंटने दु:खाचे करून ठेवले आहेत, ते तपासावे! परिस्थिती बदलावी. या कार्पोरेट कंपन्यांचे 'एचआर' विभाग म्हणजे काही निव्वळ शोभेच्या बाहुल्या आहेत का? त्यांना आपल्या कर्मचाऱ्यांची अस्वस्थता आणि दु:ख टिपता/हेरता येत नसेल तर कशाला पोसायचे हे पांढरे हत्ती? नुसतेच 'मला पाहा आणि फुले वाहा!' .... जया आझाद असताना 'दिव्य'च्या 'एचआर'विभागात काहीतरी जान होती, निशिकांत तायडे तुमच्या राज्यात काय चाललेय ते बघाल का? किती दिवस चालणार अजून संपादकीय विभागातील विकृत मनाच्या, जातीयवादी बॉसेसची हरामखोरी?
मी मार्क्‍सवादी, जडवादी, भौतिक विचारधारा मानणारा माणूस आहे. त्यानुसार, मन हे आजूबाजूच्या परिस्थितीनुसार घडतं. माईंड इज ए रिझल्टंट ऑफ मॅटर (अँटमॉस्पिअर). थोडक्यात ते आजूबाजूच्या परिस्थितीचं गुलाम असतं. स्वतंत्र नसतं. परिस्थितीला वातावरणाचा परिणाम ते टाळू शकत नाही. दु:खी परिस्थितीनं ते दु:खीच होणार? याचा अर्थ हेम्या मनोमन दु:खी असावा. त्याचं दु:ख वेळच्यावेळी शेअर झालं नाही. त्याच्या दु:खाचा भार हलका झाला नाही. ते दु:ख तसंच उरावर आणि मनावर पेलून नेण्याची क्षमता संपली आणि आमचा हेम्या कोलमडला... या दु:ख आणि नैराश्याचा भार मनावर स्वार झाला आणि नेमके ते निर्वाणीचे क्षण हेम्याला टाळता आले नाहीत... या क्षणांचा भार हलका करणारा जोडीदार त्याला कुठल्याही वळणावर भेटला असता तर तो वाचला असता... फार काय हा दु:खाचा बोजड भार त्याने दारुच्या प्याल्यात बुडवून निदान त्या क्षणांपुरता तरी हुसकावून लावला असता तर हेम्या नक्कीच वाचला असता... अशा वेळी जीव जाण्यापेक्षा व्यसनी मित्र, 'त्याच वातावरणाचे मित्र'ही परवडले... हा पत्रकार 'व्यसनात अडकलेला' नसतो तर दु:खाचे घोट त्या दारुच्या घोटात बुडवून, वाहवून टाकून मोकळा होत असतो...
दु:ख शेअर होणं, त्याचा भार हलका होणं महत्त्वाचं आहे... व्यसनात अडकलेले पत्रकार कुटुंबापासून लांबच असतात; हेही बरोबर नाही... हेम्याइतका कुटुंबवत्सल कुणीच नव्हता आणि तो कधीच व्यसनात अडकलेला नव्हता.. दारू पिणं म्हणजे काही व्यसनात अडकणे होत नाही... तसे असेल तर मुंबईतले 90% संपादक-पत्रकार हे 'व्यसनी' ठरतील!! हां तर्क जनरालाईज्ड संदर्भात कदाचित योग्य ठरू शकेल; हेम्यासंदर्भात पूर्णत: गैरलागू!! मी 2-3 दिवसांपूर्वीच FBवर लिहीले होते, दीपक देवरे नावाच्या आमच्या एका तरुण मित्राला नेमके 'ते क्षण' टाळता न आल्याने 2 वर्षांपूर्वी आम्ही त्याला गमावले होते...
प्राण शर्माच्या 'सुराही'त सांगितल्याप्रमाणे दु:ख कुठे आणि कसे विसरायचे हे खरेतर व्यक्तीसापेक्ष असते. मात्र, मधुशाळा आणि मदिरा हा अगदी सोपा आणि सहज असा मार्ग. त्याच्याही काही काव्यात्मक वास्तवता बघा -
लोग अगर विश्वास करेंगे मधुबाला में
लोग अगर सुख-चैन टटोलेंगे हाला में
जीवन के सारे मसले हल हो जाएँगे
लोग अगर आए-जाएँगे मधुशाला में
............................
अपना नाता जोड़ अभागे मधुशाला से
पीने का आनंद उठा ले मधुबाला से
प्रतिदिन पीकर एक सुरा का प्याला प्यारे
अपना पिंड छुड़ा ले दुक्खों की ज्वाला से
............................
कभी-कभी खुद ही मन-ज्वाला हर लेता हूँ
मधु से अपना प्याला खुद ही भर लेता हूँ
मैं अधिकार समझकर मदिरा के नाते ही
शिकवा और गिला साक़ी से कर लेता हूँ

by Vikrant Patil

(अपूर्ण)
‪#‎HemantPatil‬ 
‪#‎Hemant‬ 
‪#‎DBCorp‬
‪#‎Bhaskar‬
‪#‎DivyaMarathi‬
‪#‎Jalgaon‬
‪#‎हेमंत‬ 
‪#‎हेमंतपाटील‬
‪#‎दिव्यमराठी‬
‪#‎भास्कर‬ 
‪#‎जळगाव‬