नव जागृतीच्या गायकवाडांकडून कर्मचा-यांची घोर फसवणूक

पुणे - अवघ्या सहा महिन्यात गाशा गुंडाळणा-या नव जागृती न्यूज चॅनलच्या राज गायकवाड यांनी कर्मचा-यांची घोर फसवणूक केली आहे.१४ जुलै रोजी कसल्याही परिस्थितीत पेमेंट दिले जाईल,असे आश्वासन देणा-या गायकवाडांनी आश्वासन पाळले नाही.त्यामुळे संतप्त कर्मचा-यांनी कामगार न्यायालय गाठले असून,गायकवाड यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सांगलीच्या राज गायकवाड यांची जागृती अ‍ॅग्रो फुडस् लिमिटेड ही चिटफंड कंपनी आहे.ही कंपनी शेळ्या पालन तसेच मत्स पालन करते,अशी भूलथापा देवून गायकवाड यांनी कंपनीचे जाळे महाराष्ट्रासह अनेक राज्यात विणले आहे.१० लाख भरा आणि ४८ महिन्यात १ कोटी मिळवा,अशी जाहिरातबाजी करून त्यांनी करोडो रूपये गोळा केले आहेत.त्याचबरोबर मीडिया मागे लागू नये म्हणून त्यांनी जानेवारी २०१५ मध्ये नव जागृृती न्यूज चॅनल पुण्यातून सुरू केले होते.पत्रारितेतील अनेक तरूण मोठ्या उत्साहाने या चॅनल मध्ये ज्वाईन झाले होते.परंतु अवघ्या सहा महिन्यातच गायकवाड यांनी कोलांटी उडी घेतली आहे.चिटफंडचा पैसा जमा करण्यासाठी हा फंडा वापरण्यात आला होता.परंतु पैसे गोळा होताच गायकवाडांच्या पोटात गोळा उठला आहे.
गायकवाड यांनी कर्मचा-यांचे एप्रिल,मे आणि जूनचे पेमेंट दिले नाही,तसेच स्ट्रींजर रिपोर्टरचेही याच महिन्याचे मानधन थकवले आहे.पेमेंट देवू,देवू म्हणून त्यांनी अनेक तारखा दिल्या,काही दिवसांपुर्वी कर्मचारी आक्रमक झाल्यानंतर १४ जुलै रोजी पेमेंट देण्याचे लेखी आश्वासन दिले होते.या दिवसांकडे कर्मचारी मोठ्या आशेने पहात होते.परंतु या दिवशीही त्यांचे पेमेंट दिले नाही.कर्मचा-यांच्या जीवनाशी खेळण्याचे काम गायकवाड यांनी केले आहे.अशा भूलथापा देणा-या आणि कर्मचा-यांचाही फसवणूक करणा-या राज गायकवाड यांच्यावर कडक कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.
नव जागृती न्यूज चॅनलसाठी जागृती मल्टिमीडीया कंपनी स्थापन करण्यात आली होती.मुळात नव जागृतीला केंद्र सरकारची मान्यता नाही.NSN ही वहिनी रजिस्टर्ड आहे. मात्र नव जागृती नाव देण्यात आले.वरती नव जागृती आणि खालती NSNअसा लोगो होता.NSNआणि नव जागृती यांची संयुक्त नोंदणी अजूनही करण्यात आलेली नाही.त्याचबरोबर नव जागृतीची महाराष्ट्र शासन,पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंदणी नाही.हा ४२० चा गुन्हा ठरू शकतो.दुसरे असे की या कंपनीच्या डायरेक्टर  राज गायकवाड यांच्या पत्नी जाई गायकवाड आणि भाऊ भास्कर गायकवाड आहेत.त्यांच्यावरही भादंवि ४२० प्रमाणे दाखल होवू शकतो.कर्मचारी आणि स्ट्रींजर राज्यातील विविध कामगार न्यायालयात भादंवि ४२०अन्वये गुन्हा दाखल करणार आहेत.याबाबतच्या नोटीसा वकिलामार्फत पाठवण्याचे काम सुरू आहे.
राज गायकवाड यांच्या जागृती अ‍ॅग्रो फुडस् या चिटफंड कपंनीची आणि नव जागृतीच्या बोगस कारभाराची सखोल चौकशी करावी,या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी भाजपाचे किरीट सोमय्या यांना पत्र पाठवण्यात आले आहे.त्याचबरोबर नव जागृतीच्या ऑफीससमोर आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे.गायकवाड यांच्यावर कारवाई न झाल्यास काहीजण आमरण उपोषण करणार आहेत.