संवेदनाशून्य आणि माणुसकीहीन पत्रकारितेचं हे रूप संतापजनक...मित्रांनो,

हा अर्ध्या मिनिटाचा व्हीडीओ जरूर पाहा...
आजच्या विकृत, झिंगारलेली, चित्कारलेली, चेकाळलेली, चवचाल आणि संवेदनाशून्य आणि माणुसकीहीन पत्रकारितेचं हे रूप संतापजनक आहे !! 
जळगाव महापालिकेच्या लिफ्टजवळ काही महिन्यांचे वेतन थकल्याने हा पालिका उर्दू शाळेचा शिक्षक विष प्राशन करतोय. 15 जुलै रोजीची ही घटना!! अनेक फोटोग्राफर्सच्या कॅमेराचे फ्लॅश चमकताहेत, क्लीअर/HD व्हीडीओ शूट होतोय!!! आत्महत्येचा तमाशा लाईव्हली कॅमेराबंद होतोय... त्या माणसाला वाचवायला कुणी पुढे येवू नये?? फोटो काढताहेत त्याला विष घेण्यास रोखाण्यापासून?? ही कुठली पत्रकारिता?? याचा मनस्वी निषेध!! चीड़ येतेय; लाज वाटतेय या पेशातल्या "बाईटी" अन "स्टील" झिंगेची!!!
आता दुसरी बाजू....
एव्हढी सर्व तयारी करून जर आत्महत्येचा प्रयत्न होतोय तर ही कुणाच्या तरी "आईडियाची कल्पना" तर नसेल?? तसे असेल तर हा विकृतीचा कहर! आमच्या पेशातील नीतिमत्ता इतकी खालावलीय??
त्रिवार निषेध!! चौकशी करा अन् गुन्हे दाखल करा सर्व दोषीवर!!

यासंदर्भात युवा पत्रकार नीलेश झाल्टे याची FB पोस्ट विचार करायला लावणारी आहे. मात्र त्याने "पूर्वनियोजित" दुसरी शक्यता दुर्लक्षित केलीय!!

झाल्टे यांची हीच ती पोस्ट 
.
माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक आहे की नाही याची प्रचीती आज आली. तस तर बऱ्याच गोष्टींमुळे पत्रकार असल्याची भयानक लाज वाटून जाते. आजही वाटली. पण यापूर्वीच्या घटना आपल्या पाठीमागे घडल्या असल्याने ही लाज थोड्या कालावधीने नष्ट व्हायची. पण आज खूप जास्तच वाटली. मी, तुषार आणि नीलेश भाऊ जळगाव मनपाच्या इमारतीच्या कडेनी चालत निघालो असताना अचानक आरडाओरड सुरु झाली. आम्ही खाली होतो, सहज खालून एका स्टुलावर चढून पाहिलं तर एक माणूस ओरडत खाली पडलेला दिसला. त्याच्याभोवती २०-३० लोकं होती. त्यात ५-६ मेनस्ट्रीम मिडीयाला काम करणारे फोटो जर्नलिस्ट. ते सर्व फोटो काढण्यात व्यस्त होते. तो माणूस मनपा शाळेतला एक शिक्षक होता. १४ महिन्यापासून मनपा शाळातील शिक्षकांचे अर्धे वेतन न मिळाल्याने गेल्या १५ दिवसांपासून शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनानंतर कोणताही तोडगा न निघाल्याने डॉ. या शिक्षकाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर इतर शिक्षकांनी तातडीने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केलं. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्याला दोन बड्या खात्याचे मंत्री आहेत. मुख्यमंत्री पदाचे दावेदार नाथाभाऊ, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन सारखे नेते, सगळीकडे जवळपास एकाच पार्टीची म्हणजे सत्ताधारी सरकारचीच सत्ता आहे. असे असताना ही आशिया खंडातली सर्वात उंच प्रशासकीय इमारत असलेली मनपा कर्जाच्या ओझ्याने खुजी झाली आहे. विरोधी असताना नाथाभाऊ ज्या पद्धतीने आवाज उठवत होते तो आवाज आता कुठे गेला, गिरीशभाऊंची सर्व समाजसेवा कुंभमेळ्यातच बीजी आहे का? असे प्रश्नही उपस्थित होतात. १५ दिवसापासून आपल्या कष्टाचे, विद्यार्जनाचा मोबदला मागायला बसलेल्या गुरुजनाचे वेतन देण्यावर साधी चर्चा होऊन दाखल घेतली जात नाही, हे महान दुर्दैव. असे अनेक किस्से हया मनपाचे आहेत, हा भाग वेगळा आहे. असो हा झाला वृतांत. सदर घटनेच्या वेळी आम्ही एक व्यक्ती म्हणून तिथे होतो. (आम्ही खालच्या भागात असल्याने तिथपर्यंत पोचुच शकलो नाही) काहीच करू शकलो नाही. खालून वर जाईपर्यन्त आंदोलनात सामील इतर शिक्षकांनी त्या शिक्षकाला रिक्षात घालून दवाखान्यात हालवले. सदर शिक्षक ज्यावेळी विष पीत होता त्यावेळी किमान २० ते ३० लोकं पाहत होते. तिथे हे पत्रकार उर्फ माध्यमांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. सर्वसामान्य लोकांविषयी किती कणव आहे हे आम्ही नेहमी आमच्या पेपर मधून छपून किंवा फोटो काढून दाखवून देत असतो. मग ही कणव अशा वेळी नेमक काय खायला निघून जाते? विष पीत असताना फोटो काढत असताना या लोकांमधील माणुसकी नावाचा प्रकार नेमकी कोणती भाड खात असतो? खरोखर अशी लोक्स विकृत डोक्याची असावीत अशीच शंका येते आहे. हे लोक्स नंतर बघ मी बाटली तोंडात असल्याचा फोटो घेतला, बघ मी तो खाली पडतानाचा फोटो घेतला. अशी चर्चा करत असतील काय. आणि यांचे संपादक असे फोटो घेऊन गेल्यावर वा शाब्बास पठ्ठेहो, असेच काम करत रहा, अशी शाबासकी देत असतील काय? हे देखील सवाल माझ्या मनात येऊन गेले. आपल्या घरातला किंवा जवळचा एखादा व्यक्ती विष पीत असेल किंवा मरत असेल तर मिडीयाचा माणूस म्हणून आपण बातमीसाठी थांबणार की रोकणार? असेल अनेक सवाल या लोकांसाठी आहेत. माझ्याकडेच एक्सक्लुझीव आले पाहिजे केवळ हीच घाणेरडी भावना अशा वेळी लोकांच्या मनातून जायला तयार होत नाही. एक बातमी नाहीच झाली किंवा त्या शिक्षकाला विष पिण्याअगोदर थांबवले असते आणि नंतर संपादकाला ही गोष्ट सांगितली असती किंवा कळली असती तर? वगेरे प्रश्न फोटोग्राफरच्या समोर उभा ठाकला असेल काय. स्त्रीवाद वगेरे पाहिल्यापासून आई-माई वरच्या शिव्या बंद झाल्या आहेत, पण खेडवळ व्यक्ती असल्याने कितीही कंट्रोल केला तरी अशा शिव्या तोंडातून निघून जातातच. या शिव्या निघाल्याशिवाय भडास पूर्णच होत नाही. आज खूप शिव्या दिल्या काही त्यांना काही स्वताला देखील. शरम वाटते आहे पत्रकार म्हणून घ्यायची... पत्रकार, पत्रकारिता, जर्नलिस्ट सारख्या शब्दांचा आजच्या खासकरून युवकांना भलता मोह लागला आहे. जर पत्रकारिता अशी असेल तर काही दिवसातच पत्रकारितेच्या धंद्याला फाट्यावर मारले जाईल हे नक्की... 


(हे लिहिताना देखील लाज वाटत आहेच. हरामखोरा लिही, बदल व्हायचा तेव्हा होईल या अपेक्षेनेच लिहीले आहे... सोबत त्या शिक्षकाची चिठ्ठी लावत आहे, कदाचित पत्रकारांना त्यातल्या वेदना दिसून आल्या त आल्या..)

Nilesh Zalte